तुळजापूर/उमाजी गायकवाड
धाराशिव जिल्ह्यात नुकतेच 31 जानेवारी रोजी राज्य सरकारच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्प असलेल्या 'मित्रा' चे मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर असलेले धाराशिव जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी तथा 1993 साली किल्लारी येथील भूकंपाच्या कार्यकाळात उत्कृष्टपणे कामगिरी केलेले प्रवीणसिंह प्रतापसिंह परदेशी यांनी भूम व परांडा येथे कर्मयोगी अभियान अंतर्गत बैठकीच्या माध्यमातून जिल्ह्याचा दौरा केला. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एक राजकीय नेता की सेवा निवृत्त अधिकारी याची भाजपकडून चाचपणी सुरु असून सेवानिवृत्त अधिकारी म्हणून लोकसभेसाठी
प्रवीणसिंह परदेशी यांचे नाव लोकसभेसाठी पुढे येत आहे.
भाजपचा डाव यशस्वी होईल का?
येत्या लोकसभा निवडणुकीसाठी धाराशिव मतदारसंघातून विद्यमान खासदार उबाठाचे ओम राजेनिंबाळकर यांचा पराभव करण्यासाठी भाजपाने पूर्ण ताकद पणास लावली असून यासाठी सेवानिवृत्त केंद्रीय कर्मचारी तथा राज्याचे माजी सचिव प्रवीणसिंह परदेशी यांना उमेदवारी देण्याचे संकेत दिले असून त्या दृष्टीने परदेशी यांना तयारी करण्याचे आदेश दिल्याचे त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात आले आहे. सद्यस्थितीत प्रवीणसिंह परदेशी यांचे निकटवर्ती सहकारी हे धाराशिव जिल्हा दौरावर असुन परदेशी यांना कशाप्रकारे मतदारसंघात प्रतिसाद मिळेल त्यासाठी कोणकोणते विकास उपक्रम राबवावी लागतील?धाराशिव जिल्ह्यात जास्तीत जास्त रोजंदारीच्या संधी कशा उपलब्ध करून देता येतील ?रेल्वेचे जाळे कसे उभारण्यात येईल व केंद्र शासनाच्या कुठल्या कुठल्या योजना या मतदारसंघात राबविण्यात येणार आहेत याची माहिती ते मतदारापर्यंत पोहोचवीत आहेत यामुळे भाजपा प्रवीण सिंह परदेशी यांनाच उमेदवार जाहीर करणार का याकडे संपूर्ण जिल्हावाशियांचे लक्ष लागले असून मतदार राजकिय नेता की एक सेवा निवृत्त आयएएस अधिकारी यांना पसंती देतात यासह नक्की उमेदवारी कोणाला मिळणार याकडेही जनतेचे लक्ष लागले आहे. भाजपची नवी खेळी यशस्वी होणार का याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
--कोण आहेत प्रवीणसिंह परदेशी
मुळचे सोलापूरचे रहिवासी असलेले 63 वर्षीय प्रवीणसिंह परदेशी हे 1985 बॅचचे युपीएससी आयएएस टॉपर आहेत. सध्या ते सेवानिवृत्त वरिष्ठ आयएएस असून सध्या ते निती आयोगाच्या धर्तीवर राज्यात सुरु असलेल्या "मित्रा" उपक्रमाचे मुख्य कार्यकारी अधिकारी आहेत. त्याचबरोबर सध्या ते केंद्रात मिशन कर्मयोगी मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमवेत काम करीत आहेत.
तत्कालीन मुख्यमंत्री स्व. विलासराव देशमुख व देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात त्यांनी मुख्यमंत्री सचिवालयाचा कार्यभार पाहिला होता. त्यांना विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासातील व मर्जीतील सेवानिवृत्त अधिकारी म्हणूनही त्यांना ओळखले जाते. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी परदेशी यांची आपल्या कार्यालयात अतिरिक्त मुख्य सचिव म्हणूनही नेमणूक केली होती. परदेशी यांनी कारकिर्दीच्या सुरुवातीपासून ते आतापर्यंत विविध पदे भूषवली आहेत. परदेशी यांनी संयुक्त राष्ट्रसंघात (Uno) ग्लोबल प्रोग्राम को-ऑर्डिनेटर म्हणूनही काम पाहिले आहे. त्यांनी मुंबई महापालिकेत 2019 मध्ये आयुक्तपदाची जबाबदारी सांभाळली होती.आपल्या संयमी भाषेमुळे ते सर्वांना परिचयाचे आहेत. परदेश दौऱ्यात ते नेहमी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सोबत होते. अतिरिक्त मुख्य सचिव दर्जाचे ते अधिकारी असून मुख्य सचिव पदाने त्यांना हुलकावणी दिल्याने त्यांनी केंद्रात जाऊन सेवावृत्ती घेतली. प्रशासकीय सेवेतील त्यांचा दांडगा अनुभव व जनसंपर्क पाहून "मित्रा" या उपक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची 3 वर्षासाठी निवड केली आहे.
धाराशिव लोकसभा मतदारसंघातील लातूर जिल्ह्यातील किल्लारी येथील 1993 भूकंपा दरम्यान तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या काळात मदत व पुनर्वसन व त्या काळात जागतिक बॅंकेकडून मिळालेल्या मदतीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. अर्थशास्त्र व लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स येथून त्यांनी सामाजिक निती, भागीदारी योजना आणि आर्थिक विकास या विषयामध्ये त्यांनी मास्टरेट केली आहे. पनवेल, रायगड, अमरावती, सोलापूर, लातूर, पुणे, मुंबई या ठिकाणासह त्यांनी वन पर्यावरण वित्त शहर विकास महसूल विभागात व परदेशात 36 वर्ष उत्कृष्टपणे सेवा बजावली आहे. तसेच भूकंप, केरळ आपत्ती, कोरोना काळात त्यांचे कार्य उल्लेखनीय आहे.
राजकीय नेत्याऐवजी उत्कृष्ट सेवा निवृत्त अधिकारी प्रवीणसिंह परदेशी यांची सध्या भारतीय जनता पार्टीकडून जोरदार चाचपणी केली असून सध्या त्यांचे नाव भाजपकडून आघाडीवर असल्याची चर्चा सुरु असून परदेशी यांचा प्रशासकीय कामातील अनुभव व त्यांचा असणारा दांडगा जनसंपर्क या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत. भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाने ग्रीन सिग्नल दिल्यास धाराशिव लोकसभा मतदारसंघातील त्यांच्या उमेदवारीची जोरदार चर्चा सुरु आहे. भाजपकडून लोकसभेसाठी त्यांना उमेदवारीची संधी मिळाली आणि निवडून आले तर धाराशिव जिल्ह्याला निश्चितच केंद्रात मंत्रीपद मिळेल असेही त्यांच्या निकटवर्तीयाकडून सांगण्यात येत आहे. सध्यातरी
भाजपकडून आगामी लोकसभेचा उमेदवार कोण असेल याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments