Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

एकलव्य विद्या संकुलात पालक मेळावा उत्साहात संपन्न; आधुनिक सुविधांसह विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर


"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा 
काटी | उमाजी गायकवाड
तालुका तुळजापूर येथील मंगरूळ-यमगरवाडीमधील एकलव्य विद्या संकुल येथे नुकताच पालक मेळावा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या कार्यक्रमास भटके विमुक्त विकास परिषद महाराष्ट्र प्रांताचे संघटन मंत्री राहुल चव्हाण हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
या मेळाव्यास इयत्ता पहिली ते दहावीतील विद्यार्थ्यांचे पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला अनिल घुगे यांनी प्रास्ताविकातून शाळेच्या वर्षभरातील शैक्षणिक प्रगतीचा आढावा घेत विविध उपक्रमांची माहिती दिली. क्रीडा, विज्ञान, सांस्कृतिक स्पर्धांमध्ये विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त सहभाग असल्याचे त्यांनी नमूद केले.

शाळेतील आधुनिक सुविधा विशेष आकर्षण ठरल्या. संपूर्ण शाळा ई-लर्निंग प्रणालीवर आधारित असून जिओ वाय-फाय सुविधा शाळा व वसतिगृहात उपलब्ध आहे. तसेच शाळा परिसर, इमारती व मुला-मुलींची वसतिगृहे सीसीटीव्ही निगराणीखाली असून विद्यार्थ्यांसाठी बेड, शुद्ध पिण्याचे पाणी आदी सुविधा उपलब्ध आहेत. इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत विद्यार्थ्यांना टॅबचे वितरण करण्यात आले आहे.

कार्यक्रमात विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या तसेच वर्षभर शंभर टक्के उपस्थिती असलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. वसतिगृह अधीक्षिका संगीता पाचंगे यांनी मुलींच्या वसतिगृहाचा आढावा सादर करून उपलब्ध सुविधांची माहिती दिली.

प्रमुख पाहुणे राहुल चव्हाण यांनी पालकांना मार्गदर्शन करत मुलांच्या शिक्षणात नियमितता व शिस्तीचे महत्त्व अधोरेखित केले. तसेच भटके विमुक्त विकास परिषदेमार्फत राज्यभर राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. यामध्ये आधार कार्ड, मतदान ओळखपत्र, रहिवासी दाखले मिळवून देणे तसेच घरकुल योजनांचा लाभ मिळवून देण्याचे कार्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन अण्णासाहेब मगर यांनी केले. या वेळी मार्तंड चावरे (सोलापूर), फुलाजी ताटी कुंडलवार, संगीता पाचंगे, मुख्याध्यापक विठ्ठल म्हेत्रे, अण्णासाहेब कोल्हटकर, यशवंत निंबाळकर, निर्मला हुग्गे यांच्यासह धाराशिव, सोलापूर, लातूर, बीड, परभणी, अहिल्यानगर व मुंबई परिसरातील पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments