Advertisement

तुळजापूर, शहरं, मुंबई, पुणे, छत्रपती संभाजी नगर, नाशिक, नागपूर, सोलापूर, कोल्हापूर, सातारा, सांगली, अहमदनगर, अकोला, जळगाव, विदर्भ, खान्देश, गोवा... नवीन न्यूज ब्लॉग साठी संपर्क 8483836284

ज्येष्ठ इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांना सोलापूर विद्यापीठाचा प्रतिष्ठित 'जीवन गौरव' पुरस्कार जाहीर; सोलापूर विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनी १ ऑगस्टला वितरण; कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांची पत्रकार परिषदेत माहिती

धाराशिव / सोलापूर | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा 
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाचा यंदाचा मानाचा आणि प्रतिष्ठेचा 'जीवन गौरव पुरस्कार' पंढरपूर येथील ज्येष्ठ इतिहास संशोधक व साहित्यिक श्री. गोपाळराव मारुती देशमुख यांना जाहीर झाला आहे. त्यांच्या ऐतिहासिक संशोधनात्मक आणि साहित्यिक लेखनातील प्रदीर्घ योगदानाची दखल घेऊन हा सन्मान घोषित करण्यात आला आहे. विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.

शनिवार, दिनांक १ ऑगस्ट २०२६ रोजी विद्यापीठाच्या २२ व्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून हा सोहळा पार पडणार आहे. ५१ हजार रुपये रोख, सन्मानचिन्ह, गौरवपत्र, शाल आणि श्रीफळ असे या जीवन गौरव पुरस्काराचे स्वरूप आहे.

हा वितरण सोहळा विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मुंबईतील रसायन तंत्रज्ञान संस्थेचे (ICT) पद्मश्री प्रा. (डॉ.) गणपती दादासाहेब यादव (दूरस्थ प्रणालीद्वारे) आणि पुणे येथील आयकर आयुक्त डॉ. नितीन रघुनाथ वाघमोडे यांच्या प्रमुख उपस्थितीत व हस्ते पार पडणार आहे. यावेळी प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा व प्रभारी कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांची विशेष उपस्थिती असणार आहे.

 इतिहास संशोधक गोपाळराव देशमुख यांच्याविषयी... माहिती 
गोपाळराव मारुती देशमुख हे राजपत्रित अधिकारी पदावरून सेवानिवृत्त झाले आहेत. त्यांनी इतिहास संशोधनात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे.

प्रमुख ग्रंथसंपदा: 'गहिवर' (ग्रामीण कथासंग्रह), 'सोलापूर जिल्ह्याची बखर' (ऐतिहासिक संदर्भ ग्रंथ), 'असे झुंजले वीर मराठे', 'मराठी दौलतीचे नारीशिल्प', 'सोलापूर जिल्ह्याचा इतिहास' (७०० पृष्ठांचा एकमेव बृहद संदर्भग्रंथ), 'दोन छत्रपतींच्या काळात मंगळवेढा ब्रम्हपुरीचा इतिहास', 'सुभेदार मल्हारराव होळकर, एक राष्ट्रपुरुष', 'राजे माधवराव तथा महादजी शिंदे (अलिजाबहादूर)' इत्यादी अनेक गाजलेले ग्रंथ त्यांनी लिहिले आहेत.

विविध नियतकालिके, वृत्तपत्रे आणि दिवाळी अंकांमध्येही त्यांचे ऐतिहासिक विषयांवर सातत्याने लेखन प्रसिद्ध झाले आहे.

इतर विभागवार पुरस्कार विजेते पुढीलप्रमाणे:
वर्धापन दिनानिमित्त विद्यापीठाकडून इतर विविध क्षेत्रांतील पुरस्कारही घोषित करण्यात आले असून त्यांचे वितरणही याच सोहळ्यात होणार आहे:

१. उत्कृष्ट महाविद्यालय पुरस्कार: वालचंद कॉलेज ऑफ आर्ट्स अँड सायन्स, सोलापूर
२. उत्कृष्ट प्राचार्य पुरस्कार: प्राचार्य डॉ. सत्यजीत कांतीलाल शहा (हिराचंद नेमचंद कॉलेज ऑफ कॉमर्स, सोलापूर)
३. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (विद्यापीठ): डॉ. प्रभाकर नागनाथ कोळेकर (सामाजिकशास्त्रे संकुल)
४. उत्कृष्ट शिक्षक पुरस्कार (महाविद्यालय): प्रा. डॉ. बापू भिमा राऊत (वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर)
५. उत्कृष्ट शिक्षकेत्तर अधिकारी (वर्ग १ व २): श्री. नशीर बशीरमियाँ देशमुख (कक्षअधिकारी, सोलापूर विद्यापीठ)
६. उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (वर्ग ३ - विद्यापीठ): श्री. ज्ञानेश्वर अर्जुन निंबाळकर (सहायक कक्षअधिकारी)
७. उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (वर्ग ४ - विद्यापीठ): श्री. शिवराज माणिकराव मिटकरी (शिपाई)
८. उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (लिपिक संवर्ग - महाविद्यालय): श्री. अशोक लक्ष्मण कोरे (ग्रंथालय लिपिक, राजा विजयसिंग कॉलेज, अक्कलकोट)
९. उत्कृष्ट शिक्षकेत्तर कर्मचारी (चतुर्थश्रेणी - महाविद्यालय): श्री. विष्णू जयवंत वाघमारे (सेवक, वसुंधरा कला महाविद्यालय, सोलापूर)

उपस्थितीचे आवाहन:
शनिवारी सकाळी ८ वाजता कुलगुरूंच्या हस्ते ध्वजारोहण होईल, त्यानंतर सकाळी १० वाजता पुरस्कार वितरण सोहळा पार पडेल. या सोहळ्यास सर्व विद्यार्थी, शिक्षक, नागरिक आणि शिक्षणप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Post a Comment

0 Comments