"Only न्युज धाराशिव" वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
ग्रामीण भागातील विद्यार्थिनींचा शाळाबाह्य होण्याचा दर कमी व्हावा आणि त्यांच्या शिक्षणाला गती मिळावी, या उद्देशाने धाराशिव येथील महिला व बालकल्याण विभाग तसेच समाजकल्याण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने तामलवाडी येथील सरस्वती विद्यालयात २४ गरीब व होतकरू विद्यार्थिनींना मोफत सायकलींचे वाटप करण्यात आले. या सायकल वाटपामुळे विद्यार्थिनींचा शाळेत येण्या-जाण्याचा प्रवास अधिक सोयीचा आणि सुरक्षित होणार असून, त्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मोठी चालना मिळणार असल्याचा सूर या निमित्ताने उमटला.
या योजनेचा लाभ विद्यालयातील गरजू विद्यार्थिनींना मिळवून देण्यासाठी प्राचार्य श्री. सुहास वडणे यांनी सातत्याने शासकीय पातळीवर पाठपुरावा केला होता. तसेच तामलवाडीचे सामाजिक कार्यकर्ते श्री. पांडुरंग म्हेत्रे यांच्या विशेष सहकार्यामुळे हा उपक्रम यशस्वीपणे राबविण्यात आला.
'सरस्वती पूजना'ने कार्यक्रमाची सुरुवात
कार्यक्रमाच्या प्रारंभी संस्थेचे अध्यक्ष श्री. बसवणप्पा मसुते, ज्येष्ठ संचालक श्री. मल्लिकार्जुन मसुते, श्री. अब्बासभाई पटेल, पर्यवेक्षक श्री. महादेव मसुते आणि सामाजिक कार्यकर्ते श्री. पांडुरंग म्हेत्रे यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून कार्यक्रमाची रीतसर सुरुवात करण्यात आली. या प्रसंगी विद्यालयातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचेही वाटप करण्यात आले.
शिक्षणात सातत्य राखा: प्राचार्य सुहास वडणे
प्रास्ताविक करताना प्राचार्य सुहास वडणे यांनी शासनाच्या विविध विद्यार्थीहिताच्या योजनांची माहिती दिली आणि विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन शिक्षणात सातत्य राखण्याचे आवाहन केले. सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग म्हेत्रे यांनी सायकल योजनेमागचा मुख्य उद्देश स्पष्ट करत, विद्यार्थ्यांनी या संधीचा सोने करून आपले उज्ज्वल भवितव्य घडवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. अध्यक्षीय भाषणात संस्थेचे अध्यक्ष बसवणप्पा मसुते यांनी सर्व विद्यार्थिनींना भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या व शिक्षणासाठी संस्था आवश्यक ते सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही दिली.
'या' विद्यार्थिनींना मिळाल्या सायकली
विद्यालयातील संध्या पंडित मेनकुळे, आयेशा रफिक मुलानी, तेजश्री ज्ञानेश्वर वडणे, श्रावणी लक्ष्मण काशीद, तनुजा तानाजी जाधव, प्रचिती प्रमोद माळी, संघर्ष शंकर चौगुले, अलमास पप्पू शेख, श्रद्धा अनिल वडणे, दुर्गा तुकाराम नागले, शरण्ये महेंद्र लोंढे, श्रुती लखन भोसले, लक्ष्मण मल्हारी क्षीरसागर, प्रियंका सुखदेव रणसुरे, संध्या सोमनाथ जाधव, वैष्णवी संतोष देवकर, श्रावणी महादेव गाडे, अक्षरा शिवराम इटकर, श्रावणी चंद्रशेखर चव्हाण, सुहाना मोहम्मद पठाण, भूमिका राम गुंड व श्रावणी सोमनाथ गुंड या २४ विद्यार्थिनींना मान्यवरांच्या हस्ते सायकल सुपूर्द करण्यात आल्या. सायकली मिळाल्यानंतर विद्यार्थिनींच्या चेहऱ्यावरील आनंद ओसंडून वाहत होता.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन श्री. राऊत सर यांनी केले. ग्रामीण भागातील मुलींच्या उच्च शिक्षणाला बळ देणाऱ्या या कौतुकास्पद उपक्रमाचे परिसरातून आणि पालकांमधून मोठे स्वागत होत आहे.
0 Comments