मुरूम/प्रतिनिधी
महाराष्ट्राच्या राजकारणात सक्रिय असणारे बसवराज पाटील यांनी काँग्रेस पक्षाचा राजीनामा देऊन कमळ हाती घेतल्यानंतर प्रथम मुरूम शहरात आगमन होताच त्यांचे शहर व परिसरात पदाधिकारी व कार्यकर्ते हजारोंच्या संख्येने बसवराज पाटील यांचे शुक्रवारी (ता. १) रोजी शहरात आगमन होताच जंगी स्वागत करण्यात आले.
प्रारंभी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या प्रांगणात असलेल्या कै.माधवराव पाटील यांच्या पूर्णाकृती पुतळ्यास बसवराज पाटील यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
त्यानंतर नगर शिक्षण विकास मंडळ व श्रमजीवी परिवाराच्या वतीने संस्थेचे सचिव व्यंकटराव जाधव गुरुजी,प्राचार्य डॉ.अशोक सपाटे,प्राचार्य डॉ.दिलीप गरुड,डॉ.श्रीराम पेठकर,डॉ.सतिश शेळके,डॉ.चंद्रकांत बिराजदार,तात्यासाहेब शिंदे,सुधाकर वडगावे,राजेंद्र गुरव,डॉ.महेश मोटे,डॉ.सुभाष हुलपल्ले, डॉ.रवि आळंगे,उपप्राचार्य योगेश पाटील,अशोक कलशेट्टी, राजू ढगे आदींनी त्यांचा भव्यपुष्पहार, फेटा, शाल घालून जंगी सत्कार केला. याप्रसंगी फटाक्याच्या आतिषबाजीने वातावरण रंगीबेरंगी झाले होते. मुरूम येथील शिवाजी चौकात बसवराज पाटील यांचे आगमन होताच जेसीबीद्वारे फुलाचा वर्षाव करून त्यांचे जंगी स्वागत करण्यात आले. यावेळी हजारो कार्यकर्ते संगीताच्या तालावर ठेका धरून व घोषणाबाजीद्वारे रंगीबिरंगी फटाक्याच्या आतिषबाजीने वातावरण ढवळून निघाले होते.पन्नास वर्षांपेक्षा अधिक धाराशिव जिल्ह्यासह मराठवाड्यात ज्यांनी काँग्रेसची विचारधारा जीवंत ठेवली त्यांनी आज हाती कमळ घेतल्याने जिल्हयातील उमरगा-लोहारा तालुक्यात भाजपमध्ये उत्साहाचे वातावरण पसरले आहे. भाजप प्रवेशामुळे नागरिकामध्ये नवचैतन्य व उत्साह वाढला आहे.
माजी मंत्री बसवराज पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देणार असल्याची चर्चा गेल्या चार-पाच महिन्यापासून चालू होती मात्र अखेर पाटील यांनी या चर्चेबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिली नव्हती. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम मात्र कायम होता. अखेर दि. २७ फेब्रुवारी रोजी मुंबईतील भाजप कार्यालयात राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, केंद्रीय मंत्री भगवंत खुब्बा यांच्या उपस्थितीत पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. यावेळी जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील व युवानेते शरण पाटील उपस्थित होते. या पक्षप्रवेशामुळे नागरिकांच्या चर्चेला पूर्णविराम मिळाला. काँग्रेसमध्ये गेल्या चाळीस वर्षात एकनिष्ठ राहून त्यांनी जनसामान्यांना न्याय मिळवून देण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. आता मात्र भाजपच्या मार्गावर ते निघाल्याने आपले समाजकार्य सदैव जीवंत ठेऊन धाराशिव जिल्ह्यातील नागरिकांच्या न्याय हक्कासाठी त्यांचा लढा कायम चालू राहील, अशी अपेक्षा नागरिकांमधून व्यक्त होताना दिसून येत आहे. जिल्ह्याच्या राजकारणात सर्वात मोठी कार्यकर्त्यांची फळी जर कोणाकडे असेल तर ती म्हणजे पाटील परिवाराकडे असल्याची चर्चा कायम होते. बसवराज पाटील यांचा राजकारणातील प्रदीर्घ अनुभव, मनमिळाऊ स्वभाव, संयम, शिस्त, बेरजेचे राजकारण यामुळे ते अजात शत्रू असणारे व्यक्तिमत्त्व म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. पाटील यांच्यावर अनेकांवेळा टीका-टिप्पणी झाल्या मात्र पाटील यांनी केंव्हाही त्या टीका-टिपण्णीना प्रतिउत्तर दिले नाही. उलट शांत राहून आपल्या चाणक्य नीतीने आपला राजकीय प्रवास चालु ठेवला. त्यामुळेच ते राजकीय क्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण करू शकले. कोणत्यावेळी कोणता निर्णय घेणे योग्य राहील याचा पूर्णपणे अभ्यास करून आणि आपल्या राजकारणाच्या अनुभवाचा तर्क वापरून पुढील दिशा ते ठरवीत असतात. बसवराज पाटील यांनी काँग्रेसची साथ सोडली मात्र काँग्रेसची विचारधारा ते केंव्हाही सोडणार नाहीत उलट त्या विचारधारांचा भाजप मार्गावर नक्की पेरणी करतील, अशी आशाही नागरिकांतून व्यक्त केली जात आहे. एक मात्र नक्की पाटील यांच्या भाजप प्रवेशामुळे धाराशिव जिल्ह्यातील काँग्रेस मात्र एकाकी पडली असून भाजपाला पाटील यांच्या माध्यमातून मोठे बळ प्राप्त झाले आहे. या बळाचा भाजप कोणत्या प्रकारे उपयोग करून घेईन हे येणारे काळच ठरवेल.
मुरूम, ता. उमरगा येथील माधवराव पाटील महाविद्यालयात बसवराज पाटील यांचा भव्य पुष्पहार घालून सत्कार करताना व्यंकटराव जाधव गुरुजी, अशोक सपाटे, दिलीप गरुड, श्रीराम पेठकर, सतिश शेळके, चंद्रकांत बिराजदार, तात्यासाहेब शिंदे, सुधाकर वडगावे, राजेंद्र गुरव व अन्य.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा.....
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, तुळजापूर/काटी
9923005236
0 Comments