काटी/उमाजी गायकवाड
शाळा आणि समाज यांच्यातील नाते अधिक घट्ट करण्यासाठी व शालेय सुविधांच्या सक्षमीकरणासाठी, तुळजापूर तालुक्यातील नांदुरी केंद्रा अंतर्गत चव्हाणवाडी शाळेत 'एक दिवस लोकप्रतिनिधींसाठी!' हा अनोखा उपक्रम राबवण्यात आला. शनिवार, 14 फेब्रुवारी रोजी पार पडलेल्या या कार्यक्रमात नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा सत्कार करण्यासोबतच शाळेच्या सर्वांगीण विकासाचा महत्त्वपूर्ण आराखडा निश्चित करण्यात आला.
नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींचा यथोचित सन्मान
काटगाव पंचायत समिती गणाच्या नवनिर्वाचित सदस्या श्रीमती भाग्यश्री नागनाथ शिंदे व गावचे सरपंच श्री. पांडुरंग चव्हाण यांचा शाळा व्यवस्थापन समितीच्या वतीने विशेष गौरव करण्यात आला. यावेळी प्रतिनिधी म्हणून शिक्षणप्रेमी नागरिक श्री. बालाजी शिंदे, उपसरपंच श्री. प्रकाश चव्हाण, माजी उपसरपंच महादेव सुरडे, माजी अध्यक्ष औदुंबर खलाटे, नानासाहेब सुरडे, विद्यमान अध्यक्ष रामभाऊ सुरडे, सदस्य रामकृष्ण चव्हाण व शिवाजी शिंदे यांचाही सत्कार करण्यात आला.
शाळा आणि गावच्या विकासाचे 'अभिसरण'
कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापक श्री. नितीन गायकवाड यांनी केले. त्यांनी शाळेची गुणवत्ता, राबवले जाणारे उपक्रम आणि भौतिक गरजांबाबत मान्यवरांना सविस्तर माहिती दिली.
यावेळी मार्गदर्शन करताना श्री. बालाजी शिंदे यांनी एक प्रभावी संकल्पना मांडली. ते म्हणाले, "लोकप्रतिनिधींनी एक दिवस शाळेसाठी द्यावा आणि शाळेने एक दिवस गावासाठी द्यावा. हे सामाजिक अभिसरणच गावच्या विकासाचे खरे द्योतक ठरेल." त्यांनी शिक्षकांच्या कार्याचे कौतुक करत शाळा आणि विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे आश्वासन दिले. माजी अध्यक्ष श्री. औदुंबर खलाटे यांनीही शाळेच्या प्रगतीबद्दल समाधान व्यक्त केले.
आदर्श शाळेचा निर्धार
जिल्हा परिषद सदस्य श्री. निवृत्ती माळी यांनी फोनवरून संवाद साधत शाळेच्या गरजा पूर्ण करण्याचे अभिवचन दिले. कार्यक्रमानंतर उपस्थित सर्व मान्यवरांनी शाळेच्या भौतिक सोयीसुविधांबाबत सविस्तर चर्चा केली. आगामी काळात विविध निधी उपलब्ध करून देऊन चव्हाणवाडी शाळेला सर्व मानकांसह 'आदर्श शाळा' बनवण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला.
सहभाग व सूत्रसंचालन:
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहशिक्षक श्री. शांताराम कुंभार यांनी केले. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री. हनुमंत डोलारे, विकास ढंगे, श्रीमती सुवर्णा काळे व श्रीमती दिपाली व्होट्टे यांनी विशेष परिश्रम घेतले.
0 Comments