"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | प्रतिनिधी
तुळजापूर तालुक्यातील तामलवाडी ग्रामपंचायत हद्दीतील औद्योगिक वसाहतीमधील राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तसेच इतर नामांकित कंपन्यांकडील थकीत औद्योगिक कर वसुलीसाठी बजावण्यात आलेल्या नोटिसांची मुदत २७ मे २०२६ रोजी संपुष्टात आली आहे. मात्र मुदत संपूनही प्रशासनाकडून जप्तीची कारवाई होत नसल्याने भाजपचे सक्रिय कार्यकर्ते तथा आशा बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी रामकृष्ण सावंत (माजी सैनिक) यांनी प्रशासनासह सत्ताधारी पक्षालाही सवाल उपस्थित केला आहे.
गेल्या तीन वर्षांहून अधिक काळापासून थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई करण्याबाबत प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांकडून चालढकल होत असल्याचा आरोप सावंत यांनी केला आहे. ग्रामपंचायत अधिनियम १९५९/१९६० मधील कलम १२४ व १२९ तसेच ग्रामपंचायत लेखा संहिता २०११ च्या प्रकरण ८ नुसार थकीत कर वसुलीसाठी जप्तीची तरतूद असताना प्रशासन त्याची अंमलबजावणी का करत नाही, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे.
सावंत यांच्या पत्नीने नुकतीच तामलवाडी गणातून भाजपच्या चिन्हावर पंचायत समिती निवडणूक लढविली होती. तसेच १८ मे २०२६ रोजी त्यांनी धाराशिव जिल्ह्यातील भाजप नेते तथा तुळजापूरचे आमदार राणा जगजितसिंह यांची भेट घेऊन कर वसुलीच्या प्रकरणाची माहिती दिली होती. यावेळी आमदारांनी गटविकास अधिकारी, पंचायत समिती तुळजापूर यांना दूरध्वनीवरून जप्ती करून वसुलीची कारवाई करण्याच्या सूचना दिल्याचे सावंत यांनी सांगितले.
यापूर्वीही भाजपचे तालुकाध्यक्ष, पंचायत समिती सभापती तसेच पक्षाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी कारवाईबाबत सूचना केल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र अद्याप प्रत्यक्ष कार्यवाही सुरू न झाल्याने सावंत यांनी गटविकास अधिकाऱ्यांना लेखी स्मरणपत्र सादर करून तातडीने कारवाईची मागणी केली आहे.
कर वसुलीच्या या प्रश्नासाठी आतापर्यंत नऊ आंदोलने करावी लागली असून ३५ ते ४० वेळा लेखी पाठपुरावा केल्याचेही त्यांनी नमूद केले आहे. यानंतरही प्रशासनाने ठोस पावले उचलली नाहीत तर लवकरच तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा त्यांनी निवेदनातून दिला आहे.
दरम्यान, ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर तामलवाडी औद्योगिक वसाहतीतील थकीत कर वसुलीसाठी जप्तीची कारवाई प्रत्यक्षात होते की नाही, तसेच पक्षाचा कार्यकर्त्यांच्या मागण्यांना कितपत पाठिंबा मिळतो, याबाबत परिसरात चर्चांना उधाण आले आहे.
0 Comments