Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटीचा रणसंग्राम: कोण मारणार बाजी आणि कुणाला बसणार धक्का?​ काटी जिल्हा परिषद गटात दिग्गजांमध्ये 'काट्याची टक्कर'; भाजप विरुद्ध महाविकास आघाडीत हायहोल्टेज सामना! तुळजापूर तालुक्यातील काटी जिल्हा परिषद गटात राजकीय वातावरण तापले; बंडखोरांची मनधरणी करताना नेत्यांची दमछाक

​काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील राजकीयदृष्ट्या अत्यंत महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या 'काटी' जिल्हा परिषद गटात यंदा चुरशीचे वातावरण निर्माण झाले आहे. हा गट ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षित झाल्याने आणि पंचायत समितीचे दोन्ही गण (काटी व सावरगाव) सर्वसाधारण प्रवर्गासाठी सुटल्याने, भाजप आणि महाविकास आघाडीने आपली संपूर्ण ताकद पणाला लावली आहे. दिग्गज उमेदवार रिंगणात असल्याने या निवडणुकीकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
​जिल्हा परिषद: आशा भाले विरुद्ध अर्चना काळे
​जिल्हा परिषदेसाठी भाजपतर्फे आमदार राणाजगजितसिंह पाटील यांचे कट्टर समर्थक बाळासाहेब भाले यांच्या पत्नी आशा बाळासाहेब भाले रिंगणात आहेत. तर महाविकास आघाडीकडून (शिवसेना उबाठा) खासदार ओमराजे निंबाळकर यांचे समर्थक व सरपंच पती तथा सरपंच परिषदेचे जिल्हाध्यक्षपद सुजित हंगरगेकर यांचे निकटवर्तीय
भैरी काळे यांच्या पत्नी अर्चना भैरी काळे यांची उमेदवारी जवळपास निश्चित मानली जात आहे.दोन्ही जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवार ग्रामपंचायत स्तरावर सक्रिय असल्याने महिला मतदारांची भूमिका निर्णायक ठरणार आहे.

सावरगाव पंचायत समिती निवडणूकीतील उमेदवार

पंचायत समिती: दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला

​पंचायत समितीच्या दोन्ही गणांमध्ये अनुभवी नेत्यांची फौज मैदानात उतरली आहे: सावरगाव पंचायत समिती गणात येथे भाजपकडून माजी सभापती संतोष (दादा) बोबडे, तर महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे शंकर (तात्या) शिंदे यांच्यात तुल्यबळ लढत होत आहे.तर काटी पंचायत समिती गणात भाजपकडून भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष विक्रमसिंह देशमुख निवडणूक लढवत आहेत, तर त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीतून शिवसेना उबाठा पक्षाकडून खासदार ओमराजे निंबाळकर यांचे निकटवर्तीय सुजित हंगरगेकर (जिल्हाध्यक्ष, सरपंच परिषद, धाराशिव) यांनी शड्डू ठोकला आहे.काटी व सावरगाव दोन्ही पंचायत समिती गणात 'काँटे की टक्कर' होत असून मातब्बर नेत्यांनी दंड थोपटल्याने संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष या लढतीकडे लागले आहे.

काटी पंचायत समिती गणातील उमेदवार


बंडखोरी थोपवण्याचे आव्हान

दोन्ही गटांतील उमेदवारी न मिळालेले स्थानिक पदाधिकारी आणि इच्छुक उमेदवार सध्या नाराज असून, ते कोणती भूमिका घेतात यावर विजयाची गणिते अवलंबून आहेत.दोन्ही बाजूंनी नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यासाठी पक्षश्रेष्ठींना मोठी कसरत करावी लागत आहे.उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या प्रक्रियेकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
मंगळवारी अर्ज माघारीनंतरच निवडणुकीचे खरे चित्र स्पष्ट होणार आहे. दरम्यान, सर्वच उमेदवारांनी प्रत्यक्ष भेटीगाठीच्या  माध्यमातून प्रचाराचा धुरळा उडवण्यास सुरुवात केली आहे. 'काटी' जिल्हा परिषद  गटात यापूर्वी काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजप अशा विविध पक्षांनी सत्ता गाजवली असल्याने, यंदा मतदार कोणाला कौल देतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.

काटी जिल्हा परिषद गटात 21886 मतदार व 14 गावे समाविष्ट 

काटी जिल्हा परिषद मतदार संघात एकूण मतदार ​पुरुष मतदार 11,500 तर महिला मतदार 10,386 असे एकूण 21886 मतदार आहेत.तर मतदार संघात काटी जिल्हा परिषद गटात काटी व सावरगाव पंचायत समिती गणातील काटी पंचायत समिती अंतर्गत काटी, झोपडपट्टी,वाणेवाडी,काटी तांडा,नरसिंह तांडा, सावंतवाडी 1,सावंतवाडी 2,दहिवडी,पांगरदरवाडी तर सावरगाव पंचायत समिती अंतर्गत सावरगाव,गंजेवाडी, जळकोटवाडी (सा),गवळेवाडी,केमवाडी,वडगाव (काटी),पारधे वस्ती हे एकूण 14 गावे समाविष्ट आहेत.एकूण 28 मतदान केंद्रावर या गटातील मतदान प्रक्रिया पार पडणार आहे.

​या गटात यापूर्वी काँग्रेस, शेकाप, राष्ट्रवादी आणि भाजप अशा सर्वच पक्षांनी विजय मिळवलेला आहे. त्यामुळे आता भाजप आपला गड राखणार की महाविकास आघाडी येथे परिवर्तन घडवणार, याची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.


Post a Comment

0 Comments