(सौ. सिमाताई माडजे,जि.प. सदस्या)
तुळजापूर | Only न्यूज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर तालुक्यातील ग्रामीण भागातील आरोग्य सुविधांना बळकटी देण्यासाठी जिल्हा परिषद सदस्या सौ. सिमाताई भैरवनाथ माडजे यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला अखेर यश आले आहे. तालुक्यातील मौजे तिर्थ बु. येथे नवीन आरोग्य उपकेंद्र आणि मौजे आरळी बु. येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्याचे परिपूर्ण प्रस्ताव जिल्हा परिषद धाराशिवच्या आरोग्य विभागाकडून आरोग्य सेवा उपसंचालक, लातूर यांच्याकडे सादर करण्यात आले आहेत. याबाबतची अधिकृत पत्रे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतिश हरिदास यांनी २ नोव्हेंबर २०२६ रोजी निर्गमित केली आहेत.
तिर्थ बु. येथे आरोग्य उपकेंद्राचा प्रस्ताव
मौजे तिर्थ बु. (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे नवीन आरोग्य उपकेंद्र मंजूर करण्यासाठी जि.प. सदस्या सौ. सिमाताई माडजे यांनी १७ जुलै २०२६ रोजी शिफारस पत्र दिले होते. तसेच तिर्थ बु. ग्रामपंचायत सरपंच व ग्रामपंचायत अधिकाऱ्यांचे १६ जुलै २०२६ चे पत्र आणि तालुका आरोग्य अधिकाऱ्यांचा २६ ऑक्टोबर २०२६ चा अहवाल विचारात घेऊन हा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे.
शासनाच्या १७ मार्च २०१७ व १९ सप्टेंबर २०१७ च्या मार्गदर्शक सूचनांनुसार हा परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला असून, यास आरोग्य समितीच्या ६ ऑगस्ट २०२६ च्या सभेत आणि जिल्हा नियोजन समितीच्या १७ सप्टेंबर २०२६ च्या सभेत मान्यता देण्यात आली आहे. आता हा प्रस्ताव दोन प्रतींत पुढील मंजुरीसाठी लातूर येथील उपसंचालक कार्यालयाकडे पाठविण्यात आला आहे.
आरळी बु. येथे प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी हालचाली
दुसरीकडे, मौजे आरळी बु. (ता. तुळजापूर, जि. धाराशिव) येथे नवीन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी सौ. सिमाताई माडजे यांनी १० ऑगस्ट २०२६ रोजी शिफारस पत्र सादर केले होते. तालुका आरोग्य अधिकाऱ्यांच्या २६ ऑक्टोबर २०२६ च्या पत्रानुसार आणि शासनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार परिपूर्ण प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रस्तावाला जिल्हा नियोजन समितीच्या १७ सप्टेंबर २०२६ च्या सभेत तसेच आरोग्य समितीच्या २२ सप्टेंबर २०२६ च्या सभेत मान्यता मिळाली असून, पुढील कार्यवाहीसाठी तो दोन प्रतींत लातूर येथील आरोग्य सेवा उपसंचालकांकडे पाठविण्यात आला आहे.
ग्रामीण आरोग्याला चालना
तिर्थ बु. आणि आरळी बु. परिसरातील नागरिकांना प्राथमिक व तातडीच्या वैद्यकीय उपचारांसाठी दूरवर जावे लागत होते. दोन्ही आरोग्य संस्थांचे प्रस्ताव वरिष्ठ स्तरावर पाठविण्यात आल्याने या भागातील आरोग्य सेवा अधिक सक्षम होण्याची आशा निर्माण झाली आहे. या दोन्ही प्रस्तावांच्या प्रती माहिती व योग्य कार्यवाहीसाठी मुख्य कार्यकारी अधिकारी, जि.प. सदस्या सौ. सिमाताई माडजे तसेच संबंधित ग्रामपंचायतींना पाठविण्यात आल्या आहेत.
0 Comments