Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

शैक्षणिक क्षेत्रातील आदर्श व्यक्तिमत्व : प्रा. सुधाकर कुलकर्णी

        
मुरूम :- प्रा. डॉ. महेश मोटे
राज्यशास्त्राचे ज्येष्ठ समीक्षक तथा विश्लेषक आदरणीय गुरुवर्य प्रा. सुधाकर अच्युतराव कुलकर्णी हे पाथरी तालुक्यातील दोन हजार लोकवस्तीच्या उक्कलगांव या छोटया खेड्यात एका साधारण कुटुंबात ता. १० सप्टेंबर १९५० रोजी जन्मले. अत्यंत शांत व संयमी व्यक्तिमत्व म्हणजे गुरूवर्य कुलकर्णी सर होय. तसं हे गाव मानवत शहरालगत पाच किलोमीटर अंतरावर असलेल्या एका नदी रस्त्यात असून तोही त्यावेळीचा अडगळीचा रस्ता होता. त्यांचे दुसरीपर्यंतचे शिक्षण एका खाजगी घरगुती शाळेमध्ये झाले. इयत्ता तिसरी ते दहावीपर्यंतचे शिक्षण मानवत येथील जिल्हा परिषद शाळेत तेही पायी ये-जा करून झाले. सध्याचा तालुका सेलू येथील केंद्रातून ते मॅट्रिक परीक्षेत द्वितीय श्रेणी मिळवून पास झाले. त्यानंतर ते उच्चशिक्षणासाठी परभणी येथील श्री छत्रपती शिवाजी महाविद्यालयातून पदवी तर औरंगाबाद येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातून राज्यशास्त्र विषयात विभाग प्रमुख डॉ. जी. एन. शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली पदव्युत्तर वर्गातून द्वितीय श्रेणी प्राप्त केली. त्यावेळी ते गावातून पहिले मॅट्रिक, पदवी व पदव्युत्तर शिक्षण पूर्ण करणारे विद्यार्थी ठरले. त्यांचे संपूर्ण कुटुंब शेतीशी निगडीत असल्याने वडील शेती करत असत. वडिलांचे शिक्षण केवळ पाचवीपर्यंतचे तर आई-आजी अशिक्षित होत्या. प्रतिकूल काळात जिद्दीच्या जोरावर अनंत अडचणींचा सामना करत-करत त्यांनी उच्चशिक्षण पूर्ण केले. कशाचीही तमा न बाळगता मराठी माध्यमाच्या शाळेतून इंग्रजीवर प्रभुत्व मिळविणे, त्यावेळी कठीण असताना देखील त्यांनी स्वतःला झोकून देऊन अभ्यासक्रम एकाग्रपणे पूर्ण केला. या सगळ्या गोष्टींच्या मागे त्या काळातील शिक्षकांचा मोठा धाक, मार्गदर्शन व प्रेरणा राहिल्या. खेड्यातून आल्याने स्वाभाविकच त्यांचा स्वभाव लाजराबुजरा, मितभाषी, अबोल राहिला. त्यावेळी त्यांना घरच्या परिस्थितीची खूप जाणीव होती. त्याकाळी आजच्या सारखी साधने किंवा सुविधा नव्हत्या. शिक्षक-प्राध्यापकांशी फारसा संवाद साधने किंवा जवळीकता निर्माण होणे शक्य नव्हते. शिक्षकांप्रति समाज व विद्यार्थ्यांमध्ये आदरयुक्त भीती होती. घरातून किंवा समाजातून कोणीही बहुमोल मार्गदर्शन करणारे नव्हते. महाविद्यालयीन शिक्षण घेत असताना त्यांना कविता लिहीण्याची व वाचनाची आवड होती. साहित्य वाचनाच्या क्षेत्रात देखील ते कमी नव्हते. त्यांनी केशवसुत, यशवंत मोरोपंत, कवी बी, केशवकुमार, लेखक प्र. के. अत्रे, पु. ल. खांडेकर, शिवाजी सावंत, रणजीत देसाई, महात्मा गांधीची धार्मिक गीता, ज्ञानेश्वरी, बसव चरित्र, स्वामी विवेकानंद व दयानंद सरस्वती यांचे चरित्र, तुकाराम गाथा, छत्रपती शिवाजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व स्वामी रामानंद तीर्थ चरित्र आदी ग्रंथांचे वाचन करुन त्याकाळी ते समजूनही घेतले. सर महाविद्यालयात आपल्या दिनचर्यपैकी काही वेळ काढून दररोज ग्रंथालयात जावून दैनिक मराठवाडा, लोकसत्ता, महाराष्ट्र टाइम्स, टाइम्स ऑफ इंडिया, द हिंदू,  फ्री प्रेस, नवभारत टाइम्स आदी वृत्तपत्रे नित्यनियमानी वाचून महत्वाचे टिपण काढत असत. त्यामुळे चालू घडामोडी, समाज जीवनातील गतिशील प्रवाह समजून घेता आले. सरांनी मेहनत व परिश्रमाला जीवनात खुप महत्व दिल्याने त्यांनी कष्टात आनंद मानुन स्वबळावर  आयुष्याची वाटचाल करत आहेत. त्यांनी श्री महात्मा बसवेश्वर महाविद्यालयात १९७३ ते २०१० पर्यंत म्हणजे एकूण ३७ वर्षाच्या शैक्षणिक क्षेत्रातील प्रवासामध्ये स्वतंत्र विचारधारा, तटस्थपणे लेखन, समाजातील ज्वलंत प्रश्नांची चिंता, चिंतन आणि मंथन करण्याकरिता वृत्तपत्र, मासिके, नियतकालिकांमध्ये विविध विषयांवरती लेखन केले. याच महाविद्यालयात ते १९७८ पासून राज्यशास्त्र पदवी विभाग प्रमुख तर पुढे १९९४ पासून पदव्युत्तर विभाग प्रमुख म्हणून कार्यरत राहिले. याच काळात अनेक विद्यार्थी विद्यापीठाच्या गुणवंत्ता यादीत येऊन महाराष्ट्रातील विविध नामवंत वरिष्ठ महाविद्यालयात शेकडोच्यावर प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट अध्यापनाचे कार्य करीत आहेत. तसेच सरांचे विचार आत्मसात करुन ही सर्व मंडळी निव्यर्सनी राहून नैतिकता व चारित्र्य संपन्नतेला महत्व देवून जीवनाची वाटचाल करीत आहेत, हे आज फार महत्वाचे आहे. त्याकाळी या महाविद्यालयातून राज्यशास्त्र पदव्युत्तर विभागातून बाहेर पडलेल्या कितीतरी विद्यार्थ्यांना वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालयात सेवा व काम करण्याची संधी मिळाली. कदाचित हे एकमेव उदाहरण असू शकेल. तसेच त्यांनी इतिहास पदव्युत्तर विभागात दहा वर्ष भारतीय विचारवंत हा विषय नियमित शिकविला. त्यांनी लातूरच्या राजर्षी शाहू महाविद्यालयात गेस्ट लेक्चर म्हणून एम. फीलचे वर्गही घेतले. तसेच पदवीच्या अभ्यासक्रमातील मानवी हक्क हा स्वतंत्र विषय विद्यार्थ्यांना शिकविला. याच विषयाच्या अनुषंगाने एक चर्चासत्र ठेवून विषयतज्ञ तर जे. एस. मिल यांच्या स्वातंत्र्य या विषयावर ही एक चर्चासत्र आयोजित करुन विषयतज्ञ म्हणून मार्गदर्शन करुन भूमिका पार पाडली. त्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेच्या विविध शिबीरात, परिषदा, चर्चासत्रे, कार्यशाळेसह शाळा व महाविद्यालयात अनेक विषयांवर व्याख्याने दिली आहेत. ते स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विषयाच्या अभ्यास मंडळाचे सदस्य म्हणूनही अभ्यासक्रम बनविताना विद्यार्थ्यांच्या करिअरचा दूरदृष्टी ठेवून त्यांनी मोलाचे योगदान दिले. त्यांनी सामाजिक शास्त्रातील अकरा अभ्यासक्रमावर आधारित ग्रंथसंपदा प्रकाशित केली. त्यापैकी काही पुस्तके विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात आजही लागू करण्यात आली आहेत. त्यांनी सन २०११ साली जळगाव जिल्हयात आयोजित महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या अधिवेशनाचे व मराठवाडा राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषदेच्या अधिवेशनाचे अध्यक्षस्थानही भूषविलेले होते. त्यांनी विविध परिषदांमध्ये २६ च्यावर संशोधन पेपरचे सादरीकरण केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद, चर्चासत्रांमध्ये ४१ वेळा पेपर वाचन केले. अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेमध्ये पाच पेपरचे सादरीकरण तर महात्मा गांधी अखिल भारतीय परिषदेत तीन वेळा संशोधन पेपर सादरीकरण केले.                
आजच्या सारखे त्याकाळी राज्यात फारसे परिषदांच्या आयोजनाबाबत कोणीही पुढाकार घेत नव्हते. सदर परिषद यशस्वी करण्यामध्ये राज्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. विठ्ठल मोरे, या परिषदेचे अध्यक्ष प्रा. के. आर. बंग तर कार्याध्यक्ष प्रा. सुधाकर कुलकर्णी यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे व माझ्या पाठीशी खंबीर उभे राहिल्यामुळे या परिषदेमध्ये ५४० प्रतिनिधींनी सहभाग नोंदवून काहींनी तर उत्कृष्ट पेपर वाचन केले. या परिषदेबाबत आजही बोलक्या प्रतिक्रिया मला सर्वत्र ऐकायला मिळतात. याचे सर्व श्रेय सदर व्यकींना जाते. परिषदेच्या आयोजनाबाबतचा माझा जीवन अनुभव काहीच नव्हता. त्यात मी ग्रामीण भागातील महाविद्यालयात कार्यरत. तेंव्हा संपूर्ण जबाबदारी माझ्यावर पडली. त्यावेळी मला सरांनी मोठा आधार देवून माझ्यात आत्मविश्वास वाढविला, की तु हे निश्चित करू शकतोस. तेव्हा मुरूमच्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयात आयोजित १६ वी मराठवाडा राज्यशास्त्र व लोकप्रशासन परिषद, दि.२७ व २८ जानेवारी २००३ मध्ये संपन्न झाली. या परिषदेमध्ये संदेश नावाची स्मरणिका प्रकाशित करून त्यामध्ये कार्याध्यक्ष या नात्यांने सरांनी त्यांचे बोलके मनोगत व्यक्त केले होते. तसेच महाराष्ट्रातील राजकारणाचा ढासळता दर्जा या विषयावर त्यांनी आपला संशोधन पेपर मांडून या विषयावरील सरांच्या सादरीकरणाला श्रोत्यांनी भरभरून दादही दिली होती. सदर पेपरच्या मांडणीबाबत आजही माझ्या महाविद्यालयात त्यांच्याप्रती  आठवण काढली जाते. त्यांनी वर्तमानपत्र, दिवाळी अंकातूनही विविध विषयावर प्रासंगिक लेख व कविता प्रकाशित झाल्या आहेत. अखिल भारतीय संगीत संमेलन, लातूर यामध्ये सहसंपादक, सहसचिव म्हणून तर मराठवाडा संगीत संमेलन, लातूर यामध्ये संपादक म्हणून उत्कृष्ट कार्य केले आहे. एस. एम. जोशी जन्मशताब्दी कार्यक्रमात प्रकाशित झालेल्या स्मरणिकेचे सहसंपादक म्हणून त्यांनी मौलिक भूमिका बजावली आहे. विद्यार्थ्यांच्या व्यक्तीमत्वाच्या विकासाबरोबर नेतृत्वाची जडण-घडण व्हावी, या उद्येशाने दरवर्षी होणाऱ्या नागपूर येथे आयोजित सात दिवसाच्या संसदीय अभ्यास वर्ग या हिवाळी अधिवेशानामध्ये विद्यार्थ्यांचे प्रतिनिधीत्व सरांनी केले. शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी त्यांनी गोवा, नागपूर व औरंगाबाद येथे विशेष उजळणी वर्ग पूर्ण केले. समाजाच्या मातीत ज्ञानाचा पाऊस पाडल्याशिवाय विचारांचे अंकुर उमलत नाही, या जाणिवेतून भक्कमपणे उभे राहाणे गरजेचे ठरते. आपण जसा विचार करतो तसे घडतो. यावर प्रचंड विश्वास ठेवून त्यांनी सातत्याने नियोजन, वेळेचे व्यवस्थापन, शिस्तीची सवय लावून प्रत्यक्ष कृतीशीलपणे जगण्याला प्राधान्ये दिले आहे. त्यांनी ज्या गोष्टी बदलता येण्यासारख्या आहेत, त्या अधिक चांगल्या पद्धतीने बदलणे महत्वाचे मानले. हा बदल घडवून आणायला कृतीच लागते आणि ती कृती नेहमीच विचारावर आधारलेली असते. आपल्या विचाराप्रमाणे आपण आपल्या कृतींची बीजे पेरत असतो आणि जसे आपण पेरतो तसेच उगवते. म्हणून आपण चांगला विचार केला तर आपण चांगले बनतो यावर त्यांचा प्रचंड विश्वास राहिला. आपण महान विचार केला तर आपल्या हातून महान कार्य घडू शकते. आपले आचरणच आपल्या व्यक्तिमत्त्वाला आकार देते आणि आपली कृतीशीलता म्हणजेच आपल्या विचारांचा परिणाम असतो. म्हणून जर आपल्याला काही विशेष व्हायचे असेल तर आपण आपल्या विचारांची काळजी घेऊन वागले पाहिजे, असा विचार करत अडले-नडलेल्या गरीबांना मदत करणे, विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे. कुठल्याही संकटावर मात कशी करावी हा गुण त्यांच्याकडून आम्हा विद्यार्थ्यांना शिकायला मिळाला. माझ्यासारखे हजारो विद्यार्थी सरांच्या हातून घडले. जसे सर घडले, तसे आज आम्ही विद्यार्थी घडत आहोत. यामुळे सरांच्या विचारांचा वसा आणि वारसा आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात विविध क्षेत्रात असलेले विद्यार्थी जोपासत आहेत. ही खूप अभिमान व गर्वाची बाब आहे. आजही सर आपल्या विद्यार्थ्यांवर जीवापाड प्रेम करतात. विद्यार्थी शिकत असताना त्यांच्या अडी-अडचणी समजून घेऊन वागल्यामुळे आजही सरांबद्ल विद्यार्थ्यांच्या मनातील प्रेम इतकिंचित देखील कमी झाले नाही. सर महात्मा बसवेश्वर महाविद्यालयातील व्याख्यानमाला व वाद-विवाद स्पर्धा विभागाचे प्रमुख म्हणून अनेक वर्षापासून कार्य करत असताना राज्यातील विविध वक्तृत्व स्पर्धा व वाद-विवाद स्पर्धेमधून महाविद्यालयाला स्पर्धकांनी अनेक पारितोषिके मिळवून देऊन महाविद्यालयाचे नाव उज्ज्वल केले. त्यामध्ये सरांचे मोलाचे मार्गदर्शन स्पर्धकांना लाभले. यामुळे सरांचे महाराष्ट्रभर विद्यार्थी चाहते बनले आहेत. त्यांची विद्यार्थीप्रिय प्रतिमा असल्यामुळे ते सर्व विद्यार्थ्यांच्या हृदयातील ताईत बनले आहेत. त्यामुळेच त्यांचे हवेहवेसे वाटणारे व्यक्तीमत्व आजही विद्यार्थ्यांच्या मनामध्ये त्यांच्याबद्दल आदरयुक्त भिती, भावना व आदराचे स्थान आहे. आजही ते महाविद्यालयातून बाहेर पडलेल्या माजी विद्यार्थ्यांशी नेहमी विचारपूस व संवाद साधतात, हे विशेष होय. राज्यशास्त्र हा विषय नाविन्यपूर्ण व अद्यावत पध्दतीने शिकावा तर फक्त कुलकर्णी सरांकडून कुठलाही सिद्धांत ते सहज समजेल असे सोप्या भाषेत विद्यार्थ्यांना समजावून सांगत. एखादा सिद्धांत त्यांनी शिकविला, की तो पुन्हा विसरणे नाहीच, म्हणजे एक उत्तम प्राध्यापक, विषयाची प्रभावी मांडणी, भाषेवर प्रभुत्व, विविध संदर्भ ग्रंथांचा आधार घेऊन विद्यार्थ्यांना शिकवत असल्याने बहुमोल व अद्यावत ज्ञान मिळत असे. त्यांचा तास चुकविणे दुर्मिळच असे आणि त्यांच्या तासाला वर्गात तोबागर्दी असायची. कला शाखेत नव्याने प्रवेश घेतलेल्या एखाद्या विद्यार्थ्यांने त्यांचा तास केल्यास, तो त्यांच्या आवडीचा विषय बनायचा. ते एक चांगले वक्ते तर आहेतच त्याचबरोबर त्यांच्यातील सुस्पष्टता, नेमकेपणा, नियोजनबद्धता, दिलखुलास स्वभाव, माणसे जोडण्याची कसब, अचुक निर्णय क्षमता, आपले मुद्दे पटवून देण्याची कला व कौशल्ये ही त्यांच्यातील कितीतरी गुणवैशिष्टये आहेत. पण ती इथे मांडणे कठीण होत आहे. आपल्याकडे असणारे सर्वप्रकारचे कलागुण जोपासून सामाजिक बांधिलकीची भावना उराशी बाळगून सार्वजनिक क्षेत्रातील त्यांच्यावरती कोणतीही  जबाबदारी दिल्यास ते तन-मन-धनाने पार पाडत.  कुलकर्णी सर म्हणजे शिक्षण या आवडीच्या क्षेत्रात ते विकसनशील झाले आहेत. सरांनी आपल्या कुटुंबातही खेळीमेळीचे वातावरण ठेवले असून त्यांच्या सुविद्य पत्नी इंदुमती या दोघांनीही अनेक सामाजिक, सांस्कृतिक व शैक्षणिक उपक्रमात सहभाग नोंदविला आहे. कुठलेही सार्वजनिक कार्य पार पडत असताना सर आपल्या कुटुंबीयांना त्यात सहभागी करून घेत असत. आपल्यात झालेले चांगले बदल आपल्या कुटुंबीयांत व आपल्या परिवारातील इतर सदस्यात यावेत, यासाठी ते सतत धडपडत असतात. सरांनी त्यांच्या तीन्ही मुलांना उच्च शिक्षीत बनवले. डॉ. अमित हा एम. डी.(मानसोपचार तज्ञ, मुंबई), डॉ. अनिकेत (बी. ए. एम. एस., मुंबई) तर अभिजीत (इंजिनिअर, पुणे) येथे उत्कृष्ट कार्य करीत आहेत. थोडक्यात काय तर आजचा सुयोग्य संघर्ष उद्याचे सामर्थ्य निर्माण करतो. ते म्हणतात, विचार बदला, सकारात्मक रहा, आयुष्य बदलेल. या विचाराने प्रेरित होऊन चांगले ध्येय साध्य करण्यासाठी व चांगला माणूस बनण्यासाठी विद्यार्थ्यांना सतत प्रेरणा देणे, त्यांच्यात आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना महत्वकांक्षी बनविणे, त्यांना निर्व्यसनी राहण्यास प्रवृत्त करणे आणि वेळ पाळण्याची सवय व वेळ वाया न घालवण्याची सवय शिकावी तर कुलकर्णी सरांकडून सर्वसाधारणपणे लोकांमध्ये सततचा एक गैरसमज असतो, की एखाद्या सभेला गेल्यानंतर सभा वेळेत सुरू होणे, हे अशक्य आहे. हेच ग्राह्य धरलेलं आपल्या आजूबाजूला दिसून येतं. त्यावर कोणी नाराजीदेखील व्यक्त करत नाहीत. इंडियन टाइमिंग या नावाखाली या गोष्टी सहजपणे खपवल्या जातात. उलट, सभेत जो उशिरा येतो. तो सर्वात जास्त मोठा समजून त्याला नावलौकिकता प्राप्त होते. त्यामुळे सभेचा मुख्य पाहुणा हा उशिराच यायला हवा, हे गृहीत धरलं जातं पण खऱ्या अर्थाने जी शिस्तबद्ध मोठी माणसं असतात ती मात्र वेळ पाळत असतात. उलट, त्यांना उशीर झाल्यास, काही कारणाने त्यांच्या कार्यक्रमाला उशीर झाल्यास हे लोकं अस्वस्थ होतात. त्यांच्यामुळे जर कार्यक्रमाला उशीर झालाच तर ते आल्या-आल्या मनापासून माफी मागतात. आपल्या मुलांमध्ये वेळ पाळायची सवय ही असायलाच हवी, असे सर नेहमी सांगत. सर्वप्रथम मुलांमध्ये वक्तशीरपणा येईल आणि त्या वक्तशीरपणामुळे मुलं आपोआपच कार्यक्षम होतील. जी मुलं वेळ पाळतात, त्यांची स्वप्रतिमा ही कायम उंचावलेली असते. अशीच मुलं काहीतरी उत्कृष्ट  काम करु शकतात. वेळ पाळणं अत्यंत आवश्यक आहे. हे आपल्या मुलांना देखील आपण सांगितलं पाहिजे, असे सर सांगत असतं. आपल्याकडे असणाऱ्या घड्याळाचा उपयोग कशासाठी असतो, तर वेळ पाहून वेळेत जाण्यासाठी असतो. हे आम्हा सर्व मुलांना समजावून सांगत. जर तुमच्याकडून समजा कधी वेळ पाळली गेली नाही तर तुम्ही मुलांना त्यासाठी सॉरी म्हणा. घरातील मुलांना शाळेत जाताना उशीर होणार नाही, याची पूर्ण काळजी घेतली पाहिजे. मुलांना शाळेत पाठविताना शाळेत जाण्याची बस, रिक्षा किंवा ज्या पद्धतीने तुमची मुले शाळेत जात असतील तिथपर्यंत त्यांना वेळेत पोहोचविण्यासाठी मुलांना मदत करणे. डबा तयार व्हायला किंवा तत्सम गोष्टींमध्ये आपल्यामुळे मुलांना उशीर होणार नाही याची काळजी घ्या. मुलांसमोर बोलताना, उशिरा आलो तर काय फरक पडतो ? इंडियन टाइमिंग आहे, चालतं उशीर झाला तर, असे शब्द अजिबात वापरू नका. उलट, वेळ पाळण्याचं महत्त्व काय असतं हे मुलांना वेळोवेळी उदाहरणाने देवून समजावून सांगा. तुमच्या ऑफिसमध्ये तुम्ही कसं वेळेवर जाता, तुमच्या ऑफिसमध्ये अजून बाकी लोक कसे वेळेत येतात किंवा तुमच्या कामाच्या ठिकाणी लवकर येण्यासाठी किती महत्त्व आहे, हे चर्चेद्वारे, वेगवेगळ्या उदाहरणांद्वारे घरातील मुलांना सहज सांगा, जेणेकरून वेळ पाळणं आवश्यकच आहे. हे त्यांना आपोआपच कळेल. समजा, मुलांना उठायला उशीर होत असेल तर असं काय करता येईल, जेणेकरून आपलं मूल वेळेत उठेल, यावर विचार करा आणि योग्य ती पावलं उचला. काही कारणामुळे मुलांना वेळ पाळता येत नसेल तर त्यांना त्यासंबंधी सॉरी किंवा दिलगिरी व्यक्त करायला शिकवा. वेळेचे व्यवस्थापन करण्यास शिकवा. जो वेळेचं व्यवस्थापन करू शकतो. तो स्वतः स्वतःच्या जीवनाचे आणि त्याचबरोबर आपल्या आजूबाजूच्या परिस्थितीचंही आपोआपच व्यवस्थापन व नियोजन करू शकतो. अपयश ही यशाची पहिली पायरी आहे. यामुळे अपयशाकडून नवीन काहीतरी आपण शिकलं पाहिजे. जे अपयशाकडूनही आपणाला काहीतरी अनुभव घेता येऊ शकतो. तेव्हा अपयशासमोर जाण्याची सवय लावली पाहिजे. अनेकांना अनेक चांगल्या गोष्टी दिसतात पण कौतुक करण्यासाठी मनाचा मोठेपणा नसतो. आपणही आपल्या मुलांना या चांगल्या सवयी लावू शकतो. इतरांनी केलेल्या चांगल्या कामाचे कौतुक आपण जर सातत्याने करत राहिलो तर निश्चितच मुलंही तो आदर्श पुढे चालू ठेवतील. इतरांचे शांतपणे ऐकून घेऊन बोलण्याची सवय हा देखील आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये गुणधर्म असायला हवा, अशा कितीतरी गोष्टी त्यांनी आम्हा सर्व विद्यार्थ्यांना शिकविल्या, त्यामुळेच आम्ही आजही त्यांना आदर्शवत मानून ज्या क्षेत्रामध्ये आम्ही काम करतो आहोत, ते काम करताना आम्हाला मानसिक बळ व समाधान मिळत आहे. त्यांच्या या आदर्श शैक्षणिक योगदानाबद्ल त्यांना पुणे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अकादमीने आदर्श शिक्षक पुरस्कार तर नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाने ही त्यांना आदर्श शिक्षक पुरस्काराने गौरविले. मितभाषी व्हावे, जीवन आनंदी सुंदर करावे, संयमाने कामक्रोध हाटवावे, आनंदी झरा वाहू द्यावे. याप्रमाणे सर म्हणजे जर मोल शब्दांचं जपलं तर आयुष्य अनमोल, आपलं जर जपलं मोल प्रेमाचं तर जीवन प्रफुल्लित सर्वांचं या पध्दतीने सर जीवनाची वाटचाल करत आहेत. सरांनी त्यांच्या सेवानिवृत्तीनंतर आपल्या माजी विद्यार्थ्यांना म्हणजेच जे सेवेत प्राध्यापक म्हणून रुजू झाले आहेत. अशा विद्यार्थ्यांना घरी बोलावून त्यांच्या ग्रंथालयातील प्रत्येकी १० ग्रंथ त्यांनी भेट म्हणून दिले. ज्ञानवृद्धी व्हावी हा त्यामागे उद्देश आहे. तसेच त्याचा उपयोग विद्यार्थ्यांना होईल, ही या पाठीमागची सरांची भावना होती. ज्ञानावर निष्ठा आणि श्रद्धा हवी. आयुष्यभर ज्ञानर्जनाचे कार्य करणारे, अध्ययन, अध्यापनात सर्वस्व वेचणारे सर, त्यांच्याविषयीं शेवटी मनावसं वाटतं, जिंदगी कॉटो का सफर हैं I हौंसला इसकी पहचान हैं I रास्ते पर सभी चलते है I जो रास्ते बनाये वही इंन्सान हैं । सरांना दीर्घायुष्य लाभो, जीवन l सुखी-समाधानी बनो, या जाणिवेतून पुढील वाटचालीस मनःपूर्वक हार्दिक शुभ कामना ! शुभ भावना ! हार्दिक शुभेच्छा !      आपलाच विद्यार्थी.....                    
 प्रा. डॉ. महेश मोटे  संशोधन मार्गदर्शक राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर विभाग व संशोधन केंद्र                    श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम ता. उमरगा, जि. धाराशिव.भ्र. क्र. ९९२२९४२३६२

Post a Comment

0 Comments