"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुरुम | प्रतिनिधी
शिक्षण क्षेत्रात केवळ पुस्तकी ज्ञान न देता विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व घडवणारे आणि वाणिज्य शाखेतील एक अभ्यासू व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे प्रा. डॉ. सुधीर वैजनाथराव पंचगल्ले नुकतेच सेवानिवृत्त झाले. मुरुम येथील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील वाणिज्य विभागात त्यांनी दिलेली प्रदीर्घ आणि समर्पित सेवा ही केवळ अध्यापनापुरती मर्यादित नसून, ती असंख्य विद्यार्थ्यांच्या आयुष्याला दिशा देणारी ठरली आहे.
विद्यार्थ्यांचे लाडके 'पंचगल्ले सर'
डॉ. पंचगल्ले यांची ओळख एक कडक शिस्तीचे पण तितकेच प्रेमळ प्राध्यापक म्हणून राहिली आहे. अत्यंत गुंतागुंतीच्या संकल्पना साध्या, सुबोध आणि दैनंदिन जीवनातील उदाहरणांच्या माध्यमातून स्पष्ट करण्याची त्यांची शैली विद्यार्थ्यांमध्ये कमालीची लोकप्रिय होती. "शिक्षण म्हणजे केवळ माहिती गोळा करणे नसून, ती व्यक्तिमत्व घडविण्याची प्रक्रिया आहे," या तत्त्वावर त्यांनी आयुष्यभर काम केले. त्यांच्या मार्गदर्शनामुळे ग्रामीण भागातील अनेक विद्यार्थी आज प्रशासकीय सेवा, बँकिंग आणि उद्योग क्षेत्रात यशाच्या शिखरावर पोहोचले आहेत.
संशोधन क्षेत्रातही मोठा ठसा
केवळ वर्ग अध्यापनातच नव्हे, तर संशोधन क्षेत्रातही डॉ. पंचगल्ले यांनी मोलाचे योगदान दिले आहे. त्यांनी MSME (सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग) क्षेत्राचा विकास, भारतीय अर्थव्यवस्थेतील बदल, बेरोजगारीची समस्या आणि बौद्धिक संपदा हक्क (IPR) यांसारख्या समकालीन विषयांवर सखोल संशोधन केले आहे. त्यांचे अनेक शोधनिबंध राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर वाखाणले गेले आहेत. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधकांनी पीचएडी (Ph.D) पूर्ण करत उच्च शिक्षणाची वाट धरली आहे.
प्रेरणादायी व्यक्तिमत्व
साधे राहणीमान आणि उच्च विचारसरणीचा वारसा जपणाऱ्या डॉ. पंचगल्ले यांचा सहकारी प्राध्यापकांशी असलेला समन्वय आणि नेतृत्वगुण नेहमीच वाखाणण्याजोगा राहिला. महाविद्यालयाच्या शैक्षणिक आणि सांस्कृतिक विकासात त्यांनी सक्रिय सहभाग नोंदवत संस्थेची उंची वाढवली.
"डॉ. पंचगल्ले सरांच्या अध्यापनशैलीत विषयाचे प्रभुत्व आणि जीवनाचा अनुभव यांचा संगम असे. त्यांनी घडविलेले विद्यार्थी आज समाजाच्या विविध क्षेत्रांत मूल्यनिष्ठ नागरिक म्हणून वावरत आहेत, हेच त्यांच्या कार्याचे खरे फलित आहे."
— प्रा. डॉ. प्रकाश रतनलाल रोडीया, वाणिज्य विभाग, राजर्षी शाहू महाविद्यालय, लातूर.
विद्यालयाच्या आठवणी कायम स्मरणात राहतील
डॉ.सुधीर पंचगल्ले
सत्काराला उत्तर देताना डॉ. सुधीर पंचगल्ले भावनिक होत म्हणाले की,आज हा सत्कार माझा नसून, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या माझ्या विद्यार्थ्यांचा आणि मला साथ देणाऱ्या श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील प्रत्येक सहकाऱ्याचा आहे. मी फक्त निमित्त मात्र असून आयुष्याची इतकी वर्षे या ज्ञानमंदिरात कशी गेली, हे समजलेच नाही. आज मागे वळून पाहताना पदरी फक्त विद्यार्थ्यांचे प्रेम आणि सहकाऱ्यांचा आदर दिसतोय, हेच माझ्या आयुष्याचे खरे समाधान आहे. पुढे विद्यार्थ्यां विषयी बोलताना ते म्हणाले माझ्या विद्यार्थ्यांनी मला फक्त 'सर' म्हणून स्वीकारले नाही, तर मला दररोज नवीन काहीतरी शिकण्याची प्रेरणा दिली. तुमची प्रगती हीच माझ्यासाठी गुरुदक्षिणा असल्याचे सांगून श्री माधवराव पाटील महाविद्यालय हे माझ्यासाठी केवळ कामाचे ठिकाण नव्हते, तर ते माझे दुसरे घर होते. इथल्या आठवणी कायम स्मरणात राहतील व तुमच्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण माझ्यासाठी उर्जेचा स्रोत असेल भावनिक उद्धार डॉ.पंचगल्ले यांनी काढले.
शुभेच्छांचा वर्षाव
सेवानिवृत्तीच्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करण्यात आला. "प्राध्यापक म्हणून जरी ते निवृत्त होत असले, तरी त्यांच्या ज्ञानाचा आणि अनुभवाचा लाभ समाजाला कायम मिळत राहील," अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या. त्यांच्या पुढील निरामय आणि समृद्ध आयुष्यासाठी शिक्षण क्षेत्रातील मान्यवरांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
0 Comments