धाराशिव: "भाजपप्रणित महायुती सरकार जाणीवपूर्वक मराठी संस्कृती आणि ग्रामीण भागातील शिक्षणावर घाला घालत आहे. इंग्रजीकरणाच्या नावाखाली जिल्हा परिषदेच्या मराठी शाळा बंद करून ग्रामीण भागातील कष्टकरी, शेतकरी मुलांचे भविष्य अंधारात ढकलण्याचे हे षडयंत्र आहे. खासगी शिक्षणसम्राटांचे खिसे भरण्यासाठी चाललेला हा डाव हाणून पाडण्यासाठी शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या उमेदवारांना विजयी करा," असे आवाहन धाराशिव-कळंबचे आमदार कैलास पाटील यांनी केले.
जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या निमित्ताने येडशी येथे आयोजित जाहीर प्रचार सभेत आमदार पाटील बोलत होते. यावेळी येडशी जिल्हा परिषद गटाचे उमेदवार देवदत्त भागवत मोरे, येडशी पंचायत समिती गणाच्या उमेदवार नीता गजानन नलावडे आणि कसबे तडवळे पंचायत समिती गणाचे उमेदवार बालाजी अंबऋषी मनके यांच्या प्रचारार्थ या सभेचे आयोजन करण्यात आले होते.
'मराठी शाळा म्हणजे परिवर्तनाची केंद्रे'
आमदार कैलास पाटील पुढे म्हणाले की, "जिल्हा परिषदेच्या शाळांनी आजवर अनेक डॉक्टर, अभियंते आणि प्रशासकीय अधिकारी घडवले आहेत. मात्र, सध्याचे सरकार या शाळांकडे मुद्दाम दुर्लक्ष करत आहे. मराठी शाळा टिकवून त्या अधिक सक्षम आणि आधुनिक करणे हीच आमची भूमिका आहे. जिल्हा परिषदेच्या शाळांमध्ये 'सेमी इंग्लिश' सुरू करून ग्रामीण मुलांना स्पर्धेच्या युगात टिकवण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत."
सरकारच्या धोरणांवर सडकून टीका
"मराठी शाळा बंद करणे म्हणजे ग्रामीण महाराष्ट्राचा कणा मोडण्यासारखे आहे. मराठी भाषेचा पाया मजबूत ठेवून इंग्रजीचे ज्ञान देणे हाच विकासाचा खरा मार्ग आहे. मात्र, सध्याचे सरकार मराठीद्वेषी धोरण राबवत आहे. शिक्षणाचा अधिकार हिरावून घेण्याचा कोणताही प्रयत्न शिवसेना कदापि सहन करणार नाही," असा इशाराही त्यांनी यावेळी दिला.
या सभेला येडशी आणि परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून आपला पाठिंबा दर्शवला. सभेच्या शेवटी, मराठी अस्मिता आणि दर्जेदार शिक्षणासाठी मशाल चिन्हासमोरील बटण दाबून उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने निवडून देण्याचे आवाहन करण्यात आले.
"शिक्षण, विकास आणि विश्वास... हाच आमचा ध्यास!"
"ग्रामीण भागातील मराठी शाळांचे सक्षमीकरण आणि येडशी गटाचा सर्वांगीण विकास करण्यासाठी, आपल्या हक्काच्या माणसाला साथ द्या."
देवदत्त भागवत मोरे (उमेदवार: येडशी जिल्हा परिषद गट)
"महिला सक्षमीकरण आणि प्रगत गावाची नवी उमेद!"
"जिल्हा परिषद शाळांचा दर्जा सुधारण्यासाठी आणि सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी, शिवसेनच्या रणरागिणीला आशीर्वाद द्या."
नीता गजानन नलावडे (उमेदवार: येडशी पंचायत समिती गण)
"तरुण नेतृत्व, अभ्यासू विचार; विकासासाठी हवा बदलाचा निर्धार!"
"सामान्य कुटुंबातील मुलांच्या शिक्षणासाठी आणि कसबे तडवळे गणाच्या प्रगतीसाठी, सदैव आपल्या सेवेत."
बालाजी अंबऋषी मनके (उमेदवार: कसबे तडवळे पंचायत समिती गण)
0 Comments