काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी पोलिसांनी गुन्हेगारीविरुद्धची मोहीम तीव्र केली असून, जनावर चोरीच्या प्रकरणात दोन सराईत गुन्हेगारांना अटक करण्यात यश मिळवले आहे. तांत्रिक पुरावे आणि सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे पोलिसांनी ही कारवाई केली असून, आरोपींकडून चोरीची म्हैस आणि 'पिस्तूल' सदृश्य लायटर जप्त करण्यात आले आहे.
तांत्रिक पुराव्यांनी आवळला फास
तामलवाडी पोलीस ठाण्यात जनावर चोरीचे गुन्हे दाखल झाल्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपास चक्राला गती दिली. गोपनीय बातमीदार आणि सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने संशयास्पद हालचाली टिपण्यात आल्या. यावरून पोलिसांनी अजीम निजाम सय्यद व निलेश उर्फ विश्वनाथ नागनाथ तानवडे (दोघे रा. सावरगाव, ता. तुळजापूर) यांना ताब्यात घेऊन कसून चौकशी केली.
गुन्ह्याची कबुली आणि जप्ती
चौकशीदरम्यान, आरोपींनी २८ नोव्हेंबर रोजी दहिवडी येथील आनंद घाटे यांच्या तीन म्हशी चोरल्याची कबुली दिली. पोलिसांनी तातडीने कारवाई करत साळेगाव येथील व्यापारी हमीद कुरेशी याच्याकडून चोरीची एक म्हैस जप्त केली आहे.
मोबाईलमधील 'त्या' फोटोने वाढवला संशय
या तपासात एक धक्कादायक बाब समोर आली. आरोपी निलेश तानवडे याच्या मोबाईलची तपासणी केली असता, त्यात पिस्तूलचे फोटो आढळले. पोलिसांनी अधिक तपास केला असता, ते प्रत्यक्ष पिस्तूल नसून पिस्तूलसारखे दिसणारे 'इलेक्ट्रिक लायटर' असल्याचे निष्पन्न झाले. याचाच धाक दाखवून हे आरोपी चोरी करत असावेत, असा पोलिसांना दाट संशय आहे.
तपास पथकाचे कौतुक
ही कारवाई पोलीस अधीक्षक रितू खोखर, अप्पर पोलीस अधीक्षक शफाकत आमना, उपविभागीय पोलीस अधिकारी निलेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि गोकुळ ठाकूर, फौजदार प्रदीप टेकाळे, हवालदार तोगे, काझी, पोलीस अंमलदार सुरज नरवडे, गोपाळ सलगर, शेख आणि नितीन भोसले यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
0 Comments