"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथे सालाबादप्रमाणे याही वर्षी भगवान श्री नृसिंह जयंतीचे औचित्य साधून भव्य एकदिवसीय कीर्तन महोत्सव आणि महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायटीचे माजी चेअरमन सयाजीराव (मालक) विजयसिंह देशमुख यांच्या वतीने या धार्मिक सोहळ्याचे आयोजन गुरुवार, दिनांक ३० एप्रिल २०२६ रोजी करण्यात आले आहे.
येथील कै. विजयसिंह देशमुख शॉपिंग कॉम्प्लेक्सच्या भव्य प्रांगणात हा भक्तिमय सोहळा संपन्न होणार आहे. या कीर्तन महोत्सवात प्रसिद्ध कीर्तनकार श्री. ह.भ.प. स्वरमूर्ती बालाजी महाराज मोहिते (आळंदीदेवाची) आपल्या अमोघ वाणीतून कीर्तन सेवा सादर करणार आहेत. त्यांना मृदंग साथ मृदंग सम्राट श्री. ह.भ.प. कृष्णा महाराज कदम यांची लाभणार आहे. भक्ती आणि सुरांच्या या संगमातून काटी नगरी दुमदुमून जाणार आहे.
कार्यक्रमाची रूपरेषा:
स्थळ: कै. विजयसिंह देशमुख कॉम्प्लेक्स, काटी.
कीर्तन वेळ: सायंकाळी ८ ते १० वाजेपर्यंत.
दिनांक: गुरुवार, ३० एप्रिल २०२६.
विशेष आकर्षण: कीर्तनानंतर उपस्थित भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
भगवान नृसिंहाच्या भक्तीचा हा जागर आणि प्रसादाचा लाभ घेण्यासाठी काटी परिसरातील समस्त भाविक भक्तांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे नम्र आवाहन आयोजक तथा माजी चेअरमन सयाजीराव देशमुख यांनी केले आहे. या कार्यक्रमामुळे परिसरात मंगलमय आणि उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
0 Comments