Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

धक्कादायक: उमरगा तालुक्यात दुहेरी हत्याकांडाने खळबळ! निर्दयी पित्याने पत्नीसह ८ वर्षांच्या चिमुकलीचा कुऱ्हाडीने केला काटा काढला

"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
मुरुम | प्रतिनिधी
उमरगा तालुक्यातील बेरडवाडी (भुसणी) येथे एका नराधम पतीने आपल्या पत्नीसह अवघ्या आठ वर्षांच्या निरागस मुलीची कुऱ्हाडीने सपासप वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. मंगळवारी (दि. ७) पहाटे ही घटना उघडकीस येताच संपूर्ण धाराशिव जिल्हा हादरून गेला आहे. रागाच्या भरात पतीने केलेल्या या अमानवी कृत्यामुळे एका हसत्याखेळत्या कुटुंबाचा अंत झाला आहे.

नेमकी घटना काय?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, बेरडवाडी येथील आरोपी अजित अपन्ना वासुदेव आणि त्याची पत्नी लिंबूबाई वासुदेव यांच्यात सोमवारी रात्री उशिरा कोणत्यातरी कारणावरून कडाक्याचे भांडण झाले होते. हे भांडण इतके विकोपाला गेले की, रागाच्या भरात अजितने घरातील कुऱ्हाड उचलली आणि पत्नीवर वार करण्यास सुरुवात केली. आईला वाचवण्यासाठी गेलेली आठ वर्षांची चिमुकली मानसी हिच्यावरही या निर्दयी बापाने दया दाखवली नाही. त्याने पोटच्या मुलीवरही कुऱ्हाडीने वार करून तिला जागीच ठार केले.

मुलगा थोडक्यात वाचला
घरात रक्ताचा सडा पडलेला असताना आणि वडिलांचे हे रौद्र रूप पाहून त्यांचा लहान मुलगा प्रचंड घाबरला. जिवाच्या आकांताने तो घराबाहेर पळून गेल्याने या भीषण हत्याकांडांतून त्याचा जीव थोडक्यात वाचला आहे.

स्वतःहून पोलीस ठाण्यात झाला हजर
मध्यरात्री दोनच्या सुमारास रक्ताने माखलेला आरोपी अजित वासुदेव स्वतःहून मुरूम पोलीस ठाण्यात हजर झाला. "मी पत्नी आणि मुलीचा खून केला आहे," अशी कबुली त्याने पोलिसांना देताच कर्तव्यावर असलेले पोलीस अधिकारी चक्रावून गेले. घटनेचे गांभीर्य ओळखून मुरूम पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ. संदीपान दहिफळे यांनी तात्काळ आपल्या पथकासह बेरडवाडी गाठले.

वरिष्ठ अधिकाऱ्यांची घटनास्थळी धाव
या घटनेची माहिती मिळताच धाराशिव जिल्हा पोलीस अधीक्षक रितू खोकर आणि उपविभागीय पोलीस अधिकारी सदाशिव शेलार यांनी तातडीने मुरूम पोलीस ठाण्यात धाव घेतली. त्यांनी तपासाची चक्रे फिरवून तपासाबाबत कडक सूचना दिल्या आहेत. घटनास्थळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेले मृतदेह पाहून ग्रामस्थांनी एकच गर्दी केली होती. पोलिसांनी पंचनामा करून दोन्ही मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी मुरूम ग्रामीण रुग्णालयात पाठवले आहेत.

गुन्हा दाखल व पुढील तपास
या प्रकरणी मयत लिंबूबाई यांचे नातेवाईक नागनाथ शेंमले (रा. वाडी कासारशिरशी, ता. निलंगा) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून आरोपी अजित वासुदेव याच्या विरोधात भारतीय दंड विधान कलम ३०२ (खून) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नसून, कौटुंबिक कलहातून हे हत्याकांड घडले असावे, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे.

पुढील तपास मुरूम पोलीस करत आहेत. या घटनेमुळे बेरडवाडी परिसरात शोककळा पसरली असून अशा क्रूर प्रवृत्तीला कठोर शासन करण्याची मागणी होत आहे.

ताज्या आणि वेगवान बातम्यांसाठी पाहत रहा: 'Only न्युज धाराशिव'

Post a Comment

0 Comments