'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
काटी | उमाजी गायकवाड
तुळजापूर तालुक्यातील काटी येथील भिमनगर येथे लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांची १५२ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. 'सर्व धर्म समभावाचे' प्रतीक असलेल्या शाहू महाराजांच्या विचारांचा या निमित्ताने उपस्थितांनी जागर केला.
कार्यक्रमाची सुरुवात दादाराव भोसले आणि किशोर बनसोडे (लातूर) यांच्या हस्ते राजर्षी शाहू महाराजांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. यावेळी नंदू बनसोडे यांनी आपल्या प्रभावी भाषण आणि गायनातून महाराजांच्या कार्याचा गौरव केला.
माणुसकीचा विचार जपला
नंदू बनसोडे आपल्या भाषणात म्हणाले की, "राजर्षी शाहू महाराजांचा जन्म २६ जून १८७४ रोजी कोल्हापुरात झाला. तरुण वयापासूनच त्यांनी समाजातील अनिष्ट प्रथा, अज्ञान, व्यसन, अंधश्रद्धा आणि अस्पृश्यतेविरुद्ध लढा दिला. 'माणसाने माणसाला माणूस म्हणावे आणि माणसाने माणसाला माणूस बनवावे', ही त्यांची शिकवण आजही प्रेरणादायी आहे. शिवराय आणि महात्मा जोतिराव फुले यांच्या विचारांचा वारसा पुढे चालवत महाराजांनी नेहमीच शोषित व वंचितांना न्याय देण्याचा प्रयत्न केला."
मान्यवरांची उपस्थिती
या जयंती कार्यक्रमाप्रसंगी रवि डोळसे आणि शेषप्पा बनसोडे यांनीही महाराजांच्या कार्यावर प्रकाश टाकला. या सोहळ्याला राहुल बनसोडे, विशाल बनसोडे, संजय साळुंके, दशरथ बनसोडे, सोहम बनसोडे, अनुसया बनसोडे, प्रताप बनसोडे, सुदेश बनसोडे यांच्यासह भिमनगरमधील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि आभार प्रदर्शन नंदू बनसोडे यांनी केले.
0 Comments