तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा विशेष वृत्त
महाराष्ट्राची कुलस्वामिनी श्री तुळजाभवानी देवीच्या मंदिरातील जीर्णोद्धार आणि विकासकामांना धार्मिक अधिष्ठान लाभून ती अत्यंत निर्विघ्न, सुरळीत व यशस्वीरीत्या पूर्ण व्हावीत, या उद्दात हेतूने श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या वतीने आज, गुरुपौर्णिमेच्या पावन मुहूर्तावर विशेष मंत्रपठण विधीचा भव्य शुभारंभ होत आहे. या धार्मिक सोहळ्यात गणपती अथर्वशीर्ष पारायण, श्रीरुद्र जप तसेच दुर्गा सप्तशती पारायणाचा अध्याय रंगणार असून संपूर्ण मंदिर परिसर मंत्रघोषाने दुमदुमून निघणार आहे.
शृंगेरी पीठाच्या जगद्गुरू शंकराचार्यांचे मार्गदर्शन!
मंदिरातील जीर्णोद्धार व विकासकामे कोणतेही विघ्न न येता पूर्ण व्हावीत, यासाठी परमपूज्य जगद्गुरु शंकराचार्य श्री श्री भारती तीर्थ महासन्निधानम् (शृंगेरी शारदा पीठ) यांचे विशेष मार्गदर्शन मागविण्यात आले होते. शृंगेरी पीठाने सुचविलेल्या धार्मिक विधीनुसारच या सर्व कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थानचे अध्यक्ष किर्ती किरण पुजार यांच्या अध्यक्षतेखाली अप्पर जिल्हाधिकारी, तहसीलदार, धार्मिक व्यवस्थापक, महंत तुकोजी बुवा, महंत हमरोजी बुवा, तिन्ही पुजारी मंडळांचे अध्यक्ष आणि सरकारी उपाध्ये यांच्या महत्त्वाच्या बैठका पार पडल्या असून, या बैठकीत मंत्रपठण विधीची संपूर्ण कार्यपद्धती निश्चित करण्यात आली आहे.
असा रंगेल धार्मिक सोहळा (बुधवार, २९ जुलै २०२६)
गुरुपौर्णिमेपासून सुरू होणाऱ्या या विशेष मंत्रपठण विधीसाठी तिन्ही पुजारी मंडळांच्या प्रमुखांना यजमानपदाचा बहुमान मिळाला आहे:
सकाळी ७ ते ८ (श्री गणपती अभिषेक):
उजव्या सोंडेच्या श्री गणपतीच्या अभिषेकाने कार्यक्रमाची सुरुवात होईल. यासाठी उपाध्ये पुजारी मंडळाचे अध्यक्ष अनंत कोंडो हे यजमान म्हणून उपस्थित राहतील.
सकाळी ८ ते ९ (भवानी-शंकर मंदिरात रुद्राभिषेक):
भवानी-शंकर मंदिरात होणाऱ्या रुद्राभिषेकासाठी पाळीकर पुजारी मंडळाचे अध्यक्ष विपीन शिंदे यजमान असतील.
श्री तुळजाभवानी देवी संकल्प व महाआरती:
श्री तुळजाभवानी देवीच्या अभिषेक आणि संकल्पासाठी भोपे पुजारी मंडळाचे अध्यक्ष अमरराजे कदम हे यजमानपद भूषवणार आहेत.
देवीचे मळवट चोपल्यानंतर हे तिन्ही यजमान श्री तुळजाभवानी देवीची भव्य महाआरती करतील. या सर्व विधींनंतर ‘श्री गणेश विहार’ येथे उपस्थित सर्व ब्राह्मणवृंदांना विधीवत वर्णी देऊन धार्मिक कार्यक्रमाची सांगता करण्यात येईल.
0 Comments