मुरूम/प्रतिनिधी
मुरूम येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांनी फिरत्या तारांगणाच्या माध्यमातून ब्रह्मांडाचे रहस्य अनुभवत अनोखी शैक्षणिक सफर केली.
हवा भरून उभारलेल्या विशेष डोममध्ये बसून विद्यार्थ्यांनी आकाशगंगेचा थरारक अनुभव घेतला. चंद्र, सूर्य, तारे यांचे जिवंत दर्शन घडत असताना पृथ्वीपलीकडील विश्व विद्यार्थ्यांसमोर उलगडले. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या ज्ञानाच्या कक्षा अधिक विस्तृत झाल्या.
भाग्यलक्ष्मी रोलिंग मिल प्रायव्हेट लिमिटेड, जालना आणि पोलाद स्टील यांच्या संयुक्त विद्यमाने हा उपक्रम राबविण्यात आला. सुमारे ५ ते ८ मीटर व्यासाचे ‘डीजी स्टार’ हे फिरते तारांगण काही क्षणांत उभारण्यात आले. अत्याधुनिक फिश-आय लेन्सयुक्त प्रोजेक्टरद्वारे सादर करण्यात आलेल्या या शोमध्ये एकावेळी ३५ ते ४० विद्यार्थी सहभागी होऊ शकले.
कार्यक्रमाचे उद्घाटन माधवराव पाटील महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्या हस्ते झाले. यावेळी रोटरी क्लब मुरूम सिटीचे अध्यक्ष प्रो. डॉ. अप्पासाहेब सूर्यवंशी, डॉ. महेश मोटे, डॉ. सुधीर पंचगल्ले, कमलाकर मोटे, प्रा. गोपाळ कुलकर्णी आदींची उपस्थिती होती.
या उपक्रमाबद्दल कंपनीचे आभार माजी प्राचार्य सच्चिदानंद अंबर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सुमित दुबे, तुषार तिवारी, समीर करशेट्टी, सुरेश क्षीरसागर, दादासाहेब क्षीरसागर तसेच मुस्तफा कोतवाल यांनी विशेष परिश्रम घेतले.
कार्यक्रमासाठी मुख्याध्यापिका अनुराधा जोशी, डॉ. पुरुषोत्तम बारवकर, जगदीश सुरवसे, पंकज पाताळे, संगमेश्वर लामजाने, धनराज हाळळे आदींनी पुढाकार घेतला.
मुरूम (ता. उमरगा) येथील प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूलमध्ये फिरत्या तारांगणाच्या शोचे उद्घाटन करताना डॉ. चंद्रकांत बिराजदार यांच्यासमवेत उपस्थित मान्यवर व विद्यार्थी.
0 Comments