धाराशिव |Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
धुळे-सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरून धावत्या ट्रकमधून अज्ञात चोरांनी अत्यंत चालाखीने चोरलेल्या २ लाख १ हजार रुपये किमतीच्या २४ मेंढ्यांचा छडा लावण्यात धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेला (LCB) अवघ्या २४ तासांत यश आले आहे. पोलिसांच्या सतर्कतेमुळे येरमाळा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही धाडसी कारवाई करण्यात आली असून, गुन्ह्यात वापरलेल्या टमटम वाहनासह एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
मिळालेल्या सविस्तर माहितीनुसार, २३ मे २०२६ रोजी पहाटेच्या सुमारास हायवेवरून जाणाऱ्या एका चालत्या ट्रकमधून अज्ञात चोरट्यांनी मेंढ्या काढून चोरून नेल्याची घटना घडली होती. या गंभीर घटनेची दखल घेत धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांनी तात्काळ कारवाईचे आदेश दिले. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री. विनोद इज्जपवार यांच्या मार्गदर्शनाखाली तात्काळ एलसीबी, आरसीपी (RCP) पथक क्रमांक १ आणि क्यूआरटी (QRT) चे विशेष पथक अज्ञात आरोपींच्या व चोरी गेलेल्या मुद्देमालाच्या शोधासाठी रवाना करण्यात आले.
अशी झाली कारवाई...
तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत अत्यंत महत्त्वाची माहिती मिळाली की, येरमाळा येथील हायवेवरील ब्रिजजवळ, तेरखेडा लक्ष्मी पारधी पिढी आणि उमरा पारधी पिढी येथील काही इसमांनी चालत्या ट्रकमधून मेंढ्या चोरून आणल्या आहेत. या मेंढ्या तेरखेडा जवळ हायवेच्या बाजूला असलेल्या बाभळीच्या झाडाखाली उभ्या केलेल्या एका लाल रंगाच्या टमटममध्ये ठेवण्यात आल्या आहेत.
माहिती मिळताच पथकाने तात्काळ येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि श्री. तात्याराव भालेराव यांना सोबत घेऊन घटनास्थळ गाठले. पोलिसांची गाडी पाहताच बाभळीच्या झाडाखाली टमटमजवळ बसलेले ७ ते ८ अज्ञात इसम पोलिसांना पाहून तिथून पळून गेले. पोलिसांनी त्यांचा पाठलाग केला, परंतु झाडीझुडपांचा फायदा घेत ते पळून जाण्यात यशस्वी झाले.
तपास पथकाने घटनास्थळावरील लाल रंगाच्या टमटमची तपासणी केली असता, त्यात चोरी गेलेल्या २४ मेंढ्या आढळून आल्या. पोलिसांनी तत्परतेने फिर्यादीस फोन करून मेंढ्यांचे वर्णन विचारले असता, सापडलेल्या मेंढ्या त्याच असल्याच्या खात्री झाली. पोलिसांनी २४ मेंढ्या (किंमत रु. २,०१,०००/-) आणि गुन्ह्यात वापरलेली टमटम असा एकूण ३ लाख १९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पुढील कायदेशीर कारवाईसाठी येरमाळा पोलीस ठाण्यात हजर केला आहे.
तपास पथक:
ही कौतुकास्पद कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीमती रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि सचिन खटके, येरमाळा पोलीस ठाण्याचे सपोनि तात्याराव भालेराव, पोलीस हवालदार विनोद जानराव, नितीन जाधव, बबन जाधवर, महिला पोलीस अंमलदार शोभा वाघमारे, येरमाळा पोलीस ठाण्याचे संतोष तिघाडे, संदीप चौगुले, रोहित दंडनाईक, आरसीपी पथक क्र. १ व क्यूआरटी (QRT) पथकाने केली आहे. धावत्या वाहनातून होणाऱ्या चोरीचा अवघ्या २४ तासांत छडा लावल्याबद्दल धाराशिव पोलिसांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
0 Comments