Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

तुळजापुरात चोरांचा सुळसुळाट! पुजारी नगर परिसरात नागरिकांमध्ये घबराट; पोलिसांत धडक देत गस्त वाढवण्याची एल्गार मागणी

तुळजापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
शहरातील नळदुर्ग रोडवरील पुजारी नगर सोसायटीसह लगतच्या उपनगरांमध्ये गेल्या काही महिन्यांपासून घरफोड्या आणि चोऱ्यांच्या घटनांमध्ये कमालीची वाढ झाली आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे स्थानिक रहिवाशांमध्ये तीव्र भीती व असुरक्षिततेचे वातावरण पसरले आहे. चोरांच्या या नंगानाचला चाप लावून परिसरात नियमित पोलीस गस्त वाढवावी, या मुख्य मागणीसाठी संतप्त नागरिकांनी बुधवारी तुळजापूर पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांना निवेदनाद्वारे थेट साकडे घातले.

संशयितांचा मुक्त संचार; महिला अन् ज्येष्ठांची सुरक्षा वाऱ्यावर
पुजारी नगर सोसायटीत १५० हून अधिक रो-हाऊस आणि निवासी घरे असून येथे अथांग लोकवस्ती आहे. मात्र, गेल्या काही काळापासून या भागात चोरांनी धुमाकूळ घातला आहे. बंद घरे लक्ष्य करणे, घरफोडीचा प्रयत्न, दुचाकी लांबवणे, तसेच अंगणातील किमती साहित्य व विद्युत उपकरणांवर डल्ला मारण्याच्या घटना नित्यनियमाच्या झाल्या आहेत.

विशेषतः रात्रीच्या सुमारास अनधिकृत व संशयित टोळक्यांचा वावर कमालीचा वाढला आहे. त्यामुळे रात्रीच्या वेळी घराबाहेर पडणेही धोक्याचे ठरत असून ज्येष्ठ नागरिक, महिला व लहान मुलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

"परिसरातील वाढत्या चोऱ्यांमुळे नागरिक दहशतीखाली जगतात. रात्रीच्या वेळी संशयित फिरताना दिसतात. पोलीस प्रशासनाने आता आक्रमक पावले उचलून गुन्हेगारांचा बंदोबस्त करावा, अन्यथा नागरिकांचा धीर सुटेल."
या उपनगरांमध्ये विशेष गस्तीची जोरदार मागणी
नागरिकांनी प्रशासनाचे लक्ष वेधताना केवळ पुजारी नगरच नव्हे, तर संपूर्ण परिसराचे सुरक्षा ऑडिट करण्याची मागणी केली आहे. यात प्रामुख्याने पुजारी नगर, हनुमान नगर, मस्के प्लांटीग व समता नगर, हेलिपॅड परिसर, श्रीराम नगर व शहाणे मंगल कार्यालय परिसर,फिल्टर टाकी परिसर, सहयोग नगर व छत्रपती शिवाजी नगर,विश्वनाथ नगर, हनुमान टेकडी, सप्ताळ नगर, अजिंक्य कॉलनी आणि ओम गणेश कॉलनी
या सर्व संवेदनशील भागांत रात्रीच्या वेळी विशेष गस्त पथक (नाईट पेट्रोलिंग) तैनात करावे, संशयितांची झाडाझडती घ्यावी आणि प्रमुख चौकांत सीसीटीव्ही (CCTV) यंत्रणा बसवण्यासाठी मार्गदर्शन व उपाययोजना करावी, अशी आग्रही मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

मान्यवरांची प्रमुख उपस्थिती
पोलीस प्रशासनाला निवेदन देताना उपनगराध्यक्ष रामचंद्र रोचकरी, प्रक्षाळ मंडळाचे अध्यक्ष विशाल रोचकरी, पुजारी नगर फाऊंडेशनचे अध्यक्ष गणेश पुजारी यांच्यासह उमाजी गायकवाड, श्रावण पवार, सिद्धेश्वर इंगोले, विकास कोळगे, सोमनाथ पुजारी, अनिल आगलावे व परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पोलीस प्रशासनाने या निवेदनाची गांभीर्याने दखल घेऊन तातडीने कडक पावले उचलावीत, जेणेकरून नागरिकांना दिलासा मिळेल, अशी अपेक्षा शेवटी व्यक्त करण्यात आली.

Post a Comment

0 Comments