"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
मुरूम | प्रतिनिधी
मुरूम येथील भीमनगर वस्तीने शिक्षण, जिद्द आणि सामाजिक बांधिलकीच्या जोरावर उभारलेला विकासाचा ‘सक्सेस पॅटर्न’ संपूर्ण महाराष्ट्रासाठी प्रेरणादायी ठरला आहे, असे प्रतिपादन माजी मंत्री बसवराज पाटील यांनी केले. ‘भूमिपुत्र अधिकारी-कर्मचारी स्नेहमिलन’ आणि वस्तीच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या स्मरणिकेच्या प्रकाशन सोहळ्यात ते अध्यक्षस्थानावरून बोलत होते.
“१९४४ मध्ये सुरू झालेली प्राथमिक शाळा आणि १९५५ मध्ये स्थापन झालेले डॉ. बाबासाहेब आंबेडकर शहर वाचनालय या संस्थांनी पेरलेले विचार आज वटवृक्षात रूपांतरित झाले आहेत. भीमनगरने केवळ स्वतःचा विकास केला नाही, तर सामाजिक क्रांतीचा नवा वस्तुपाठ देशासमोर ठेवला आहे,” असे गौरवोद्गार पाटील यांनी काढले.
या कार्यक्रमाला नगराध्यक्ष बापुराव पाटील मुरूमकर, राजस्थान राज्यपालांचे सचिव राजकुमार मंगेश सागर, माजी सहसंचालक डी. आय. गायकवाड, अप्पर निबंधक राजेश सुरवसे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. यावेळी सहाय्यक नगर रचनाकारपदी निवड झालेल्या निखिल मस्के यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
भीमनगरच्या यशाची आकडेवारी मांडताना पाटील म्हणाले, “एकाच वस्तीतून तब्बल ४८ जण ‘वर्ग-१’ आणि ‘वर्ग-२’ पदांवर कार्यरत आहेत. यामध्ये पोलीस उपायुक्त, सहसंचालक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी, कार्यकारी अभियंते यांचा समावेश आहे. तसेच १६ लेकी डॉक्टर म्हणून वैद्यकीय क्षेत्रात कार्यरत आहेत, तर अनेक तरुण देशाच्या सीमेवर सेवा बजावत आहेत.” डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या “शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे” या विचाराची भीमनगरने प्रभावी अंमलबजावणी केल्याचे त्यांनी नमूद केले.
तरुणांना मार्गदर्शन करताना त्यांनी “अत्त दीप भव”चा संदेश देत स्वतःच्या कर्तृत्वावर उभे राहण्याचे आवाहन केले. “केवळ नोकरीसाठी नव्हे, तर जागतिक दर्जाच्या कौशल्यासाठी सज्ज व्हा. व्यसनांपासून दूर राहून चारित्र्य आणि ज्ञान यांची जोपासना करा,” असेही त्यांनी सांगितले.
कार्यक्रमादरम्यान नगराध्यक्ष बापुराव पाटील यांनी वाचनालयासाठी ५० हजार रुपयांचे स्पर्धा परीक्षा संच सुपूर्द केले. प्रास्ताविक मदनलाल गायकवाड यांनी केले. सूत्रसंचालन जयंत गायकवाड यांनी, तर आभार प्रा. महेश कांबळे यांनी मानले.
या सोहळ्याच्या यशस्वी आयोजनासाठी अण्णाराव कांबळे, प्रशांत गायकवाड, प्रणित गायकवाड, आनंद गायकवाड, राहुल गायकवाड आदींनी पुढाकार घेतला. या ऐतिहासिक कार्यक्रमाने भीमनगरच्या संघर्ष आणि यशाचा इतिहास नव्या उंचीवर नेला.
0 Comments