काटी/उमाजी गायकवाड
सध्या राज्यात परतीच्या पावसाने थैमान घातले आहे .पाऊसाची रोजच जोरदार बॅटिंग सुरू आहे. त्यामुळे नदी नाले, ओढे, तलाव, तुडुंब भरले आहेत .सर्वच सांडवे व कालवे धुव्वाधार पावसाने दुतर्फा वाहत आहेत.
मराठवाड्याचे शेवटचे टोक असलेल्या वाणेवाडी गावापासून काही अंतरावर मराठवाड्याच्या प्रवेश द्वाराजवळ बार्शी तालुक्यातील शेवटचे गाव म्हणून ओळख असलेल्या शेळगाव (आर ) मधील पाझर तलाव तुडुंब भरला आहे. या तलावाचा सांडवा दुतर्फा वाहू लागल्याने वाणेवाडी ते शेळगाव या दोन गावांना जोडणारा दोन किलोमीटर लांबीचा रस्ता पाण्याखाली गेला आहे.
वाणेवाडी गावातील विद्यार्थी याच मार्गावरून शिक्षणासाठी शेळगावला जातात. शैक्षणिक धडे शिकण्यासाठी विद्यार्थी आतुर आहेत, पण पाण्यातील रस्ता अडवा येतोय पाण्याची रस्ता शोधत शोधत विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून शाळेला जाताना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचबरोबर वाणेवाडी व शेळगाव मधील शेतकऱ्यांच्या जमिनी याच मार्गावर आहेत. तसेच बार्शी व सोलापूरला जाणे येणेसाठी बहुतांश नागरिक याच मार्गाचा अवलंब करतात. त्यामुळे शाळकरी मुले ,दूध उत्पादक शेतकरी, शेतमजूर व सामान्य नागरिकांचे हाल होत आहेत. संपूर्ण रस्ता पाण्याखाली गेला असून रस्त्याच्या दोन्ही बाजूने काटेरी झाडे-झुडपे मोठ्या प्रमाणात वाढली आहेत.त्यामुळे रस्ता ओळखणे अवघड जात आहे.यातून अपघाताचे प्रमाण व काही अनर्थ घडण्याची शक्यता नाकारता येत नाही.या पाण्यातील रस्त्यामुळे विद्यार्थ्यांना व नागरिकांना मानसिक व शारीरिक त्रास होत असून नागरिकांमधून संताप व्यक्त होत आहे. त्यामुळे या भागातील शेतकरी या रस्त्याची उंची वाढवून हा रस्ता पुर्ववत करण्याची मागणी करीत आहेत.याशिवाय कालव्याच्या ठिकाणी रस्त्यावर छोटा पूल बांधण्याची मागणी गेले वर्षभरापासून केली जात आहे.
यासाठी या रस्त्यालगत वस्तीवर राहणाऱ्या शेळगाव (आर) मधील दयानंद बादगुडे या शेतकऱ्यांने सातत्याने पाठपुरावा केला आहे. बार्शी तालुक्यातील शेळगाव (आर) व तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी ही दोन्ही गावे लोकसभेला धाराशिव मतदार संघात येतात त्यामुळे धाराशिवचे उबाठा गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर याकडे लक्ष देतील का ? असा प्रश्न नागरिक करीत आहेत.
दयानंद बादगुडे या शेतकऱ्यांने खासदार ओमराजे निंबाळकर व माजी राज्यमंत्री दिलीप सोपल यांना लेखी निवेदन देऊन या रस्त्यावर पुल उभारुन रस्ता सुरळीत करण्यात यावा अशी विनंती केली आहे.
0 Comments