Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

महर्षी व्यासांचा, कृष्ण भगवान हा वैचारिक व समीक्षात्मक मराठी ग्रंथ साहित्यक्षेत्रातील मोठी उपलब्धी

मुरुम/प्रा. महेश मोटे 
'महर्षी व्यासांचा, कृष्ण भगवान' हा वैचारिक व समीक्षात्मक ग्रंथ प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे लिखीत मराठी साहित्यक्षेत्रात फार मोठी उपलब्धी झाली आहे. त्यांची ज्ञानरुपी वैचारिक साधना, वस्तुनिष्ठता,  अभ्यासाची रुची, चिकित्सात्मक दृष्टीकोन व समाजभान लक्षात घेऊन त्यांनी या नवीन ग्रंथाची निर्मिती केली आहे. 

हा ग्रंथ वैचारिक दृष्ट्या खूप प्रगल्भ आहे. बुद्ध आणि कृष्ण यांच्या भूमिकेतील अंतर कमी करण्याचा त्यांचा प्रयत्न दिसून येतो. ईश्वराच्या अस्तित्वाबाबत आस्तिक की नास्तिक या दोन्हीचा सुरेख संगम मानव कल्याणाशी जोडण्याचा विवेकवादी दृष्टीकोन, बुद्धीप्रामाण्यवाद त्यांनी जोपासल्याचे दिसून येते. या ग्रंथातून नव्याने संशोधनात्मक कार्य करणाऱ्या पिढीला चालना देणारे, लेखकांची काही ठाम मते स्पष्टपणे मांडण्यात आली आहेत. अभ्यासाअंती नोंदविलेली मते सत्य स्वरूपात जाणवतात. रामकृष्ण, शिवपार्वती, सूर्य या देवदेवता इजिप्त, सुमेर, ग्रीक, पर्शियन आणि सिंधू संस्कृतीमध्ये जन्माला येऊन विकसित झाल्या. विविध संस्कृती व देशाच्या देव-देवतांविषयींच्या संकल्पना भिन्न-भिन्न स्वरुपात असतात. त्यात काही प्रमाणात साम्य आहे, असे गृहीत धरून वैदिक धर्माचा व्यापक नकाशा प्राचीनकाळी वेगवेगळ्या देशाला सामावून घेणारा असल्याचे मत डॉ. सलगरे यांनी मांडले आहे. 

रामायण आणि महाभारत या दोन्ही महाकाव्यांची निर्मिती पशुपालक व मेंढपाळ जमातीच्या भटक्या लोकांनी केल्याचे मत नोंदविले आहे. महाकाव्याच्या निर्मितीसाठी स्थिरता आणि शांतता आवश्यक असते. भटक्या लोकांना ती कधीच प्राप्त झाली याची इतिहासात नोंद नाही. याचा अर्थ भटक्या लोकात प्रतिभाच नव्हती,असे मानण्याचे कारण नाही. परंपरेने व्यास आणि वाल्मिकी ऋषींनीच ही महाकाव्ये रचल्याचे डॉ.सलगरे सुद्धा हे सत्य मान्य करतात. पण भटक्या लोकांना महाकाव्य निर्मितीचे श्रेय दिले पाहिजे, व्यास-वाल्मिकीचे जन्मसंदर्भ भटक्या समाजातील असावेत, असे ते मांडतात. इ. स. पूर्व १००० वर्षापर्यंतची प्राचीन भारतीय सनातन वैदिक, सिंधूसंस्कृतीचा काळ म्हणजे राम-कृष्णाचा काळ हा निष्कलंक व अनुकरणीय असून संपन्न आणि निसर्गधर्माशी सुसंगत होता. तर ब्राह्मण धर्माने वैदिक सनातन धर्माची कुचंबणा करून वर्णव्यवस्था ताठर करून जातव्यवस्थेचे संगोपन केले. ब्राह्मण धर्म हा हिंदू धर्म म्हणून पुढे आलेला आहे. ब्राह्मण धर्म लपवून हिंदू धर्म हा शब्द आणला गेला. ब्राह्मण धर्म हा टाकाऊ आहे, असे लेखक कुठेही म्हणत नाहीत परंतु ब्राह्मणांनी काही  चुकीच्या प्रथा ज्यामध्ये मूर्ती पूजा होय. यावर लेखकाचा आक्षेप आहे. ब्राह्मणवादी वृत्तीवर सकारण आणि मानवतावादी भूमिकेतून डॉ. सलगरे राग व्यक्त करतात. 

राम कृष्णाच्या आध्यात्मिक आदर्शरूपांना ब्राह्मण धर्माने विद्रूप बनवून कर्मकांडात्मक धर्म लोकांच्या माथी मारल्याचे वारंवार या ग्रंथात सात्विक संतापाने ते व्यक्त करतात. आत्मा जागृत असेल तर त्याचे मिलन परमात्म्याशी होतच असते. हा भारतीय तत्त्वज्ञानाचा विचार सिंधू संस्कृतीत, संकटकाळात भारतातून पुढे आल्याचे सांगून तोच विचार महाभारताचा गितोपदेश असल्याची माहिती देताना कृष्णाचा गितोपदेश निश्चितच वेगळा आणि कल्याणकारी असल्याचे सत्य स्पष्टपणे मांडतात. महाभारतकालीन ब्राह्मण आणि ब्राह्मण काळातील ब्राह्मण या संकल्पनेत जमीन आसमानचे अंतर असून दोन्ही काळात ब्राह्मण वर्ण असला तरी दोन्हीच्या स्वरूपात, भूमिकेत बदल दिसतो. राम कृष्णाचा काळ आणि ब्राह्मण धर्माचा काळ यात किमान ५०० ते ६०० वर्षाचे अंतर असल्याचे सांगून कृष्णाच्या काळातील धर्म श्रेष्ठत्व जागतिक तर ब्राह्मण काळातील धर्म स्थानिक आणि संकुचित स्वरूपात असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. ईश्वरी संकल्पना आणि सगुण-निर्गुण स्वरूपात असल्याचे विश्लेषण विवेकवादी भूमिकेतून मांडतात. मुलत: सगुण आणि साकार देव अस्तित्वात नसताना मुर्त्यांनाच देव मानून खरेदी-विक्री करणे, आत्मवंचना आणि अपेक्षाभंगच आहे. अर्थात देवधर्माचा बाजार मांडणे हे घातक असल्याचे पण त्यांनी अधोरेखित केले आहे. द्वापारयुगातील व्यासांचा कृष्ण शिवस्वरूपात असून परिपूर्ण परमात्मा असा आहे. हाच कृष्ण सत्य युगातील श्रीराम असल्याचा दावा ते करतात. देवमूर्ती म्हणजे साक्षात भगवंत नसल्याचे सांगत, भान ठेवूनच तिर्थाटन करावे. निसर्गसौंदर्य डोळे भरून पहावे, असा उपदेश ते करतात. देशातील विविध समाजजीवन डोळसपणे पहावे. त्यात ईश्वरभेटीसम आनंद मिळेल. अर्थात माणसात ईश्वरीदर्शन घेण्याचे लेखक सुचवतात. त्यांचा विवेकवाद सत्यावर आधारलेला आणि त्याच सत्याच्या प्रकाशात काही विधाने ते करतात कोणी ईश्वरास मानो अथवा न मानो, मानवधर्माचे पालन करणे, माणसांवर सहानुभूतीपूर्वक प्रेम आणि आदर ठेवणे, हाच खरा मानवधर्म असल्याचे ते मानतात. ईश्वराच्या अस्तित्वाबाबत श्रद्धा असावी पण अंधश्रद्धा नसावी. ब्राह्मणधर्म देव धर्माचा बाजार मांडून व्यापार करतो. मूर्तिपूजेतून दिशाभूल करतो. कर्मकांडात बुडवून दुःखाच्या खाईत माणसांना ढकलतो, ही वस्तुस्थिती त्यांनी आपल्या ग्रंथात मांडली आहे. मन जिंकूनच अध्यात्माकडे जाता येते. सुसंस्कारातून मोक्ष, सुख आणि प्रतिष्ठा मिळेल पण कच्च्या नास्तिकापासून कायम दूर राहण्याचा सल्ला ते देतात. बुद्धधम्म नास्तिक असताना देखील कृष्ण आणि बुद्ध एकच असल्याचा सिद्धांत ते मांडतात. रामकृष्ण बाबत बुद्धांनी कुठेही भाष्य केलेले नाही. बुद्ध विचाराचे मूल्य आणि महत्त्व ब्राह्मणी धर्माच्या खोटेपणाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पचवले असल्याचे मत त्यांनी मांडले आहे. माणसाच्या दुःखमुक्त अवस्थेशी इमान राखून ईश्वरवादी आणि निरीश्वरवादी दोन्हीही प्रवाहातून सिद्ध होणारे मानवी सुख, समाधान त्यांना महत्त्वाचे व निर्णायक वाटते. कृष्ण आणि बुद्ध या दोन्हीही प्रवाहाचे भिन्न स्वरूप त्यांनी एकात्म रुपात अनुभवले आहे. कृष्ण आणि बुद्ध यांच्या शिकवणुकीमध्ये खूप साम्य असून कृष्ण आदर्श जीवनासाठी मध्यम मार्गाचा पुरस्कार तर भक्ती मार्गाने जगणारा कृष्ण भक्त दुःखमुक्त जीवनाचा हक्कदार आहे. भगवान बुद्धाच्या पंचशील मार्गाने जगणारा बोधिसत्व सुद्धा दुःखमुक्त जीवनाचा हक्कदार आहे. भूतकाळ, भविष्यकाळ आणि वर्तमान जीवनाचा विचार सांगणारे भगवान कृष्ण आणि बुद्ध एकच असून विविध धर्मांचा अभ्यास करत असताना त्यांनी धर्माधर्मांमध्ये संवाद साधण्याचा कसोशीने प्रयत्न केला आहे. खऱ्या अर्थाने महाभारताच्या समीक्षेला आज कोणताही विद्वान हात घालू शकत नाही परंतु डॉ. सलगरे यांनी फार मोठे धाडस केल्याचे दिसून येते. व्यासपीठाऐवजी विचारपीठ म्हणणाऱ्यांच्या मनात व्यास ऋषींबद्दलचा राग आणि द्वेष या ग्रंथात मांडून खंतही व्यक्त केली आहे. व्यासाने वर्ण व जातव्यवस्था जन्माला घातली नाही, हे वास्तव त्यांनी लक्षात आणून दिले. व्यासांनी इतिहास लिहिला. व्यास म्हणजे चालते-बोलते भगवान असल्याची लेखकांची श्रद्धा आहे. महर्षी व्यास आणि ब्राह्मणी व्यास यातील विरोधाभास त्यांनी इथे अधोरेखित केला आहे. व्यासांची गादी सर्वश्रेष्ठ आहे. सनातन वैदिक धर्मीय व्यासांची जागा कोणीही घेऊ शकत नाही, व्यासांचे उपकार जगातील सर्व माणसांनी मानले पाहिजेत, हा लेखकाचा दावा आहे. लेखकाने सचेतन व अचेतन या मनाच्या दोन कप्प्यांचे खास विश्लेषण करताना माणसाला पडणाऱ्या स्वप्नांचे वर्णन, स्वप्नांचे प्रकार आणि मनशांतीसाठी स्वप्न पाहणे आवश्यक असल्याचे म्हटले आहे. समूहासाठी पडणारी स्वप्ने ध्येयवादाचे रूप धारण करतात. युधिष्ठिराने आपल्या स्वप्नांना गुरु मानले ते ब्रह्यज्ञानी झाल्याची नोंद लेखकाने येथे केली आहे. युधिष्ठिराने स्वतःला निर्बल न समजता कृष्णाचे देवपण जपले. धर्मराज अहिंसावादी व शांत आहेत. द्रौपदीसह आपल्या सर्व भावांच्या गुणांचा वापर त्यांनी धर्मासाठीच केला. त्याची न्यायप्रियता, तपश्चर्या व संतुलित भूमिका जीवनप्रणालीसह डॉ. सलगरे आपल्या प्रज्ञेच्या बळावर पेलून नेतात. धर्मराजाना जितेंद्रिय ठरवतात आणि जैन धर्मीय प्रवाहात युधिष्ठिराला अनन्यसाधारण प्रतिष्ठा असल्याचे सांगतात. जैनांचा महापुरुष म्हणून धर्माला अधोरेखित करतात. जैन आणि हिंदू धर्माच्या संवादाची ही जागा डॉ. सलगरे यांच्या लेखनाने महत्त्वपूर्ण ठरली. श्रीकृष्णाचा गीताधर्म आणि युधिष्ठिराचा जीवनधर्म संस्कार एकच असल्याचे लेखक सांगतात. युद्ध, शांती, क्रौर्य, समंजसपणा, सात्विकता, दृष्टता अशा अनेक द्वंद्वाना लेखक  समर्थपणे सामोरे जातात. याशिवाय इतर धर्माचे व वर्तमान भूतकाळाचे संदर्भ विवेचनात येतात. त्यामुळे या ग्रंथाची उपयुक्तता वाढली आहे. वाचकांना धर्मयुद्धास प्रवृत्त करणारी माहिती आणि रचना लेखकाने समाविष्ट केली आहे. कुरुक्षेत्रावरील युद्धाच्या पहिल्या दिवशीच आणि युद्धारंभी भगवान श्रीकृष्णाने अर्जुनास केलेला गीतोपदेश, महाग्रंथात समाविष्ट करून महर्षी व्यासांचा परकायाप्रवेश आणि श्रीकृष्ण परमात्म्याचे विराट, अतिविराट रुपदर्शन सहज घडवते. श्रीकृष्णाचे अस्तित्व आणि कार्य महर्षी व्यासांच्या अतिविशालबुद्धीतून जगासमोर सिद्ध केले आहे. कृष्णप्रणित गीताधर्म स्वतंत्र आणि स्वयंभू असून त्याची बरोबरी कोणताही धर्म करू शकत नाही. मथुरा आणि द्वारकेच्या चित्रणात पौराणिक वलय आहे. साक्षात गोकुळवाडयांचे लेखनात दर्शन घडते. पूतनाने केलेला विषप्रयोग, कृष्णाची बासरी, गोवर्धन पर्वतकथा, उग्रसेनाची कैदीतून मुक्तता, जरासंधाचा मथुरेवर हल्ला, कृष्ण-कुंतीचा अनुबंध अशा अनेक संदर्भांने लेखकांने महाभारतातील कथा उलगडून महर्षी व्यासांचा कृष्ण प्रत्यक्षात प्रकट केला आहे. तत्त्वज्ञान, इतिहास, समाजशास्त्र, धर्म, संस्कृती संबंधाने या ग्रंथात मौलिक विचार करून भाष्य केले आहे. वर्तमान समाजासाठी वैज्ञानिक दृष्ट्या आणि विवेकाच्या आधारे सुद्धा काही प्रमाणात विवेचन करण्यात आले आहे. मराठी साहित्यात अव्वल ग्रंथ म्हणून प्राचार्य डॉ. मधुकर सलगरे यांच्या ग्रंथाला अन्यन्यसाधारण महत्व प्राप्त होईल, याबाबत माझ्या मनात शंका नाही. या संदर्भ ग्रंथाची मांडणी २८० पानाची झाली असून या ग्रंथास ८९ वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीपाल सबनीस यांची वस्तुनिष्ठ प्रस्तावना लाभली आहे. या ग्रंथाचे आकर्षक मुखपृष्ठ प्राजक्ता प्रशांत रणदिवे, वेदांत प्रकाशनचे सुप्रिया कुलकर्णी, डोंबिवली यांनी प्रकाशित केले आहे. त्यामुळे हा ग्रंथ अप्रतिम गुणात्मक, दर्जात्मक, दिशादर्शक बनला आहे.                               ग्रंथ समीक्षण :                                 प्रो. डॉ. महेश मोटे,राज्यशास्त्र पदवी-पदव्युत्तर व संशोधन केंद्र ,श्री माधवराव पाटील महाविद्यालय, मुरूम, ता. उमरगा, जि. धाराशिव.         
भ्रमणध्वनी क्र.  ९९२२९४२३६२


ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर
9923005236

Post a Comment

0 Comments