Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

॥ ध्येयनिष्ठ शिक्षिकेचा कृतार्थ प्रवास; विमलताई राठोड यांना नळदुर्गमध्ये साश्रू नयनांनी निरोप ॥ सराटी जि.प. शाळेच्या मुख्याध्यापिका विमलताई राठोड यांचा भव्य सत्कार; अणदूर येथे सोहळा संपन्न


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
तुळजापूर | उमाजी गायकवाड 
अध्यापन ही केवळ नोकरी नसून ती एक पिढी घडवण्याची साधना आहे, हे आपल्या कार्यातून सिद्ध करणाऱ्या तुळजापूर तालुक्यातील सराटी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती विमलताई देविदास राठोड यांना त्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर अत्यंत दिमाखदार सोहळ्यात सेवानिवृत्तीनिमित्त निरोप देण्यात आला. अणदूर येथील जिल्हा परिषद केंद्रीय शाळेच्या सभागृहात पार पडलेल्या या सोहळ्याने उपस्थितांच्या डोळ्यांच्या कडा सुखाच्या आणि समाधानाच्या अश्रूंनी पाणावल्या होत्या.

या निरोप समारंभाच्या अध्यक्षस्थानी शिक्षण विस्तार अधिकारी श्रीमती एस. एम. राऊत होत्या. तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सदस्य डॉ. जितेंद्र कानडे, सराटीच्या सरपंच मल्लावाबाई व्हड्रे, माजी पंचायत समिती सदस्य साहेबराव घुगे, माजी सरपंच धनराज मुळे,शालेय व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा मिनाताई कलकोटे आणि केंद्रप्रमुख एल. एस. बारगळ यांची विशेष उपस्थिती होती.

कर्तृत्व आणि माणुसकीचा सन्मान
कार्यक्रमाची सुरुवात भावपूर्ण स्वागत गीताने झाली. त्यानंतर मुख्याध्यापिका विमलताई राठोड आणि शिवाजीराव जाधव यांचा मान्यवरांच्या हस्ते शाल, श्रीफळ आणि मानचिन्ह देऊन भव्य सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. जितेंद्र कानडे म्हणाले की, "विमलताईंनी सराटीच्या मातीत शैक्षणिक क्रांती घडवली. त्यांची शिस्त आणि प्रेमळ स्वभाव यामुळे शाळेचा कायापालट झाला."

यावेळी प्रगतशील शेतकरी दीपक घोडके, एमआयडीसी क्षेत्रीय अधिकारी शिवाजी राठोड, निवृत्त पीएसआय थावरू राठोड, चंद्रकांत राठोड, हवालदार संदीप राठोड, विश्वनाथ राठोड, निवृत्त मुख्याध्यापक सखाराम राठोड, विठ्ठल चव्हाण, गोविंद चव्हाण यांच्यासह शिक्षण क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी विमलताईंच्या कार्याचा गौरव केला.

भावनांचे पदर: विमलताई राठोड यांचे मनोगत
सत्काराला उत्तर देताना विमलताई राठोड भावूक झाल्या होत्या. आपल्या भावना व्यक्त करताना त्या म्हणाल्या की, "आज शाळेचा उंबरठा ओलांडताना पाय जड झाले आहेत. गेली अनेक वर्षे मी केवळ मुले शिकवली नाहीत, तर त्यांच्या रूपाने माझं कुटुंब विस्तारत गेलं. विद्यार्थ्यांच्या डोळ्यातील चमक हीच माझी खरी कमाई आहे. मी सेवानिवृत्त होत असले तरी, माझ्या विद्यार्थ्यांसाठी आणि समाजासाठी माझे शिक्षकी हृदय नेहमीच तत्पर राहील."

सहकार्यांचा मोठा सहभाग
या कार्यक्रमाला सुरेश चव्हाण, लालसिंग चव्हाण, प्रकाश भुरे, वसंतराव घोडके यांसह मोठ्या संख्येने पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाच्या यशस्वी नियोजनासाठी किरण राठोड, महेश राठोड, ऋषिकेश घुगे, राहुल घुगे, गणेश घुगे, शुभम चव्हाण, शशिकांत चव्हाण, महेश जाधव, श्रीराम चव्हाण आणि योगेश जाधव यांनी विशेष परिश्रम घेतले.

हा सोहळा केवळ एका सरकारी कर्मचाऱ्याची सेवानिवृत्ती नसून, एका ज्ञानव्रतीचा कृतार्थ सन्मान ठरला, अशी भावना यावेळी उपस्थित ग्रामस्थांनी व्यक्त केली.

✍️'Only न्युज धाराशिव' – जिल्ह्यातील घडामोडींचा अचूक वेध!

Post a Comment

0 Comments