काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील केमवाडी येथील रस्त्याचा प्रश्न गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असल्याने संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. "रस्ता नाही, तर मतदान नाही" अशी भूमिका घेत केमवाडी येथील सर्वपक्षीय शिष्टमंडळाने मंगळवारी (दि. 27) जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली. आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीवर पूर्णपणे बहिष्कार टाकण्याचा इशारा यावेळी निवेदनाद्वारे देण्यात आला.
9 किमी रस्त्यामुळे गावकरी हालपेष्टेत
सावरगाव ते केमवाडी, वडाळा हा 9 किलोमीटरचा रस्ता अत्यंत दुरवस्थेत आहे. या रस्त्यावरून प्रवास करताना शालेय विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना मोठ्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यामुळे बस सेवा विस्कळीत झाली असून, अपघातांचे प्रमाणही वाढले आहे. विशेष म्हणजे हा मार्ग पंढरपूर आणि तुळजापूरला जोडणाऱ्या पालखी मार्गाचाही भाग आहे. वारंवार मागणी करूनही निधीचा अभाव किंवा निकृष्ट दर्जाचे काम यामुळे हा प्रश्न सुटलेला नाही. अखेर या अन्यायाविरुद्ध ग्रामस्थांनी मतदानावर बहिष्काराचे हत्यार उपसले आहे.
खासदार ओमराजे निंबाळकरांकडून आश्वासक प्रतिसाद
जिल्हाधिकारी कार्यालयात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिल्यानंतर या शिष्टमंडळाने शिवसेना (उबाठा) पक्षाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांची भेट घेतली. ग्रामस्थांनी आपल्या व्यथा खासदारांसमोर मांडल्या. त्यावर प्रतिक्रिया देताना खासदार निंबाळकर म्हणाले की, "तुम्ही पहिल्यांदाच माझ्याकडे या रस्त्याबाबतची कैफियत मांडली आहे. हा प्रश्न गंभीर असून, मी तातडीने यात लक्ष घालून तुमच्या रस्त्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन." असे आश्वासन दिले.
प्रशासनाला शेवटचा इशारा
केमवाडी ग्रामपंचायतीच्या लेटरहेडवर देण्यात आलेल्या या निवेदनावर गावातील सरपंच गजानन कोकरे, उपसरपंच अशांत फंड,आणि सर्वपक्षीय नेत्यांमध्ये रामराव काशीद,सुनिल काळे,मधुकर खोत,धनंजय काशिद,बालाजी काळे,जनार्धन थोरात,मोहन पाटील,पप्पू नकाते,भक्तावर शेख,आदम पठाण,राम इटुकडे रोहित पवार यांच्या स्वाक्षऱ्या आहेत. जर निवडणुकीपूर्वी रस्त्याच्या कामाबाबत ठोस निर्णय झाला नाही, तर गावातील एकही मतदार मतदानाला बाहेर पडणार नाही, असा ठाम निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे. या शिष्टमंडळात गावातील प्रतिष्ठित नागरिक आणि ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते.
0 Comments