काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी विठ्ठल उर्फ आबा येडाप्पा कसबे वय (45 ) हा चार वर्षांपूर्वी वेडसर पणाने पुणे येथे वास्तव्यास असलेल्या आपल्या भावाच्या घरातून निघून गेला.
चार वर्षांपूर्वी हरवलेल्या विठ्ठलचा त्याचे आई वडिलांनी,भावांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला. पण तो कुठेही न सापडल्याने त्यांनी पोलिसांत धाव घेतली. व्हाट्सअप ग्रुपवर मेसेज पाठवले मात्र त्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. घरच्यांनी सर्वत्र शोधाशोध घेऊन त्याचा विचार आता सोडून दिला होता. तो वेडसर असल्यामुळे कुठेतरी त्याचा मृत्यू झाला असेल असेच सर्वांना वाटत होते. वडिलांचे मागच्या वर्षी तर एका भावाचे दोन वर्षांपूर्वी निधन झाले होते. आई भामाबाईला मात्र हरवलेल्या विठ्ठलविषयी आशा वाटत होती. माझा मुलगा कुठेतरी असेल असेच तिला वाटत होते.घरच्यांनी मात्र विठ्ठल परत भेटेल ही आशा सोडली होती. परंतु एकेदिवशी पंजाब मध्ये कडाक्याच्या थंडीत कुडकुडत दाढी,केस वाढलेल्या अवस्थेत रस्त्यावर फिरत असताना पंजाब मधील सुभेदार मेजर रणजितसिंह यांना अत्यंत अशक्त स्थितीत असलेला एक वेढसर मुलगा आढळून आला.
त्याची विचारपूस केली असता, तो मराठीत थोडं थोडं बोलत असल्याने तो महाराष्ट्रीयन असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सुभेदार रणजितसिंह यांनी खडकी पुणे येथे सैन्य दलातील ट्रेनिंग सेंटर मध्ये सेवा बजावल्याने त्यांना महाराष्ट्रातील व्यक्ती बद्दल आत्मियता वाटली. त्यांनी लगेच त्याचा एक फोटो घेऊन तेथील लष्कर सेवेतील व्हाट्सअप ग्रुपवर टाकली. त्या ग्रुपवर महाराष्ट्रातील धाराशिव जिल्ह्यातील परंडा तालुक्यातील आसू येथील लष्करी सेवेत झांशी येथे कार्यरत असलेले हवादार कृष्णा खुने यांनी ती पोस्ट पाहिली. आपल्याच भागातील एक व्यक्ती एवढ्या लांब फिरत असल्याने त्यांनी लगेच सोलापूर येथे पोलीस खात्यातील एपीआय असलेले त्यांचे भाऊ नागनाथ खुने यांच्याशी संपर्क साधून सदर माहिती त्यांना दिली. एपीआय असलेले खुने यांनी काटी येथील पत्रकार उमाजी गायकवाड यांच्याशी संपर्क साधून व्हाट्सअप वरील ती पोस्ट व फोटो टाकून चौकशी केली असता ती व्यक्ती काटी गावातीलच असून चार वर्षांपूर्वी हरवलेली असल्याचे सांगितले. "हरवला आहे" या शिर्षकाखाली पत्रकार उमाजी गायकवाड यांनीच एकदा वर्तमानपत्रात व अनेकदा बऱ्याच व्हाट्सअप ग्रुपवर पोस्ट केलेले होती.
पंजाब मध्ये विठ्ठल कसबे सापडला आहे या व्हाट्सअप पोस्ट वरील संपर्क साधण्यासाठी दिलेल्या मोबाईल नंबरवर उमाजी गायकवाड यांनी पंजाबमधील सुभेदार मेजर रणजितसिंह यांच्याशी संपर्क साधून आपणास आढळून आलेला व्यक्ती हा तुळजापूर तालुक्यातील काटी येथीलच असल्याचे सांगून त्यास आपल्याजवळ ठेवून घेण्यास सांगितले. पत्रकार उमाजी गायकवाड यांनी लगेच हरवलेल्या विठ्ठल कसबे याच्या घरच्यांशी संपर्क साधून त्यांना विठ्ठल सापडल्याची माहीती दिली. त्यावेळी त्यांच्या घरच्यांना आश्चर्याचा धक्का बसला. ही आनंदाची वार्ता ऐकून तात्काळ मोहन व नेताजी कसबे हे दोन भाऊ व त्यांचा पुतण्या सागर हे पंजाबच्या दिशेने हरवलेल्या आपल्या भावाला घेऊन येण्यासाठी निघाले. सुभेदार रणजितसिंह व त्यांच्या सर्व परिवारांनी हरवलेल्या विठ्ठलला त्यास थंडीत उबदार कपडे,स्वेटर देऊन, जेवू घालून त्यास घरीच आणून ठेवले होते.
सोमवारी सकाळी मोहन कसबे,नेताजी कसबे व पुतण्या सागर हे तिघेजण पंजाब मध्ये रणजितसिंह यांचा घरी पोहचले. त्यांना त्यावेळी चार वर्षांपासून हरवलेला आपला विठ्ठल सुखरुप मिळाल्यानंतर गेलेल्या भावंडांनी अत्यानंदाने विठ्ठलची गळाभेट घेतली.त्यावेळी त्यांना भावना अनावर झाल्या होत्या. आपला विठ्ठल(भाऊ) मिळाल्याने त्यांच्या व कुटुंबाच्या आनंदाला पारावार उरला नव्हता. व्हिडिओ कॉल द्वारे विठ्ठल व त्याच्या आई भामाबाईशी बोलणे करुन दिले. त्यावेळी त्याच्या आईच्या डोळ्यातून अश्रूंचा बांध फुटला.
सुभेदार मेजर रणजितसिंह यांनी या तिघांनाही एक दिवस घरी ठेवून विठ्ठलचे सलून मधून दाढी व केस कापून, त्यास नवीन कपडे घालून दुसऱ्या दिवशी सुभेदार रणजितसिंह यांनी रेल्वे स्टेशनवर जाऊन भावनिक होत या भावंडांना निरोप दिला. विठ्ठलला सापडण्यात सोशल मिडियाचा मोठा उपयोग झाला.
कसबे परिवाराच्या वतीने सत्कार
चार वर्षांपूर्वी हरवलेल्या आपल्या भावाला मिळवून दिले व पंजाब मध्ये गेल्यावर सुभेदार मेजर रणजितसिंह यांनी अतिशय आस्थेवाईकपणे विठ्ठलला सांभाळून ठेवले तसेच आमचाही प्रेमळपणे आदरतिथ्य केल्याबद्दल मोहन कसबे व कसबे परिवाराच्या वतीने सुभेदार मेजर रणजितसिंह यांचा शाल, श्रीफळ देऊन सत्कार करुन त्यांचे आभार मानले. तसेच सैन्य दलातील कृष्णा खुने, एपीआय नागनाथ खुने, पत्रकार उमाजी गायकवाड यांचेही या कामात मोठे योगदान मिळाल्याने त्यांचे त्यांनी आभार मानले.
ताटातूट झालेल्या विठ्ठलला मिळवून देण्यात आनंद
पंजाब मध्ये सापडलेल्या थंडीत कुडकुडत फिरणाऱ्या महाराष्ट्रातील विठ्ठलला मागील चार वर्षांपूर्वीपासून दुरावलेल्या त्याची आई, भाऊ व कुटुंबिय या ताटातूट झालेल्या कुटूंबियांची भेट घडवून आणली त्याबद्दल समाधान व आनंद झाला.
सुभेदार मेजर रणजितसिंह पंजाब
0 Comments