काटी | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
सोलापूर-तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील तामलवाडी शिवारात असलेल्या 'मिलन लॉज'वर पोलिसांनी धाडसी कारवाई करत एका मोठ्या देहविक्रय रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी लॉज चालवणाऱ्या दोन मुख्य आरोपींना बेड्या ठोकल्या असून, तीन महिलांची या दलदलीतून सुटका केली आहे. विशेष म्हणजे, या प्रकरणातील अटक करण्यात आलेल्या दोन महिला बांगलादेशी नागरिक असल्याने या रॅकेटची पाळेमुळे खोलवर असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
अनैतिक मानवी वाहतूक शाखेची धडक कारवाई
तामलवाडी गावापासून सुमारे दीड किलोमीटर अंतरावर असलेल्या मिलन लॉजवर काही महिलांकडून सक्तीने वेश्या व्यवसाय करून घेतला जात असल्याची गुप्त माहिती अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या पथकाला मिळाली होती. माहितीची खातरजमा करण्यासाठी पोलिसांनी गुप्त बातमीदारामार्फत सापळा रचला. खात्री पटताच पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली अनैतिक मानवी प्रतिबंधक कक्षाचे पोलीस निरीक्षक आर. एस. गायकवाड व त्यांच्या
पथकाने मिलन लॉजवर छापा टाकला असता, त्या ठिकाणी दोन पुरुष आरोपी आणि तीन महिला संशयास्पद स्थितीत आढळून आल्या.
मुख्य आरोपींना बेड्या; कमाईसाठी महिलांचा वापर
महिला पोलिसांच्या मदतीने करण्यात आलेल्या चौकशीत धक्कादायक माहिती समोर आली. दिलीप सिद्धप्पा मंगरुळे (वय ४३, रा. सोलापूर) आणि संतोष नामदेव पवार (वय ४०, रा. उत्तर सोलापूर) हे दोघे या रॅकेटचे मुख्य सूत्रधार असल्याचे निष्पन्न झाले. हे आरोपी महिलांना वाणिज्यिक प्रयोजनासाठी आश्रय देऊन, त्यांना लैंगिक स्वैराचारासाठी प्रवृत्त करून त्यावर आपली उपजीविका करत होते. पोलिसांनी या दोन्ही नराधमांना ताब्यात घेतले आहे.
मोठा मुद्देमाल जप्त
या कारवाईदरम्यान पोलिसांनी घटनास्थळावरून गुन्ह्यात वापरले जाणारे साहित्य जप्त केले आहे. यामध्ये २ मोबाईल फोन,पिग्मी पासबुक आणि लॉजचा परवाना फॉर्म,युपीआय आयडी स्कॅनर आणि मशीन, वेश्या व्यवसायातील नोंदींचे रजिस्टर,५,७०० रुपयांची रोख रक्कम असा एकूण २५ हजार ७०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.
गुन्हा दाखल आणि पुढील तपास
या प्रकरणी आरोपी दिलीप मंगरुळे आणि संतोष पवार यांच्याविरुद्ध तामलवाडी पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) आणि अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंधक कायद्याच्या (PITA) कलम ३, ४, ५ अन्वये गुन्हा (गु.र.नं. ६०/२२६) दाखल करण्यात आला असून
पोलीस अधीक्षक रितू खोकर यांच्या मार्गदर्शनाखाली तामलवाडी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गोकुळ ठाकुर हे करीत आहेत.
या महिलांना धाराशिवमध्ये कोणी आणले आणि यामागे आंतरराज्यीय टोळी सक्रिय आहे का? याचा सखोल तपास पोलीस करत आहेत.
0 Comments