Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

“जैविक उत्पादनांचा वापर करा, सेंद्रिय शेतीकडे वळा” – कृषी विकास अधिकारी नागेश पाटील यांचे आवाहन; महाबीजकडून बीजोत्पादकांचा सन्मान

ढोकी | प्रतिनिधी
शेतकऱ्यांनी आपल्या शेतात जैविक उत्पादनांचा वापर करून सेंद्रिय शेतीकडे वळावे आणि अधिकाधिक उत्पादन घ्यावे, असे आवाहन जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी नागेश पाटील यांनी केले. ढोकी येथे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

यावेळी त्यांनी रासायनिक खतांचा वापर कमी करून सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यावर भर दिला. कार्यक्रमाची सुरुवात राज्याचे पहिले कृषिमंत्री पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलनाने करण्यात आली.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपसरपंच अमोल समुद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून नागेश पाटील, पंचायत समिती सदस्य अमर समुद्रे, माजी सदस्य संग्राम देशमुख, डकवडीचे सरपंच काकासाहेब पाटील, रामेश्वर शेंडगे, बाळासाहेब पाटील, बीजोत्पादक शेतकरी सतीश पाटील, शामराव देशमुख, माजी उपाध्यक्ष शिवाजीराव नाईकवाडी, दीपाली थोडसरे तसेच मंजिरी सखी फार्मर्स प्रोड्युसर कंपनीचे प्रतिनिधी उपस्थित होते.

प्रास्ताविकात महाबीजचे जिल्हा व्यवस्थापक एन. जी. इनामदार यांनी महामंडळाच्या कार्याचा आढावा घेतला. 28 एप्रिल 1976 रोजी स्थापन झालेल्या महाबीजचे आज राज्यातील 26 जिल्हा कार्यालये व 22 बीज प्रक्रिया केंद्रांमार्फत कार्य सुरू असून देशातील विविध राज्यांमध्येही विस्तार झाल्याची माहिती त्यांनी दिली. तसेच रायझोबियम, पीएसबी, ट्रायकोडरमा यांसारख्या जैविक उत्पादनांवर महाबीज यशस्वी काम करत असल्याचे त्यांनी सांगितले.

बीजोत्पादक शेतकऱ्यांचा गौरव
महाबीजतर्फे उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या बीजोत्पादक शेतकऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये प्रामुख्याने 
आगरचंद शेषराव पौळ (वाणेवाडी),राजश्री निलेश पाटील (वडगाव),सीमा बाळासाहेब नाईक नवरे (हिंगळजवाडी),उत्तम लक्ष्मण पवार (तडवळा) – यांनी एमएयूएस 725 सोयाबीनचे विक्रमी 27 क्विंटल प्रति एकर उत्पादन घेतल्याबद्दल विशेष गौरव करण्यात आला.तसेच महाबीज कर्मचारी मनोहर लंगडे यांच्या कन्येची महाराष्ट्र सुरक्षा दलात निवड झाल्याबद्दल त्यांचाही सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुधाकर मुंगल यांनी केले, तर आभार प्रदर्शन केंद्र अभियंता स्वप्निल बुळे यांनी मानले. कार्यक्रमास कृषी अधिकारी, कर्मचारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी उपसरपंच अमोल समुद्रे यांनी महाबीजचे जिल्हा कार्यालय ढोकी येथे सुरू करण्याची, माती परीक्षण सुविधा उपलब्ध करून देण्याची तसेच बीज नमुने लवकर तपासून शेतकऱ्यांना वेळेवर पैसे मिळावेत, अशी मागणी केली.

कार्यक्रमाच्या शेवटी मान्यवरांच्या हस्ते केक कापून सुवर्ण महोत्सव साजरा करण्यात आला.

Post a Comment

0 Comments