"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव |प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात केवळ पुस्तकी ज्ञान न देता प्रत्यक्ष कृती आणि अनुभवावर आधारित शिक्षण देणारे बीड जिल्ह्यातील प्रसिद्ध राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार विजेते सोमनाथ वाळके सर यांच्या विशेष कार्यशाळेचे आयोजन आज धाराशिवमध्ये करण्यात आले आहे. आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ, धाराशिव संचलित, श्रीपतराव भोसले माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय यांच्या वतीने या 'शिक्षक प्रेरणा कार्यशाळेचे' आयोजन करण्यात आले आहे.
नाविन्यपूर्ण अध्यापनाचा गुरुमंत्र
सोमनाथ वाळके सर हे केवळ शिक्षक नसून शिक्षण क्षेत्रातील एक 'इनोव्हेटर' म्हणून ओळखले जातात. आष्टा हरिनारायण (ता. आष्टी, जि. बीड) येथील पीएमश्री जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत त्यांनी राबवलेले 'रचनावादी शिक्षण मॉडेल' आज संपूर्ण देशासाठी प्रेरणादायी ठरले आहे. वर्गातील पाठांतराला फाटा देऊन मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन कसा रुजवायचा आणि तंत्रज्ञानाचा (ICT) प्रभावी वापर कसा करायचा, याचे सखोल मार्गदर्शन ते आजच्या कार्यशाळेत करणार आहेत.
कार्यक्रमाची रूपरेषा:
प्रमुख वक्ते: सोमनाथ वाळके (राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार व राष्ट्रीय ICT पुरस्कार विजेते)
प्रमुख पाहुणे: मा. सौ. प्रेमाताई पाटील (सरचिटणीस - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ), मा. श्री. आदित्य (भैय्या) पाटील (मुख्य कार्यकारी अधिकारी)
अध्यक्ष: मा. श्री. संतोष कुलकर्णी (संचालक - आदर्श शिक्षण प्रसारक मंडळ)
प्रमुख उपस्थिती: मा. श्री. साहेबराव देशमुख (प्रशासकीय अधिकारी)
वेळ आणि स्थळ:
ही कार्यशाळा आज सोमवार, दि. ०६ एप्रिल २०२६ रोजी सायंकाळी ५:०० वाजता, जुनी इमारत, श्रीपतराव भोसले हायस्कूल, धाराशिव येथे संपन्न होणार आहे.
शिक्षण क्षेत्रात नवनवीन प्रयोग करू इच्छिणाऱ्या शिक्षकांसाठी ही कार्यशाळा एक मोठी पर्वणी ठरणार आहे. या कार्यक्रमासाठी विद्यालयाचे प्राचार्य, मुख्याध्यापक आणि सर्व शिक्षक-शिक्षकेत्तर कर्मचारी वृंद परिश्रम घेत आहेत.
0 Comments