काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
आषाढी एकादशीचे औचित्य साधून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कदमवाडी (मा) येथील चिमुकल्या विद्यार्थ्यांनी काढलेल्या बालदिंडीने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला होता. ‘ज्ञानबा-तुकाराम’ आणि ‘राम कृष्ण हरी’च्या गजरात, टाळ-मृदंगाच्या तालावर निघालेल्या या दिंडीत संपूर्ण गाव तल्लीन झाले होते. गावकऱ्यांनी एकत्र येत दाखवलेल्या या सहभागामुळे कदमवाडीत पुन्हा एकदा वारकरी संप्रदायाची समृद्ध संस्कृती व एकतेचे दर्शन घडले.
ग्रामस्थांकडून बालवारकऱ्यांचे आदरातिथ्य
गावातील प्रमुख मार्गांवरून ही बालदिंडी अत्यंत उत्साहात काढण्यात आली. दिंडीचे स्वागत करण्यासाठी ग्रामस्थ, महिला, तरुण व भजनी मंडळी मोठ्या संख्येने रस्त्यावर उतरली होती. ठिकठिकाणी बालवारकऱ्यांवर फुलांचा वर्षाव करण्यात आला. चिमुकल्यांचा उत्साह वाढवण्यासाठी ग्रामस्थांच्या वतीने त्यांना फ्रुटी, चहा, मसाला दूध, बिस्कीट आणि केळी यांचे वाटप करून आपुलकीचे आदरातिथ्य करण्यात आले.
हनुमान मंदिरासमोर रंगल्या फुगड्या
दिंडी गावातील श्री हनुमान मंदिरासमोर पोहोचल्यानंतर वातावरणातील आनंद द्विगुणीत झाला. या ठिकाणी चिमुकल्या वारकऱ्यांसोबत ग्रामस्थांनी आणि शिक्षकांनीही फुगड्यांचा आनंद लुटला. अभंग आणि भजनांच्या तालावर संपूर्ण मंदिर परिसर दुमदुमून गेला होता.
अत्यंत भक्तिमय आणि आनंदी वातावरणात या बालदिंडीची सांगता झाली. या उपक्रमाला अभूतपूर्व प्रतिसाद दिल्याबद्दल व कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मोलाचे सहकार्य केल्याबद्दल शाळा प्रशासनाच्या वतीने सर्व ग्रामस्थ, पालक आणि युवक वर्गाचे विशेष आभार मानण्यात आले.
0 Comments