"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
तुळजापूर | उमाजी गायकवाड
कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी माता मंदिर परिसरात सुरू असलेली विकासकामे आणि भाविकांची सुरक्षा लक्षात घेऊन मंदिर प्रशासनाने एक अत्यंत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मंदिरातील भाविकांचे दर्शन अधिक सुलभ, सुरक्षित आणि सुरळीत व्हावे यासाठी आज, बुधवार (३ जून) पहाटे ४ वाजल्यापासून प्रवेश व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत. मंदिर संस्थानचे मुख्य कार्यकारी अधिकारी उपेंद्र तामोरे यांनी याबाबतची अधिकृत घोषणा केली आहे.
१ जूनपासून संवर्धनाचे काम सुरू
श्री तुळजाभवानी मंदिर हे राज्य संरक्षित स्मारक असल्याने, या ऐतिहासिक वास्तूचे जतन आणि संवर्धन करण्यासाठी १ जून २०२६ पासून प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली आहे. मंदिर परिसरात सध्या विविध विकासकामे युद्धपातळीवर सुरू आहेत. या कामांमुळे भाविकांना कोणताही त्रास होऊ नये आणि दर्शनाचा मार्ग सुटसुटीत व्हावा, यासाठी प्रशासनाने नवी प्रवेश नियमावली लागू केली आहे.
नवा बदल काय? जाणून घ्या प्रवेशाचे मार्ग:
आज पहाटे ४.०० वाजल्यापासून भाविकांसाठी खालीलप्रमाणे नवीन व्यवस्था अमलात आली आहे:
राजे शहाजी महाद्वार मार्ग:
'सिंहासन पूजा' पासधारक भाविक तसेच ५०० रुपयांचे देणगी दर्शन पासधारक भाविक यांना या मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जाईल.
बिडकर पायऱ्या मार्ग:
'अभिषेक पूजा' पासधारक, २०० रुपयांचे देणगी दर्शन पासधारक, तसेच 'धर्मदर्शन' आणि 'मुखदर्शन' घेण्यासाठी येणाऱ्या सर्व सामान्य भाविकांना बिडकर पायऱ्यांच्या मार्गाने मंदिरात प्रवेश दिला जाणार आहे.
सहकार्य करण्याचे प्रशासनाचे आवाहन
"मंदिराचे पावित्र्य, संवर्धनाचे काम आणि भाविकांची सुरक्षितता या तिन्ही गोष्टींना आमचे प्राधान्य आहे. त्यामुळे मंदिरातील सर्व महंत, पुजारी, सेवेकरी तसेच देश-विदेशातून येणाऱ्या भाविक भक्तांनी या बदललेल्या व्यवस्थेची नोंद घ्यावी आणि मंदिर प्रशासनाला पूर्ण सहकार्य करावे."
- उपेंद्र तामोरे (मुख्य कार्यकारी अधिकारी, श्री तुळजाभवानी मंदिर संस्थान)
'मंदीर संस्थान'चे आवाहन: जर तुम्ही आज किंवा आगामी काळात तुळजापूरला देवीच्या दर्शनासाठी जाणार असाल, तर घरातून निघण्यापूर्वी ही नवी नियमावली नक्की लक्षात घ्या, जेणेकरून मंदिरात पोहोचल्यावर धावपळ होणार नाही.
0 Comments