Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

झरेगावच्या श्री सद्‌गुरू दत्त मठात गुरुपौर्णिमा उत्साहात साजरी; 'दासबोध' व गुरु-शिष्य परंपरेवर काका महाराज झरेगावकर यांचे प्रबोधनात्मक प्रवचन संपन्न!

'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
​तुळजापूर | उमाजी गायकवाड 
दत्त भक्तांचे जागृत देवस्थान म्हणून ख्याती असलेल्या बार्शी-तुळजापूर रोडवरील झरेगाव येथील एकमुखी श्री सद्‌गुरू दत्त मठावर बुधवार (दि. २९) रोजी गुरुपौर्णिमा सोहळा अत्यंत भक्तिमय वातावरणात आणि विविध धार्मिक कार्यक्रमांनी मोठ्या उत्साहात पार पडला. 'दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा'च्या जयघोषाने संपूर्ण झरेगाव परिसर दुमदु येऊन गेला होता.

​गुरुच्या उपकारांची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पहाटेपासूनच मंदिरात भाविकांची प्रचंड रीघ लागली होती. सकाळी दत्त महाराजांच्या मूर्तीला पंचामृताने अभिषेक करून विशेष पूजाअर्चना करण्यात आली. त्यानंतर झालेल्या भजन आणि नामस्मरणाने संपूर्ण मंदिर परिसर आध्यात्मिक उर्जेने भारून गेला. या विशेष सणासुदीच्या वातावरणात बालगायिका राजनंदिनी लंगडे आणि राजमुद्रा लंगडे या दोन्ही गुणवान मुलींनी आपल्या अत्यंत सुमधुर आवाजात सादर केलेल्या भजनांनी उपस्थित भाविकांना मंत्रमुग्ध केले. त्यांच्या या सुरेल भजन सेवेने उपस्थितांची मने जिंकली.

​'दासबोध' आणि गुरु-शिष्य परंपरेचे महत्त्व: काका महाराज झरेगावकर यांचे प्रवचन
​दुपारी श्री दत्त माहात्म्यावर आधारित गुरुवर्य काका महाराज झरेगावकर यांच्या प्रमुख उपस्थितीत विशेष प्रवचनाचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी मार्गदर्शन करताना काका महाराज झरेगावकर यांनी गुरु-शिष्य परंपरेचे सनातन महत्त्व, दत्त भक्तीचे महात्म्य आणि विशेषतः समर्थ रामदास स्वामींच्या 'दासबोध' ग्रंथातील जीवनमूल्यांवर सखोल प्रकाश टाकला.
​"मनुष्याच्या जीवनात समर्थांचा 'दासबोध' हा केवळ ग्रंथाचा अभ्यास नसून तो जगण्याची दिशा दाखवणारा आरसा आहे. सद्‌गुरूंचे मार्गदर्शन आणि दासबोधातील सद्विचार माणसाला संकटातून मार्ग काढण्याची खरी प्रेरणा देतात," असे विचार त्यांनी आपल्या ओघवत्या वाणीतून मांडले. परिसरातील मोठ्या संख्येने उपस्थित ग्रामस्थ आणि भाविकांनी या प्रवचनाचा लाभ घेतला आणि प्रवचन संपल्यानंतर गुरुवर्य काका महाराजांचे दर्शन घेऊन आशीर्वाद घेतले.
विशेष सन्मान
​गुरुपौर्णिमेच्या या पवित्र पर्वावर 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवेचे मुख्य संपादक तथा दैनिक पुण्यनगरीचे काटी प्रतिनिधी उमाजी गायकवाड यांचा शाल, श्रीफळ व पुष्पहार घालून गुरुवर्य काका महाराज झरेगावकर यांच्याहस्ते विशेष गौरव करण्यात आला.

​अन्नदान, महाप्रसाद आणि अलोट गर्दी
​गुरुपौर्णिमेच्या औचित्याने मंदिर ट्रस्टच्या वतीने महाप्रसाद व भव्य अन्नदानाचे आयोजन करण्यात आले होते. या महाप्रसादाचा जवळपास २० हजारहून अधिक भाविकांनी लाभ घेतला. बार्शी, वैराग, धाराशिव आणि तुळजापूर सह विविध भागांतून आलेल्या महिलांसह दत्त भक्तांनी मंदिरात अलोट गर्दी केली होती. मंदीर परिसरात करण्यात आलेली फुलांची व आकर्षक सजावट लक्षवेधी ठरली.

​बार्शी-तुळजापूर रोडवरील गौडगाव येथील नागनाथ मंदिरापासून अवघ्या दोन किलोमीटर अंतरावर असलेले झरेगावचे दत्त मंदिर वर्षानुवर्षे भाविकांचे श्रद्धेचे श्रद्धास्थान बनले असून, या महोत्सवाचे संपूर्ण नियोजन झरेगाव ग्रामस्थ आणि मंदिर ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने अत्यंत शांततापूर्ण व शिस्तीत पार पडले.

अध्यात्म आणि जीवन मूल्ये 
​"गुरुविण कोण दाखवी वाट, गुरुविण कोण बुजावी गाठ! समर्थ रामदास स्वामींच्या 'दासबोध' ग्रंथाचा अभ्यास माणसाला केवळ प्रपंचात कुशल बनवत नाही, तर परमार्थाची खरी गोडी आणि जगण्याचे सार्थक कसे करावे, हे शिकवतो."
— गुरुवर्य काका महाराज झरेगावकर
भक्ती आणि समर्पण
​"जिथे भाव, तिथे देव आणि जिथे सद्‌गुरूंची कृपा, तिथे संकटांचे आपोआप निवारण होते. झरेगावच्या या एकमुखी दत्त मठातील गुरुपौर्णिमा सोहळा आणि बालगायिकांच्या सुमधुर भजनांनी भक्तीचा अनुपम संगम घडवून आणला."
— उमाजी गायकवाड मुख्य संपादक उमाजी गायकवाड 'Only न्युज धाराशिव' विशेष वृत्त

Post a Comment

0 Comments