धाराशिव | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांच्या फॉर्च्युनर कारचा सोलापूर-पुणे महामार्गावर भीषण अपघात झाला. गुरुवारी मध्यरात्री १ च्या सुमारास बारामतीजवळील भिगवण (डाळज २) परिसरात हा अपघात घडला. या धडकेत कारचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असले तरी, धनंजय सावंत हे सुदैवाने सुखरूप बचावले आहेत.
नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, धनंजय सावंत हे बुधवारी मुंबईत भारतीय जनता पक्षामध्ये आपला अधिकृत प्रवेश सोहळा आटोपून आपल्या फॉर्च्युनर गाडीने (क्रमांक: MH 12 SE 5559) परंड्याकडे परतत होते. रात्री १ च्या सुमारास भिगवणजवळील डाळज २ गावाच्या हद्दीत आले असता, समोरून येणाऱ्या एका कंटेनरने (क्रमांक: MH 12 WJ 6374) त्यांच्या वाहनाला जोरदार धडक दिली.
सावंत सुरक्षित, चालक व अंगरक्षक जखमी
या भीषण अपघातात सुदैवाने धनंजय सावंत यांना कोणतीही गंभीर दुखापत झालेली नाही. मात्र, त्यांचे सुरक्षा रक्षक आणि चालक यांना किरकोळ जखमा झाल्या असून, त्यांना तातडीने जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. त्यांची प्रकृती आता स्थिर असल्याची माहिती मिळत आहे.
कुणीही काळजी करू नये: धनंजय सावंत यांची प्रतिक्रिया
अपघातानंतर प्रतिक्रिया देताना धनंजय सावंत म्हणाले की, "कार्यकर्त्यांचे प्रेम, शुभेच्छा आणि ईश्वराची कृपा यामुळेच मी या भीषण अपघातातून सुखरूप बाहेर आलो आहे. थोड्या किरकोळ जखमा झाल्या असल्या तरी प्रकृती स्थिर आहे, कार्यकर्त्यांनी व हितचिंतकांनी कुणीही काळजी करू नये."
जिल्ह्यातील एका मोठ्या नेत्याच्या गाडीचा अपघात झाल्याचे समजताच कार्यकर्त्यांमध्ये चिंतेचे वातावरण होते, मात्र सावंत सुरक्षित असल्याचे स्पष्ट झाल्याने सर्वांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.
0 Comments