तुळजापूर :-श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान, तुळजापूर यांच्या वतीने शारदीय नवरात्र उत्सव २०२५ या कालावधीत सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाला विशेष सामाजिक परिमाण लाभावे, महिलांच्या कर्तृत्वाचा गौरव व्हावा आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने नवरात्र उत्सवानिमित्ताने "करुया सन्मान स्ञी शक्तीचा!गौरव तिच्या कर्तृत्वाचा" या विशेष उपक्रमा अंतर्गत कर्तृत्वान 'नऊ महिलांचा–नऊ दिवस सन्मान' हा अभिनव उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत धाराशिव जिल्ह्यात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दररोज एका महिलेला अशा प्रकारे नवरात्र उत्सव काळात एकूण नऊ महिलांना गौरविण्यात येणार आहे. महिलांची निवड करण्यासाठी अतिरिक्त जिल्हाधिकारी ज्योती पाटील यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली होती. समितीने खालील नऊ महिलांची निवड केली आहे –
१) अस्मिता अविनाश सूर्यवंशी, रा. गुंजोटी ता. उमरगा – शेवया उत्पादक गटात नावलौकिक, तसेच ‘घे भरारी’ टीव्ही शो विजेत्या.
२) बाबई उर्फ सुजाता लक्ष्मण चव्हाण, रा. अणदूर ता. तुळजापूर – बालविवाह प्रतिबंध क्षेत्रात महत्त्वपूर्ण कार्य.
३) अनिता नामदेव देवकते, रा. सौंदणा आंबा ता. कळंब – आवळा उत्पादने निर्मिती, प्रेरणादायी एकल महिला यशोगाथा.
४) प्रियंका रघुवीर पासले, रा. तीर्थ ता. तुळजापूर – विविध उपजीविका उपक्रम आणि संघर्षमय प्रवास.
५) सारिका रामेश्वर येळेकर, रा. बेंबळी ता. धाराशिव – शेळीपालन क्षेत्रात कार्य.
६) रोहिणी धीरज सुरवसे, रा. वाखरवाडी ता. धाराशिव – शासकीय योजनांचा प्रचार व प्रसार प्रभावीपणे केला.
७) नंदा राजेश जगताप, रा. वाघेगव्हाण ता. परांडा – मासिक पाळी व्यवस्थापन व पोषण परसबाग याबाबत जागृती.
८) वैशाली जाधव, रा. गणेगाव ता. भूम – एकल महिला सक्षमीकरणासाठी काम.
९) लक्ष्मी कल्याण मोरे, रा. बेंडकाळ ता. लोहारा – सेंद्रिय शेती प्रचार व प्रसार क्षेत्रात योगदान.
याशिवाय, या महोत्सवात पारंपरिक बियाण्यांच्या वाणांच्या संरक्षक व संवर्धक पद्मश्री राहीबाई पोपेरे यांचा विशेष गौरव करण्यात येणार आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले तालुक्यातील कोंभाळणे गावच्या रहिवासी असलेल्या राहीबाई पोपेरे यांनी बचत गटाच्या माध्यमातून सेंद्रिय शेतीचे महत्त्व ओळखून देशी बियाण्यांची बँक सुरू केली. त्यांच्या या कार्याचा गौरव करत भारत सरकारने २०२० मध्ये त्यांना पद्मश्री पुरस्कार प्रदान केला आहे. तसेच बीबीसीने जगातील १०० प्रभावशाली महिलांच्या यादीत त्यांचा समावेश करून त्यांच्या योगदानाचा सन्मान केला होता.
शारदीय नवरात्र महोत्सवाच्या निमित्ताने होणाऱ्या या सन्मानामुळे समाजाच्या विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या महिलांना प्रेरणा मिळणार आहे.
0 Comments