Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील सुपुत्र आणि धाराशिव येथील प्रसिद्ध 'सन ग्रुप' उद्योग समूहाचे सर्वेसर्वा अमरसिंह बाजीराव देशमुख यांना यंदाचा प्रतिष्ठित 'ग्रीन वर्ल्ड प्राईड ऑफ महाराष्ट्र' पुरस्कार जाहीर झाला आहे. औद्योगिक क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन हा सन्मान दिला जाणार असून, यामुळे संपूर्ण धाराशिव जिल्ह्यातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
पुण्यात रंगणार दिमाखदार सोहळा
ग्रीन वर्ल्ड आणि जाधववर ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट यांच्या संयुक्त विद्यमाने या पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार, दिनांक २२ मार्च २०२६ रोजी दुपारी ४:३० वाजता ॲड. शार्दुलराव सुधाकरराव जाधववर शैक्षणिक संकुल (नऱ्हे, पुणे) येथे हा कार्यक्रम संपन्न होईल.
दिग्गज मान्यवरांची उपस्थिती
हा गौरव सोहळा सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र. कुलगुरू डॉ. पराग काळकर यांच्या शुभहस्ते पार पडणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून मृदा व जलसंधारण मंत्रालयाचे सचिव सुनील चव्हाण (IAS) आणि पुणे आयकर आयुक्त अजय केसरी (IRS) यांची विशेष उपस्थिती लाभणार आहे.
सामाजिक कार्याचाही गौरव
ग्रीन वर्ल्ड फाउंडेशनचे अध्यक्ष आणि प्रसिद्ध लेखक गौतम कोतवाल यांच्या नेतृत्वाखाली हा उपक्रम राबवण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे औचित्य साधून ग्रीन वर्ल्ड क्लबतर्फे शाळा आणि महाविद्यालयांमध्ये १० हजार पुस्तकांचे मोफत वाटप देखील करण्यात येणार आहे.
अमरसिंह देशमुख यांनी आपल्या कल्पकतेने आणि मेहनतीने 'सन ग्रुप'च्या माध्यमातून उद्योजकतेचा नवा आदर्श निर्माण केला आहे. त्यांच्या या यशाबद्दल काटी गावच्या ग्रामस्थांसह धाराशिव जिल्ह्यातील विविध स्तरांतील मान्यवरांनी त्यांचे विशेष कौतुक केले आहे.
0 Comments