Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर| उमाजी गायकवाड
प्रशासकीय सेवेत अनेकदा कामाचा व्याप आणि जबाबदाऱ्यांचे दडपण असते, पण अशाही परिस्थितीत आपल्या कामाचा ठसा उमटवणारे अधिकारी शिक्षण क्षेत्रात दुर्मिळ असतात. तुळजापूर पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी अर्जुन सरस्वती मारुती जाधव यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात शिक्षणाप्रती दाखवलेली निष्ठा आणि शिस्तबद्ध कार्यपद्धती यामुळे ते अनेकांसाठी ‘रोल मॉडेल’ ठरले आहेत. शुक्रवारी तुळजापूर येथे त्यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त आयोजित गौरव सोहळ्यात उपस्थितांनी याच कार्याची कृतज्ञतापूर्वक आठवण काढली.
नियत वयोमानानुसार ३१ मे रोजी सेवानिवृत्त होत असलेल्या जाधव यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आयोजित या सोहळ्याला डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षणाधिकारी डॉ. रविंद्र खंदारे यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते.
‘प्रामाणिकतेचा वस्तुपाठ’
शिक्षणाधिकारी डॉ. रविंद्र खंदारे यांनी जाधव यांच्या व्यक्तिमत्त्वाचा वेध घेताना, त्यांच्या प्रामाणिकपणावर भाष्य केले. “प्रशासकीय कामात चुका टाळण्याबाबतचा त्यांचा आग्रह आणि कठीण प्रसंगातही संयम न ढळू देण्याची त्यांची वृत्ती ही नव्या पिढीतील अधिकाऱ्यांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांच्यासारख्या शिस्तप्रिय अधिकाऱ्यामुळेच तुळजापूर तालुक्यातील शैक्षणिक दर्जा उंचावण्यास मदत झाली,” असे गौरवोद्गार डॉ. खंदारे यांनी काढले.
शैक्षणिक व्यासांगाचे कौतुक
यावेळी बोलताना प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे म्हणाले की, “निवृत्ती ही केवळ शासकीय सेवेची मर्यादा असते, पण शिक्षण क्षेत्रातील कार्य हे कधीच संपणारे नसते. जाधव यांनी विस्तार अधिकारी म्हणून तुळजापूर तालुक्यात जे कार्य केले, त्यात त्यांचा व्यासंग आणि प्रशासकीय कामातील हातखंडा दिसून येतो. शिक्षकांना नवी प्रेरणा देऊन त्यांना सोबत घेऊन काम करण्याची त्यांची शैली शिक्षणाचे क्षेत्र समृद्ध करणारी ठरली.”
सत्काराला उत्तर देताना अर्जुन जाधव भावूक झाले. आपल्या वाटचालीत सहकाऱ्यांचे आणि वरिष्ठांचे मिळालेले सहकार्य हेच आपले खरे भांडवल असल्याचे त्यांनी नमूद केले. या सोहळ्यात त्यांच्या मुलांनी वडिलांचा केलेला सत्कार आणि उपस्थितांचे भावूक झालेले चेहरे हे या कार्यकाळातील जिवंतपणाची साक्ष देत होते.
या कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन सहशिक्षक विठ्ठल नरवडे यांनी केले.
यावेळी शिक्षणाधिकारी डॉ.रविंद्र खंदारे, डायटचे प्राचार्य डॉ. दयानंद जटनुरे, शिक्षक संघटनेचे नेते लालासाहेब मगर, कल्याण बेताळे,श्रींमती शिंदे मॅडम, प्राचार्य सुहास वडणे, केंद्र प्रमुख राहुल जाधव,श्री माळी, श्री खुळे, श्री जगदाळे, श्री काळे ' श्रीमती राऊत मॅडम ' श्री जाधव साहेब यांच्यासह तालुक्यातील शिक्षकवृंद, विस्तार अधिकारी आणि कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
शिक्षक संघटनेचे पदाधिकारी, विस्तार अधिकारी आणि मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. सोहळ्याच्या शेवटी आयोजित प्रीती भोजनाने या कृतज्ञता सोहळ्याची सांगता झाली.
0 Comments