Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

🔬 ‘रमण परिणामाच्या’ साक्षीने चव्हाणवाडी शाळेत विज्ञान जत्रेची रंगतदार मेजवानी! 🔬

काटी/उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील नांदुरी केंद्रांतर्गत जि.प. प्रा. शाळा चव्हाणवाडी येथे २८ फेब्रुवारी रोजी राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला. थोर भारतीय शास्त्रज्ञ सी. व्ही. रमण यांच्या जयंतीनिमित्त आयोजित ‘विज्ञान जत्रे’त विविध शैक्षणिक आणि प्रेरणादायी उपक्रमांची रंगतदार मेजवानी अनुभवायला मिळाली.

कार्यक्रमाची सुरुवात नूतन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. रामकृष्ण चव्हाण यांच्या हस्ते डॉ. रमण यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. यानंतर ‘विज्ञान शाप की वरदान’ या विषयावर विद्यार्थ्यांनी जोडीने वादविवाद सादर करत प्रभावी मते मांडली. या स्पर्धेत इयत्ता आठवीतील संजना चव्हाण व मुक्ता चव्हाण यांनी प्रथम क्रमांक पटकावला.

सहशिक्षक श्री. शांताराम कुंभार यांनी डॉ. रमण यांच्या जीवनकार्याचा आढावा घेत त्यांच्या जगप्रसिद्ध ‘रमण परिणाम’ या सिद्धांताचे सोप्या उदाहरणांसह स्पष्टीकरण दिले. विज्ञान शिक्षक श्री. विकास ढंगे यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन, प्रयोगशीलता आणि विज्ञान प्रदर्शनाचे महत्त्व अधोरेखित केले. मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड यांनी विज्ञानामुळे विकसित होणारी डोळस वृत्ती आणि अंधश्रद्धा निर्मूलन यावर मार्गदर्शन केले.

यानंतर शालेय मैदानात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले. इयत्ता पहिली ते आठवीतील तब्बल ४८ विद्यार्थ्यांनी ३४ प्रयोग सादर करत आपली वैज्ञानिक जिज्ञासा दाखवून दिली. उत्कृष्ट प्रयोगासाठी इयत्ता आठवीतील संजना चव्हाण हिच्या ‘उत्प्लावक बलाचे उपयोजन’ या प्रयोगास प्रथम क्रमांक मिळाला.

विज्ञान विषयक रांगोळी स्पर्धाही विशेष आकर्षण ठरली. केशवाहिन्या, सूक्ष्मदर्शक, हृदय रचना, विलगकारी नरसाळे, चांद्रयान-३ मोहीम, राष्ट्रीय विज्ञान दिन थीम अशा विविध संकल्पनांवर विद्यार्थ्यांनी आकर्षक रांगोळ्या साकारल्या. इयत्ता सातवीतील विद्यार्थ्यांच्या ‘चांद्रयान-३’ रांगोळीला तर लहान गटातून इयत्ता चौथीतील विद्यार्थ्यांच्या ‘हवेतील विविध वायूंचा वृत्तालेख’ या रांगोळीला प्रथम क्रमांक मिळाला.
या विज्ञान जत्रेतून विद्यार्थ्यांनी वैज्ञानिक दृष्टिकोन जोपासण्याचा संकल्प केला. उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहशिक्षक श्री. हनुमंत डोलारे, सौ. सुवर्णा काळे व दिपाली व्होटे यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी श्री. अर्जुन जाधव, विस्तार अधिकारी श्री. मल्लिनाथ काळे आणि नांदुरी केंद्राचे केंद्रप्रमुख श्री. संजय वाले यांनी शुभेच्छा देत शाळेच्या उपक्रमाचे कौतुक केले.

✍️'Only न्यूज धाराशिव' - थेट, स्पष्ट आणि तुमच्या हक्काची बातमी!

Post a Comment

0 Comments