तुळजापूर | Only न्युज धाराशिव वृत्तसेवा
तुळजापूर तालुक्यातील तीर्थ (बु.) येथील वैराग्यधाम येथे लिंगैक्य जगद्गुरु श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या मंगलमयी प्रसंगी, धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघातून विधान परिषदेवर सर्वाधिक मतांनी विजयी झालेले माजी मंत्री आणि नवनिर्वाचित आमदार बसवराज पाटील यांचा विशेष नागरी सत्कार करण्यात आला.
केदारपीठाचे विद्यमान जगद्गुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभहस्ते, केदारनाथ मंदिराची देखणी प्रतिकृती, शाल, हार आणि रुद्राक्षमाळ देऊन आमदार बसवराज पाटील यांना सन्मानित करण्यात आले.
संतांचे मार्गदर्शन आणि जनतेचा विश्वास हीच माझी शिदोरी: आ. बसवराज पाटील
सत्काराला भावुक उत्तर देताना आमदार बसवराज पाटील म्हणाले की, "आज तीर्थक्षेत्र वैराग्यधामच्या पावन भूमीत केदार जगद्गुरूंच्या हस्ते मिळालेला सत्काररुपी आशीर्वाद माझ्यासाठी अत्यंत प्रेरणादायी आहे. यामुळे मला जनसेवेचे काम करण्यासाठी अधिक बळ मिळाले आहे. जनतेने माझ्यावर दाखवलेला अभेद्य विश्वास आणि संतांचे लाभलेले मार्गदर्शन यांच्या बळावर मी शिक्षण, अध्यात्म, विकास आणि सामाजिक हितासाठी कटिबद्ध राहीन. पुढील काळातही उत्तरदायित्वाची भावना ठेवून आणि जनसेवेचे व्रत जपत अधिक जोमाने कार्य करणार आहे."
लोकसेवा हीच खरी ईश्वरसेवा: जगद्गुरु भीमाशंकरलिंग महास्वामीजी
उपस्थितांना मार्गदर्शन करताना केदारपीठ जगद्गुरु श्री भीमाशंकरलिंग शिवाचार्य महास्वामीजी म्हणाले की, "लिंगैक्य जगद्गुरु श्री सिद्धेश्वरलिंग शिवाचार्य महाराजांनी अध्यात्म, संस्कार आणि समाजप्रबोधनाची एक महान परंपरा निर्माण केली आहे. या परंपरेचा वारसा जपत धर्म, समाज आणि राष्ट्रहितासाठी प्रामाणिकपणे कार्य करणाऱ्या कर्तृत्ववान व्यक्तींचा सन्मान करणे ही केदारपीठाची गौरवशाली परंपरा आहे. अध्यात्माच्या आणि नैतिकतेच्या मूल्यांवर आधारित लोकसेवा करणे हीच खरी ईश्वरसेवा आहे."
संतांचा विचार समाजाला दिशा देणारा: ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर
याप्रसंगी पंढरपूर मंदिर समितीचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांनी आपले विचार मांडताना सांगितले की, "संतांचे विचार आणि शिकवण समाजाला नेहमीच योग्य दिशा दाखवत आली आहे. आजच्या काळात सेवा, संस्कार आणि समरसतेचा हा पवित्र संदेश समाजातील शेवटच्या घटकापर्यंत अधिक प्रभावीपणे पोहोचवणे काळाची गरज आहे."
मान्यवरांची मांदियाळी
या सोहळ्याला उदगीर येथील शिवाचार्य महाराज, जेवळीचे गंगाधर शिवाचार्य महाराज, मेहकरचे शिवाचार्य महाराज यांच्यासह धाराशिव जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आप्पासाहेब पाटील, नगर परिषदेचे उपाध्यक्ष रामचंद्र रोचकरी, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जनराव साळुंके आणि नगरपरिषदेचे विरोधी गटनेते अमोल कुतवळ प्रामुख्याने उपस्थित होते.
तसेच कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती संतोष बोबडे, माजी सभापती सचिन पाटील, दिलीप भालेराव, सरपंच रामचंद्र आलुरे, प्रकाश आष्टे, आनंद कंदले, समितीचे सदस्य गोविंद माकणे, गुरुनाथ बडूरे, लक्ष्मण उळेकर, राजू एकलारे, माळी साहेब यांच्यासह रामेश्वर बद्दर, विजयकुमार सोनवणे, डॉ. माधव पाटील, एस. एम. पटणे, भीमाशंकर हासुरे, पंडित जोकार, अशोक राजमाने, शरणप्पा कबाडे, गणेश खराडे, ब्रह्मानंद पाटील, गिरीश पाळणे, एड. अरविंद बेडगे, श्रीकांत साखरे, वैजनाथ गुळवे, दिलीप वट्टे, ओंकार काडगावकर, संजय ठोंबरे, गुलचंद व्यवहारे व पंचक्रोशीतील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाचे अभ्यासपूर्ण प्रास्ताविक गुरुनाथ बडूरे यांनी केले, तर संपूर्ण सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी उत्कृष्टरित्या सांभाळले. धार्मिक विधी आणि महाप्रसादाच्या वितरणाने या सोहळ्याची अत्यंत उत्साहात सांगता झाली.
0 Comments