Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

काटी ग्रामपंचायत राजकीय घडामोडीकाटी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भाजपचे अनिल बनसोडे यांची बिनविरोध निवड; संपत पंखे यांच्या राजीनाम्यानंतर सत्तासंघर्षाला पूर्णविराममहाविकास आघाडी व भाजपच्या संख्याबळाच्या खेळात सहमतीचे राजकारण यशस्वीकार्यकर्त्यांकडून फटाक्यांच्या आतिषबाजीत जोरदार जल्लोष; गावच्या विकासाला गती देण्याचा नवनियुक्तांचा निर्धार

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड 
तुळजापूर तालुक्यातील अत्यंत महत्त्वपूर्ण आणि राजकीयदृष्ट्या संवेदनशील समजल्या जाणाऱ्या काटी येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी भारतीय जनता पक्षाचे खंबीर ग्रामपंचायत सदस्य अनिल सतिश बनसोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. अत्यंत चुरशीच्या आणि राजकीय उत्सुकतेच्या वातावरणात मंगळवार दि.२६ रोजी पार पडलेल्या या विशेष प्रक्रियेत अखेर बिनविरोध निवडीवर शिक्कामोर्तब झाल्याने काटीच्या राजकीय वर्तुळातून या निर्णयाचे स्वागत होत आहे. भाजपचे तत्कालीन उपसरपंच संपत पंखे यांनी आपल्या वैयक्तिक कारणास्तव पदाचा राजीनामा दिल्यामुळे हे पद रिक्त झाले होते. त्यानंतर या रिक्त जागेसाठी ही विशेष निवडणूक प्रक्रिया राबवण्यात आली.

सदर निवडणूक प्रक्रिया काटी ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच सौ. आशाताई सुजित हंगरगेकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित विशेष बैठकीत अत्यंत पारदर्शक व शिस्तबद्ध पद्धतीने पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक गोरे यांनी कायदेशीर जबाबदारी चोख पार पाडली.

काटी ग्रामपंचायत सद्य राजकीय बलाबल व समीकरण
काटी ग्रामपंचायतीमधील सत्तासमीकरणे पाहता, या बिनविरोध निवडीला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. ग्रामपंचायतीमध्ये एकूण सदस्यसंख्या सरपंचपदासह १६ इतकी असून, येथे भाजप व महाविकास आघाडी यांच्यात काट्याची टक्कर पाहायला मिळते. ग्रामपंचायतीमध्ये सध्या भारतीय जनता पक्षाकडे (भाजप) स्पष्टपणे ०८ सदस्यांचे मजबूत पाठबळ आहे, तर विरोधी महाविकास आघाडीकडे (मविआ) ०७ सदस्य आहेत. विशेष म्हणजे, ग्रामपंचायतीच्या सर्वोच्च स्थानी म्हणजेच सरपंचपदावर महाविकास आघाडीच्या (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) सौ. आशाताई सुजित हंगरगेकर कार्यरत आहेत. अशा संमिश्र आणि चुरशीच्या संख्याबळातही उपसरपंचपदाची निवडणूक बिनविरोध घडवून आणण्यात स्थानिक ज्येष्ठ नेत्यांना व राजकीय चाणक्यांना यश आले आहे, जे तालुक्यात चर्चेचा विषय ठरले आहे.

कार्यकर्त्यांचा जल्लोष व घोषणाबाजी
अनिल बनसोडे यांच्या नावाची अधिकृत घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी करताच उपस्थित भाजप कार्यकर्त्यांनी आणि ग्रामस्थांनी संपूर्ण ग्रामपंचायत परिसर घोषणांनी दणाणून सोडला. गुलालाची मुक्त उधळण करत आणि फटाक्यांची भव्य आतिषबाजी करत कार्यकर्त्यांनी जोरदार जल्लोष साजरा केला. या निवडीमुळे काटी परिसरात भाजपची पकड अधिक मजबूत झाल्याचा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

मान्यवरांच्या हस्ते भव्य नागरी सत्कार
निवडणुकीची अधिकृत प्रक्रिया पार पडल्यानंतर आयोजित विशेष सत्कार समारंभात नवनिर्वाचित उपसरपंच अनिल बनसोडे यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तुळजापूर पंचायत समितीचे कार्यतत्पर सभापती विक्रमसिंह देशमुख, जिल्हा परिषद सदस्य सुनील (भाऊ) बनसोडे, जिल्हा परिषद सदस्या सौ.आशाताई भाले,भाजपचे युवा नेते बाळासाहेब भाले, भाजपचे तालुकाध्यक्ष महादेव जाधव, माजी चेअरमन सयाजीराव देशमुख, माजी सरपंच आदेश कोळी, अनिल गुंड आणि मकरंद देशमुख आदी मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि पुष्पहार घालून बनसोडे यांना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

या प्रसंगी बोलताना सभापती विक्रमसिंह देशमुख यांनी सांगितले की, "काटी ग्रामपंचायतीच्या माध्यमातून लोकहिताची कामे अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी अनिल बनसोडे यांचे नेतृत्व महत्त्वपूर्ण ठरेल. पक्षीय मतभेद बाजूला ठेवून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्व घटकांनी एकत्र येणे ही काटीची मोठी परंपरा आहे आणि ती आजच्या बिनविरोध निवडीतून पुन्हा सिद्ध झाली आहे."

प्रशासकीय व ग्रामस्थांची उपस्थिती
या ऐतिहासिक राजकीय क्षणाचे साक्षीदार म्हणून माजी उपसरपंच संपत पंखे, चेअरमन संजय साळुंके, व्हाइस चेअरमन धनाजी ढगे, अहमद पठाण,नजीब काझी,
करीम बेग, गोकुळ सोनवणे, भागवत गुंड, बाळासाहेब शिंदे, राजू ढगे, संजय महापुरे, मंजूर कुरेशी, चंद्रकांत काटे, अमर देशमुख, अविनाश देशमुख, रामहरी थोरबोले, त्रिगुणशिल साळुंके, सुभाष गायकवाड, दत्ता बनसोडे,शाहु बनसोडे, नागेश जाधव, भिमराव घोंगडे, शुभम काटे या मान्यवरांसह सर्व महिला ग्रामपंचायत सदस्य, विविध स्थानिक संस्थांचे पदाधिकारी, तरुण कार्यकर्ते आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व आभार प्रदर्शन ग्रामसेवक गोरे यांनी केले.

Post a Comment

0 Comments