"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
धाराशिव | उमाजी गायकवाड
"राजकारणातील लोक अनेकदा समाजमान्यतेसाठी आणि मतपेढी जपण्यासाठी होम-हवन, पूजा-अर्चा यांसारख्या अंधश्रद्धांचा आधार घेतात. मात्र, आता केवळ चर्चा करून चालणार नाही, तर जिथे जिथे अंधश्रद्धा पसरवणारे वर्तन दिसेल, तिथे सर्वसामान्य जनतेने तक्रारी दाखल करून गुन्हे नोंदवले पाहिजेत," असे परखड प्रतिपादन सुप्रसिद्ध कायदेतज्ज्ञ आणि संविधान विश्लेषक ॲड. असीम सरोदे यांनी केले.
महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती, धाराशिव जिल्हा शाखेच्या वतीने शुक्रवारी (दि. ३ एप्रिल) सायंकाळी छत्रपती शिवाजी महाराज नाट्यगृह येथे 'कायदा व राजकारणातील भोंदूगिरी' या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते.
मुख्यमंत्री आणि राजकीय नेत्यांवर प्रहार
सध्या संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ माजवून देणाऱ्या अशोक खरात प्रकरणावर भाष्य करताना ॲड. सरोदे म्हणाले की, या प्रकरणात सुमारे ३९ राजकीय नेते गुंतलेले असण्याची शक्यता आहे. या सर्व राजकारण्यांची नावे तातडीने जाहीर झाली पाहिजेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केवळ शब्दभ्रम करून स्वतःचा बचाव करू नये; उलट संविधानाने दिलेल्या जबाबदारीनुसार वैज्ञानिक दृष्टिकोनाचा प्रचार आणि प्रसार करणे हे त्यांचे कर्तव्य आहे, अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली.
कायद्याची अंमलबजावणी आणि पोलीस यंत्रणा
महाराष्ट्रात जादूटोणाविरोधी कायदा केवळ कागदावर राहून उपयोग नाही. प्रत्येक पोलीस ठाण्यात 'अंधश्रद्धा निर्मूलन कक्ष' स्थापन करण्याचे आदेश असतानाही त्याची अंमलबजावणी होताना दिसत नाही. या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी ठोस नियम आणि पोलिसांना योग्य मार्गदर्शक सूचना मिळणे काळाची गरज असल्याचेही त्यांनी आवर्जून नमूद केले. न्यायालयात होणाऱ्या पूजा-अर्चांवरही त्यांनी यावेळी कडक शब्दांत ताशेरे ओढले.
दिग्गजांची उपस्थिती आणि सत्कार
कार्यक्रमाच्या प्रारंभी अंनिस जिल्हा कार्यवाह ॲड. रवींद्र मैंदाड आणि ॲड. देविदास वडगावकर यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. राज्य कार्यकारिणी सदस्य डॉ. अस्मिता बालगांवकर यांनी प्रास्ताविकातून पाहुण्यांची ओळख करून दिली. ज्येष्ठ अभ्यासक ॲड. राज कुलकर्णी यांनी सद्यस्थितीतील राजकीय अंधश्रद्धेवर भाष्य केले.
धाराशिवकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
या कार्यक्रमाला धाराशिवचे आमदार कैलास (दादा) पाटील, नानासाहेब पाटील, एम.डी. देशमुख सर, ज्येष्ठ पत्रकार रवींद्र केसकर, संतोष करवर, लोमटे सर, सामाजिक कार्यकर्ते रवी डोईफोडे यांसह धाराशिव शहरातील नागरिक आणि युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे, अंनिसच्या या चळवळीत सहभागी होण्यासाठी अनेक तरुणांनी घटनास्थळीच आपली नोंदणी केली.
कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन धाराशिव जिल्हा अंनिस शाखेचे जिल्हा कार्यवाह ॲड. रवींद्र मैंदाड यांनी केले, तर आभार प्रदर्शन धाराशिव जिल्ह्याचे अंनिसचे
प्रधान सचिव चंद्रकांत उळेकर यांनी केले. राष्ट्रगीताने या प्रबोधनात्मक सोहळ्याची सांगता झाली.
बातमी फक्त 'Only न्युज धाराशिव' वर.
✍️ ताज्या बातम्या आणि सविस्तर विश्लेषणासाठी पहात रहा 'Only न्युज धाराशिव'
0 Comments