'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
धाराशिव | विशेष प्रतिनिधी
जाती-धर्माच्या भिंती पलीकडे जाऊन सामाजिक सलोखा आणि राष्ट्रीय एकात्मतेचा एक अनोखा व आदर्श वस्तुपाठ धाराशिव तालुक्यातील भिकार सारोळा येथे पाहायला मिळत आहे. येथील जगदे कुटुंब गेल्या तीनशे वर्षांपासून अत्यंत श्रद्धापूर्वक आणि उत्साहात 'मोहरम' (डोले) सण साजरा करत असून, यंदा त्यांच्या चौथ्या पिढीनेही ही ऐतिहासिक परंपरा तितक्याच भक्तीभावाने पुढे सुरू ठेवली आहे. हिंदू कुटुंबाकडून साजरा होणारा हा मोहरम सण जिल्ह्यात सध्या कौतुकाचा आणि आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला आहे.
श्रद्धेतून रुजलेली 'नालसाहेबांची' परंपरा
भिकार सारोळा गावाचा इतिहास पाहिला तर पूर्वी गावात मोहरम सण साजरा केला जात नव्हता. त्यामुळे गावातील पूर्वज माधव जगदे हे प्रत्येक वर्षी मोहरम सणाच्या काळात आवर्जून परगावी जात असत. यातूनच त्यांची मोहरम सणावर आणि 'इमाम हुसेन' यांच्या स्मृतींवर प्रचंड श्रद्धा जडली. याच काळात त्यांना चंद्राची कोर असलेली 'नाल' (नालसाहेब) प्राप्त झाली. ही नाल त्यांनी अत्यंत पवित्र मानून घरात स्थापन केली आणि तेव्हापासून आजतागायत जगदे कुटुंबात व गावात मोहरमचा सण मोठ्या उत्साहात साजरा होऊ लागला. आज त्यांच्या चौथ्या पिढीनेही हा वारसा अखंडित ठेवला आहे.
गावात रंगली 'सवारी' मिरवणूक; धार्मिक कार्यक्रमांची रेलचेल
भिकार सारोळा येथे हा मोहरम उत्सव पारंपरिक पद्धतीने दोन दिवस साजरा करण्यात येतो. यानिमित्ताने २५ जून रोजी रात्री गावात पहिली सवारी मिरवणूक काढण्यात आली होती. त्यानंतर २६ जून रोजी दिवसभर विविध धार्मिक विधी, नवस फेडणे आणि दर्शनाचे कार्यक्रम पार पडले. तर २६ जून रोजी रात्री ७ ते १० या वेळेत संपूर्ण गावातून नालसाहेबांची मुख्य 'सवारी मिरवणूक' ढोल-ताशांच्या गजरात आणि भक्तीमय वातावरणात काढण्यात आली. यावेळी हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत दर्शनासाठी मोठी गर्दी केली होती.
हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग
या ऐतिहासिक उत्सवाचे यशस्वी आयोजन करण्यासाठी आण्णा जगदे, बापू जगदे, सुधाकर जगदे, जनक जगदे, बापू कोळी, गणेश जगदे, अच्युत मोरे, गणेश तनमोर, बंडू माने, विजय मेदने, आण्णा माने, पप्पू माने, गणेश मोरे, योगेश जगदे, ओम कोळी, संतोष कोळी, पांडुरंग विश्वासे, सचिन जगदे, मैनुद्दीन शेख, मेहेबुब शेख, अमीन शेख, भैय्या तनमोर, मजनू शेख, अहमद शेख, नागनाथ मेदने, दशरथ मेदने, अभिषेक पाटील यांच्यासह भिकार सारोळा गावातील तमाम हिंदू-मुस्लिम बांधवांनी अहोरात्र परिश्रम घेतले.
"आमच्या पणजोबांपासून सुरू झालेली ही ३०० वर्षांची परंपरा आज आमची चौथी पिढी तितक्याच श्रद्धेने सांभाळत आहे. नालसाहेबांवर आमची गाढ श्रद्धा आहे. हा केवळ आमचा घरगुती सण राहिलेला नसून, गावातील हिंदू आणि मुस्लिम बांधव एकत्र येऊन हा सलोख्याचा उत्सव साजरा करतात. आधुनिक काळातही आमच्या तरुण पिढीने हा वारसा जिवंत ठेवला आहे, याचा सार्थ अभिमान वाटतो."
— बापू जगदे
0 Comments