"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
येथील सुपुत्र आणि जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय (पुणे) येथील प्राध्यापक महेश विश्वंभर घोटकर यांना गणित विषयात 'पीएच.डी.' पदवी प्राप्त झाल्याबद्दल तामलवाडी येथे ग्रामस्थ व मित्र परिवाराच्या वतीने त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. रविवार, ५ एप्रिल रोजी सायंकाळी ७ वाजता झालेल्या या सोहळ्यात घोटकर यांच्या शैक्षणिक यशाचे कौतुक करत त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.
शेतकरी कुटुंबातून गणितातील यशापर्यंतचा प्रवास तामलवाडी सारख्या ग्रामीण भागात एका सामान्य शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या महेश घोटकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत हे यश संपादन केले आहे. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तामलवाडी येथेच झाले. त्यानंतर उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन शिक्षण दयानंद महाविद्यालय (सोलापूर) आणि उच्च शिक्षण शिवाजी विद्यापीठ (कोल्हापूर) येथून पूर्ण केले.
२२ वर्षांचा प्रदीर्घ अध्यापन अनुभव:
घोटकर यांनी आपल्या कारकिर्दीची सुरुवात जवाहरलाल नेहरू अभियांत्रिकी महाविद्यालय (छत्रपती संभाजीनगर) येथून केली. गेल्या २२ वर्षांपासून ते जेएसपीएम अभियांत्रिकी महाविद्यालय, ताथवडे (पुणे) येथे कार्यरत असून, गणित विषयात त्यांनी केलेले संशोधन व उल्लेखनीय कामगिरीबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांच्या या यशाबद्दल जेएसपीएम संस्थेचे संस्थापक व माजी मंत्री तानाजी सावंत यांनीही त्यांचे विशेष अभिनंदन केले आहे.
उपस्थित मान्यवर
या सत्कार समारंभास यशवंत लोंढे, चन्नाप्पा मसुते, त्र्यंबक दिक्षित, सुधीर पाटील, सुधाकर लोंढे, बाळासाहेब रणदिवे, शाहिर गायकवाड, महादेव मसुते, श्रीकांत गायकवाड, राजेंद्र थोरात, हरिदास पकाले, नागनाथ मसुते, पांडुरंग पटाडे, ज्ञानेश्वर सिरसट, शशिकांत गायकवाड, देविदास गायकवाड, सिध्देश्वर मसुते, महादेव माळी, राजेंद्र शिनगारे, संतोष घोटकर, कृष्णा घोटकर, नागेश शिंदे, विजयसिंह फंड, सुमित मसुते, चंद्रकांत घोडके यांच्यासह अनेक ग्रामस्थ, मित्र परिवार व नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
"ग्रामीण भागातील मुलांनी जिद्द आणि चिकाटी ठेवली, तर संशोधनासारख्या उच्च क्षेत्रातही मोठी मजल मारता येते, हे महेश घोटकर यांनी दाखवून दिले आहे," अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या.
ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून चिकाटीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते
--डॉ. महेश घोटकर
सत्काराला उत्तर देताना डॉ. महेश घोटकर म्हणाले की, "माझ्या यशाचे सर्व श्रेय माझ्या शेतकरी कुटुंबाला आणि या गावाच्या संस्कारांना जाते. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी उच्च ध्येय बाळगून चिकाटीने अभ्यास केल्यास यश नक्कीच मिळते असे सांगून ते. पुढे बोलताना म्हणाले की, ग्रामीण भागात सोयीसुविधांची कमतरता असू शकते, पण प्रतिभेची नाही. जर मनात जिद्द आणि कामात सातत्य असेल, तर शेतकरी कुटुंबातील मुलगा देखील जागतिक दर्जाचे संशोधन करू शकतो. कष्ट करण्याची तयारी ठेवा, शिक्षण हेच समाज परिवर्तनाचे मुख्य साधन आहे. तामलवाडी ते पुणे या २२ वर्षांच्या शैक्षणिक प्रवासात अनेक आव्हाने आली, पण आपल्या माणसांची साथ आणि मार्गदर्शकांचे प्रेम यामुळेच मी इथपर्यंत पोहोचू शकलो. हा सत्कार माझा नसून माझ्या जिद्दीचा आणि तुमच्या विश्वासाचा असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
0 Comments