तुळजापूर | "Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर शहरातील पुजारी नगर परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून मोकाट डुकरांनी घातलेल्या धुमाकूळाचे वृत्त 'Only न्युज धाराशिव'ने प्राधान्याने लावून धरताच, नगरसेवक रामचंद्र आबा रोचकरी यांनी या वृत्ताची तात्काळ दखल घेत नगरपरिषदेचे मुख्याधिकारी यांचेकडे पाठपुरावा केला. नगरपरिषदेनी याची दखल घेत तुळजापूर नगर परिषदेने संबंधित डुक्कर मालकाला कायदेशीर नोटीस बजावली असून, येत्या सात दिवसांत या डुकरांचा कायमचा बंदोबस्त करण्याचे कडक आदेश दिले आहेत. नगरपरिषदेच्या या विनाविलंब कारवाईमुळे पुजारी नगरमधील त्रस्त नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून प्रशासनाचे आभार मानले आहेत.
नगरपरिषद प्रशासनाचा 'अंतिम इशारा'
नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी संबंधित डुक्कर मालक संजय साळुंके (रा. फिल्टर मागे, तुळजापूर) यांना जारी केलेल्या नोटीसीत म्हटले आहे की, "आपण शहरामध्ये वराह (डुकरे) पालन करीत आहात. ही डुकरे घाटशिळ परिसरातील सर्व मार्गांवर, भवानी रोड, तुळजापूर खुर्द, आठवडा बाजार, भाजी मार्केट तसेच जुन्या बसस्थानका मागील भाजी मार्केट येथे मोकाट फिरत असल्याचे निदर्शनास आले आहे. या वराहांचा त्रास भाविक, यात्रेकरू आणि स्थानिक नागरिकांना होत असून, त्यांच्या आरोग्याचा आणि सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे."
नगरपरिषद्वारे नोटीसीद्वारे स्पष्ट निर्देश दिले आहेत की, पुढील ७ दिवसांच्या आत या सर्व डुकरांचा बंदोबस्त करून त्यांचे पालन शहराबाहेर स्वतःच्या मालकीच्या जागेत करावे.
...तर थेट पोलीस ठाण्यात गुन्हा!
'Only न्युज धाराशिव 'ला मिळालेल्या माहितीनुसार, दिलेल्या मुदतीत डुकरांचा बंदोबस्त न केल्यास नगर परिषद कार्यालय स्वतः मोहीम राबवून ही डुकरे पकडणार असून, संबंधित मालकावर दंडात्मक कारवाई केली जाईल. तसेच, नगरपरिषदेच्या या शासकीय कामात काही अडथळा आणल्यास तुळजापूर पोलीस ठाण्यात थेट गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा कडक इशाराही या नोटीसीत देण्यात आला आहे.
नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण
पुजारी नगरसह डुकरे घाटशिळ परिसरातील सर्व मार्गांवर, भवानी रोड, तुळजापूर खुर्द, आठवडा बाजार, भाजी मार्केट तसेच जुन्या बसस्थानका मागील भाजी मार्केट परिसरातील रहिवासी गेल्या अनेक महिन्यांपासून या त्रासामुळे त्रस्त होते. आरोग्याचा प्रश्न आणि लहान मुलांची सुरक्षा टांगणीला लागली होती. 'Only न्यूज धाराशिव'ने या जनसामान्यांच्या प्रश्नाला वाचा फोडल्यामुळेच प्रशासनाने ही वेगवान पावले उचलली, अशी भावना स्थानिक नागरिकांनी व्यक्त केली आहे. नगरपरिषदने केवळ नोटीस काढून न थांबता प्रत्यक्ष कारवाई करून या समस्येचे कायमचे निर्मूलन करावे, अशी अपेक्षा आता व्यक्त होत आहे.
0 Comments