काटी/उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील तुळजापूर ते वडाळा ही सावरगाव मार्गे जाणारी महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी बस सेवा मागील दोन दिवसांपासून बंद असल्याने या मार्गावरील ग्रामीण भागातील नागरिकांना प्रवासासाठी प्रचंड मनस्ताप सोसावा लागत आहे. तुळजापूर ते वडाळा एसटी बस सेवा सकाळी 7 वाजता, 9 वाजता, तिसरी फेरी 11 वाजता, दुपारी 1 वाजता, 3 व 5 वाजता अशा दिवसांतून 6 फेऱ्या आहेत. परंतु सहाही फेऱ्या मागील दोन दिवसांपासून बंद आहेत. या मार्गावर खाजगी वाहने मिळेनासे झाले असल्याने अतिमहत्त्वाच्या कामास जायचे कसे असा प्रश्न नागरिकांपुढे उभा राहिला आहे. सावरगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या केंद्रास जवळपासची 12 गावे जोडली गेली आहेत.
याबाबत सावरगाव येथील प्रवासी गौतम माने यांनी तुळजापूर आगार प्रमुख शिंदे यांच्याशी दुरध्वनी वरुन संपर्क साधून बस सेवा बंद कशामुळे आहे असे विचारले असता ध्वलीवंदन व रविवार असल्याने बस फेऱ्या बंद असल्याचे अजबच कारण सांगितले. सुट्टीच्या दिवशी प्रवासी कमी असल्याने उत्पन्नही मिळत नसल्याचे त्यांनी सांगितले. तुम्ही येऊन भेटा बस का बंद आहे ते सांगतो असेही सांगितले. यापुढे शासकीय सुट्या असेल तर बस सेवा बंद राहणार का? असा प्रश्नही या मार्गावरील प्रवाशांना पडला आहे.
लग्न, अंत्यविधी, दवाखाना, तुळजापूर, धाराशिवला जाणे-येणे आदी बाबींसाठी प्रवास करण्यासाठी एसटी बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत.
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाची एसटी सेवा ही ग्रामीण भागाची जीवनदायी ठरली असून तुळजापूर-वडाळा या बस फेऱ्या पुर्ववत सुरु कराव्यात अशी मागणी प्रवाशांमधून होत आहे.
ताज्या बातम्यांसाठी संपर्क करा...
Only न्युज तुळजापूर
पत्रकार उमाजी गायकवाड, काटी
9923005236
0 Comments