Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

स्व. माधवराव ‘काका’ पाटील यांची पुण्यतिथी रक्तदान शिबिराने साजरी; विकासदृष्टीला अभिवादन; मुरूममध्ये विविध संस्थांकडून प्रतिमापूजन; शेतकरी, शिक्षण व सहकार क्षेत्रातील योगदानाचा जागर

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
मुरूम |प्रतिनिधी 
उमरगा-लोहारा तालुक्याच्या विकासासाठी आयुष्य वेचणारे स्व. माधवराव ऊर्फ काका पाटील यांच्या २४ व्या पुण्यतिथीनिमित्त मुरूम शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी व श्री माधवराव पाटील महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित रक्तदान शिबिराने पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली.
स्व. माधवराव पाटील यांनी या भागातील कृषी, सहकार आणि शिक्षण क्षेत्राला दिशा देणारे कार्य उभे केले. जलसिंचनाच्या विविध योजनांद्वारे परिसरातील जमीन ओलिताखाली आणण्याचा प्रयत्न त्यांनी केला. बेनीतुरा मध्यम प्रकल्प उभारणीमुळे या भागाच्या विकासाला चालना मिळाली. ऊस उत्पादक शेतकऱ्यांची खाजगी साखर कारखानदारांकडून होणारी पिळवणूक थांबविण्यासाठी सहकारी तत्वावर साखर उद्योग उभारण्याचा त्यांनी ध्यास घेतला आणि सन १९९४ मध्ये श्री विठ्ठलसाई सहकारी साखर कारखान्याच्या रूपाने विकासाची मुहूर्तमेढ रोवली.
त्याआधी सन १९७० मध्ये नगर शिक्षण विकास मंडळ, मुरूम या शिक्षण संस्थेची स्थापना करून शिक्षण क्षेत्रालाही त्यांनी भक्कम पाया घातला. पुढे माजी राज्यमंत्री बसवराज पाटील व जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी या कार्याचा विस्तार केला. जनता सहकारी बँकेचे चेअरमन शरण पाटील हेही त्याच विचारधारेतून सामाजिक कार्यात सक्रिय आहेत.
पुण्यतिथीनिमित्त प्रारंभी स्व. माधवराव पाटील यांच्या समाधीस्थळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील व उमरगा जनता बँकेचे चेअरमन शरण पाटील यांनी पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन केले. त्यानंतर श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणातील पूर्णाकृती पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.
रक्तदान शिबिराचे उद्घाटन शरण पाटील यांच्या हस्ते झाले. यावेळी व्हाईस चेअरमन ॲड. व्ही. एस. आळंगे, विठ्ठलसाई कारखान्याचे संचालक दिलीप भालेराव, माणिक राठोड, मल्लिनाथ दंडगे, व्यंकटराव जाधव गुरुजी, रमेश चव्हाण, ॲड. संजय बिराजदार, प्राचार्य डॉ. दिलीप गरुड, धनराज मंगरुळे, मदन पाटील, रशीद शेख, धनराज पाटील, डॉ. चंद्रकांत बिराजदार, डॉ. महेश्वर होगाडे, डॉ. राम सोलंकर, उल्हास घुरघरे, सलीम जमादार आदी उपस्थित होते.
रक्तदान शिबिरासाठी उपप्राचार्य योगेश पाटील, सुदीप ढंगे, प्रा. हर्षद बदोले, प्रा. प्रियंका काजळे, वैष्णवी पाटील, मल्लू स्वामी तसेच श्रीकृष्ण रक्त संकलन केंद्र, गुंजोटीच्या कर्मचाऱ्यांनी विशेष पुढाकार घेतला.
दरम्यान, शहरातील कै. माधवराव पाटील सार्वजनिक वाचनालय, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, प्रतिभा निकेतन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, मुरूम, कोथळी, भुसणी येथील शाळा तसेच विठ्ठलसाई सहकारी साखर कारखाना आदी ठिकाणीही स्व. माधवराव पाटील यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून पुण्यतिथी साजरी करण्यात आली.

मुरूम येथे स्व. माधवराव पाटील यांच्या पुण्यतिथीनिमित्त आयोजित रक्तदान शिबिराचे उद्घाटन शरण पाटील यांच्या हस्ते करताना बापूराव पाटील, व्यंकटराव जाधव, दिलीप भालेराव, डॉ. दिलीप गरुड व अन्य मान्यवर.

Post a Comment

0 Comments