सोलापूर:- शोषणाला विरोध हा अंनिस आणि कामगार चळवळी मधला समान धागा आहे. डॉ नरेंद्र दाभोलकर माझे सहकारी होते. जादुटोणा विरोधी कायदा मंजूर होण्या साठी मी त्यांच्या सोबत काम केले. पण त्यांच्या खूनाचा केस निकाल लागायला अकरा वर्षे लागतात आणि अर्धाच न्याय मिळतो ही लोकशाही मधली शोकांतिका आहे असे मत कॉ नरसय्या आडम यांनी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती च्या राज्य कार्यकारिणी बैठकीच्या उद्घाटन प्रसंगी केले. कार्यक्रमाचे उद्घाटन हे अंधश्रध्दा निर्मूलन वार्तापत्राचा 'डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांक' प्रकाशन करून करण्यात आले.
ह्या प्रसंगी बोलताना कॉ. आडम पुढे म्हणाले की, मनुस्मृती ची पुनर्स्थापना करण्याची इच्छा असलेल्या लोकांचे सध्या चलती आहे. अशा कालखंडात लोकांना शहाणे करण्याचे काम आपल्याला करत राहावे लागेल. ज्या देशात ज्योतिषांच्या सांगण्या वरून शपथविधी पुढे ढकलला जातो आणि निवडणूक अर्ज देखील मुहूर्त बघून भरले जातात अशा समाजात आपली लढाई चालू आहे. हजारो वर्षे शोषण करणाऱ्या व्यवस्थे विरुध्द आपली लढाई आहे, पण जशा प्रकारे नुकत्याच झालेल्या निवडणुकांच्या मध्ये जसे लोकांनी राज्य घटना बदलू इच्छिणाऱ्या लोकांना धडा शिकवला त्याच प्रेरणेने आपल्याला काम करावे लागणार आहे असे त्यांनी सांगितले.
कॉ. आडम पुढे म्हणाले की, अंनिसचे कार्यकर्ते हे लोकांना विचार करायला उद्युक्त करतात हे देखील राजकीय प्रबोधन करण्यासाठी महत्वाचे आहे. ते काम त्यांनी सातत्याने करत राहावे असे आवाहन देखील त्यांनी केले.
कार्यक्रमाचे स्वागत उषा शहा यांनी केले. प्रास्ताविक मुक्ता दाभोलकर यांनी केले. तर सूत्रसंचालन अस्मिता बालगावकर यांनी तर प्रा. अशोक कदम यांनी आभार मानले.
उद्घाटक सत्रासाठी अंनिसचे राज्य कार्यकारणी सदस्य मिलिंद देशमुख, फारुख गवंडी, डॉ. हमीद दाभोलकर, राहुल थोरात, निळकंठ जिरगे, नंदिनी जाधव, मुंजाजी कांबळे, सम्राट हटकर, विनोद वायंगणकर, प्रकाश घादगिने, गणेश चिंचोले उपस्थित होते.
दोन दिवस सोलापूर येथील हिराचंद नेमचंद सभागृहात शालिनीताई ओक विचारपीठावर अंनिसची राज्य कार्यकारिणी बैठक चालू असून महाराष्ट्रातील १९ जिल्ह्यातून २०० कार्यकर्ते आले आहेत.
आज दिवसभरत कार्यशाळेत राज्य अहवाल आणि जिल्हा अहवाल सादरीकरण करण्यात आले. तसेच डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल अनुषंगाने चर्चा होऊन ज्या लोकांची सुटका झाली आहे त्यांच्या विरोधात उच्च न्यायालयात अपील करण्याचे देखील ठरवण्यात आले.
डॉ नरेंद्र दाभोलकर खून खटला निकाल विशेषांकाचे प्रकाशन करून अंनिस राज्य कार्यकारिणीचे उद्घाटन कॉम्रेड नरसय्या आडम यांच्या हस्ते, गणेश चिंचोले, मुक्ता दाभोलकर, उषा शहा, अशोक कदम, नंदिनी जाधव यांची उपस्थिती.
0 Comments