Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर | प्रतिनिधी
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या दर्शनासाठी देशभरातून येणाऱ्या लाखो भाविकांच्या सोयीसाठी तुळजापूर येथील जंगम मठ येथे होटगी मठ संस्थानच्या वतीने भव्य ‘तपोरत्न भक्तनिवास’ बांधण्यात येत आहे. या भक्तनिवासामुळे भाविकांच्या निवास आणि इतर सुविधेत मोलाची भर पडणार आहे, असे प्रतिपादन काशीपीठाचे जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी केले.
तुळजापूर येथील जंगम मठात आयोजित भव्य सोहळ्यात भक्तनिवासाचे भूमीपूजन आणि कोनशिला अनावरण जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाले, याप्रसंगी ते बोलत होते.
या सोहळ्याला पंढरपूर देवस्थान समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर, आमदार विजयकुमार देशमुख, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चनाताई पाटील, नगराध्यक्ष विनोद गंगणे, गुड्डापूर देवस्थान समितीचे सिद्धय्या स्वामी, ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती सिद्धेश्वर कोरे, सोलापूर जिल्हा परिषदेचे सभापती रामप्पा चिवडशेट्टी, माजी उपनगराध्यक्ष अमर मगर, गटनेते औदुंबर कदम, नगरसेवक रणजीत इंगळे आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते. सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते धार्मिक वातावरणात भूमीपूजन व कोनशिला अनावरण करण्यात आले.
भक्तनिवासासह महादेव मंदिर अन् सभामंडपही साकारणार
"श्री तुळजाभवानी देवीचे महात्म्य संपूर्ण देशात अगाध आहे. दररोज लाखो भाविक येथे दर्शनासाठी येतात. होटगी संस्थानच्या या उपक्रमामुळे भाविकांची मोठी सोय होईल. या जागेत केवळ भक्तनिवासच नव्हे, तर नागरिकांसाठी महादेवाचे भव्य मंदिर आणि एक सुसज्ज सभामंडपही उभारण्यात येणार आहे," अशी माहिती जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी आपल्या आशीर्वचनात दिली.
...तर तुळजाभवानी मातेला दरवर्षी काशी विश्वनाथाकडून मानाचे महावस्त्र मिळेल!
याप्रसंगी बोलताना जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चनाताई पाटील म्हणाल्या की, "धार्मिक क्षेत्रातील सर्वोच्च स्थान असलेल्या काशीपीठाच्या जगद्गुरूंच्या आशीर्वादाने या कार्याची सुरुवात झाली आहे, त्यामुळे हे काम विनाअडथळा पूर्ण होईल. या प्रकल्पासाठी आमदार राणाजगजीतसिंह पाटील आणि नगरपालिकेचे सर्वतोपरी सहकार्य लाभेल, तसेच आवश्यक तो निधीही उपलब्ध करून दिला जाईल."
पुढे बोलताना त्यांनी एक महत्त्वपूर्ण अपेक्षा व्यक्त केली की, "काशी विश्वनाथ मंदिराकडून दरवर्षी श्री तुळजाभवानी मातेला मानाचे महावस्त्र यावे, यासाठी जगद्गुरू आणि नगरपालिकेने विशेष प्रयत्न करावेत."
मान्यवरांची उपस्थिती आणि पायी दर्शन
या सोहळ्यात गहिनीनाथ महाराज औसेकर व आमदार विजयकुमार देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त करत या उपक्रमाचे कौतुक केले. कार्यक्रमाचे धार्मिक विधी परमेश्वर शास्त्री यांनी शास्त्रोक्त पद्धतीने पार पाडले. मुख्य सोहळ्यानंतर जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन महास्वामीजी यांनी कार्यक्रम स्थळापासून थेट तुळजाभवानी मंदिरापर्यंत पायी चालत जात आदिशक्तीचे दर्शन घेतले.
या सोहळ्याला होटगी संस्थेचे सचिव शांतय्या स्वामी, संचालक शशिकांत रामपुरे, शिवानंद पाटील, संगप्पा महमाने, केदार उंबरजे, श्रीशैल अंबारे, नगरसेवक विजय कंदले, मधुकर शेळके, आनंद कंदले, कुलचंद व्यवहारे, सागर कदम, उपाध्ये मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो, अॅड. गिरीश शेटे, प्रफुल मस्के, महाबळेश्वर तोडकरी, भारत कोप्पा यांच्यासह परिसरातील नागरिक व भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
श्रीशैल पीठाच्या जगद्गुरूंची जंगम मठाला भेट
मुख्य सोहळ्याच्या पूर्वसंध्येला (गुरुवारी) श्रीशैल पीठाचे जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धाराम महास्वामीजी यांनीही जंगम मठाला सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांनी जंगम मठातील धार्मिक उपक्रमांची माहिती घेत श्री तुळजाभवानी मातेचे दर्शन घेतले.
0 Comments