"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील यमगरवाडी-मंगरुळ येथील 'एकलव्य विद्या संकुला'ला नांदेड येथील स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रभारी कुलगुरू डॉ. अशोक महाजन यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान त्यांनी संकुलातील शैक्षणिक व सामाजिक उपक्रमांची सविस्तर माहिती घेत, संस्थेच्या एकूणच कामकाजाबद्दल विशेष समाधान व्यक्त केले.
एकलव्य विद्या संकुलात आगमन झाल्यानंतर संस्थेच्या वतीने डॉ. अशोक महाजन यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. यानंतर त्यांनी संकुलातील शाळा आणि वसतिगृहांची पाहणी केली. शाळेत राबवले जाणारे विविध नाविन्यपूर्ण उपक्रम, समृद्ध ग्रंथालय, अद्ययावत विज्ञान प्रयोगशाळा आणि क्रीडा स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांनी मिळवलेले सुवर्णयश याबद्दल त्यांनी शिक्षकांशी व व्यवस्थापनाशी संवाद साधला.
"भटके विमुक्त समाजातील मुला-मुलींना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आणि त्यांच्यातील कौशल्यांना वाव देण्यासाठी एकलव्य विद्या संकुल करत असलेले कार्य अत्यंत मोलाचे आहे," अशा शब्दांत डॉ. महाजन यांनी संस्थेच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली.
यावेळी संकुलातील मुला-मुलींचे वसतिगृह, विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सोयी-सुविधा आणि भविष्यात उभारण्यात येणाऱ्या नियोजित 'कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्रा'च्या (Skill Development Training Centre) आराखड्याची माहितीही त्यांनी जाणून घेतली.
याप्रसंगी भटके विमुक्त विकास प्रतिष्ठानचे सदस्य अॅड. जनक पाटील, डॉ. प्रणिता गडेकर, विद्यालयाचे मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, वसतिगृह अधीक्षक फुलाजी ताटी कुंडलवार यांच्यासह संस्थेचे शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Comments