'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव |प्रतिनिधी
शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना दाखल झालेल्या लाचखोरीच्या कथित प्रकरणात आनंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक बालाजी मुंढे यांची जिल्हा व सत्र न्यायालयाने गुरुवारी (३० जुलै) निर्दोष मुक्तता केली. सरकारी पक्षाला मुंढे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप सिद्ध करण्यात अपयश आल्याने प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश माननीय अभिश्री देव यांनी हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला.
काय होते नेमके प्रकरण?
सन २०१९ मध्ये बालाजी मुंढे धाराशिव शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असताना मटका व्यावसायिक दत्ता धावारे याने त्यांच्याविरोधात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (ACB) तक्रार दाखल केली होती. हप्ता आणि अवैध धंद्याला पाठिंबा देण्यासाठी मुंढे यांनी ३ हजार रुपयांची लाच मागून ती स्वीकारल्याचा गंभीर आरोप तक्रारदाराने केला होता. या तक्रारीवरून तत्कालीन तपास अधिकारी विनय बहिर यांनी कारवाई करत न्यायालयात दोषारोपपत्र (Charge Sheet) दाखल केले होते.
न्यायालयात सरकारी पक्षाचा युक्तिवाद ठरला तोकडा
सदर खटल्याच्या सुनावणीदरम्यान सरकारी पक्षाच्या वतीने ५ साक्षीदार तपासण्यात आले. मात्र, लाचेची मागणी आणि तिची स्वीकृती याबाबतचा ठोस पुरावा न्यायालयात मांडण्यात सरकारी वकील असमर्थ ठरले.
याउलट, आरोपी मुंढे यांच्या बाजूने ॲड. दिलीप मराठे यांनी कसून युक्तिवाद केला.
"तक्रारदाराने वैयक्तिक आकस आणि सूडबुद्धीने पोलीस कर्मचाऱ्यावर खोटे आरोप केले आहेत. घटनेशी संबंधित कोणतेही प्रत्यक्ष पुरावे किंवा विश्वासार्ह साक्ष न्यायालयासमोर आलेली नाही,"
हा बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य करत न्यायालयाने बालाजी मुंढे यांची सर्व आरोपातून सन्मानपूर्वक मुक्तता केली.
विधीज्ञांचे सहकार्य
या प्रकरणात आरोपी बालाजी मुंढे यांच्या वतीने ज्येष्ठ वकील ॲड. दिलीप मराठे यांनी प्रभावी काम पाहिले, तर त्यांना ॲड. चांद अत्तर यांनी मोलाचे सहकार्य केले. न्यायालयाच्या या निर्णयामुळे पोलीस दलात आणि मुंढे यांच्या समर्थकांमध्ये समाधानाचे वातावरण पसरले आहे.
0 Comments