काटी | 'Only न्युज धाराशिव' वृत्तसेवा
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा होऊनही देश जेव्हा विकासाच्या मोठ्या गप्पा मारतो, तेव्हा सोलापूर आणि धाराशिव या दोन जिल्ह्यांच्या सीमेवर वसलेले वाणेवाडी (ता. तुळजापूर) हे गाव आज ही मूलभूत रस्त्याअभावी अंधारात चाचपडत आहे. स्वातंत्र्याची ७८ वर्षे पूर्ण झाली तरी या भागात पक्का रस्ता झाला नसल्याने लालपरी (एसटी बस) कधी पोहोचलीच नाही; तर आणीबाणीच्या प्रसंगी रुग्णवाहिका देखील वेळेत येत नाही. या गंभीर समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मागण्या मान्य न झाल्यास, येत्या १५ ऑगस्टपासून मुंबईत मंत्रालयासमोर तीव्र आमरण उपोषण करण्याचा ठाम इशारा सामाजिक कार्यकर्ते दयानंद बादगुडे यांनी दिला आहे.
१ किमीसाठी तब्बल २० किमीचा फेरा; विद्यार्थ्यांची पायपीट
सोलापूर जिल्ह्यातील उत्तर सोलापूर, बार्शी आणि धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर या तीन तालुक्यांच्या सीमावर्ती भागातील विद्यार्थी, गरोदर माता-भगिनी, ज्येष्ठ नागरिक आणि शेतकरी रस्त्याअभावी होरपळून निघत आहेत. तुळजापूर तालुक्यातील वाणेवाडी अंतर्गत जाधव वस्ती ते सावंतवाडी क्र. २ दरम्यान अवघ्या १ किलोमीटरचा रस्ता नसल्याने ग्रामस्थांना तब्बल २० किलोमीटरचा लांबलचक फेरा मारावा लागत आहे. शाळा व कॉलेजसाठी लहान विद्यार्थ्यांना दररोज ४ किलोमीटरची पायपीट करावी लागत आहे.
९ दिग्गज लोकप्रतिनिधींचे कार्यक्षेत्र, तरीही प्रशासन सुस्त
विशेष म्हणजे, या रस्त्याच्या अवघ्या २ ते ५ किमी अंतरात सोलापूर आणि धाराशिव जिल्ह्यांतील दोन पालकमंत्री, तीन खासदार आणि चार आमदारांसह तब्बल ९ लाडक्या लोकप्रतिनिधींची नोंदणी येते. यात सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे, धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक,खासदार ओमराजे निंबाळकर, खासदार प्रणिताताई शिंदे, खासदार ज्योतिताई वाघमारे, आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार राजेंद्र (भाऊ) राऊत, माजी मंत्री दिलीपराव सोपल व आमदार राजू खरे या सर्व नेत्यांनी मदत केली असली, तरी प्रशासकीय लालफितीच्या कारभारामुळे रस्ता अजूनही कागदावरच अडकला आहे.
रस्त्याचा सविस्तर तपशील (एकूण ११ किमी मिसिंग लिंक):
भाग १: कळमण ते शेळगाव आर रस्ता (पालखी मार्ग) - ५.०० किमी (उत्तर सोलापूर २.५ किमी व बार्शी २.५ किमी, जि. सोलापूर)
भाग २: शेळगाव आर जुना काटी रस्ता ते बसवेश्वर चौक सीमा - १.०० किमी (बार्शी तालुका, जि. सोलापूर)
भाग ३: सीमा बसवेश्वर चौक ते वाणेवाडी व जाधव वस्ती ते सावंतवाडी क्र. २ - ५.०० किमी (तुळजापूर तालुका, जि. धाराशिव)
एकूण लांबी: ११.०० किलोमीटर
वारकऱ्यांचा श्रद्धेचा मार्ग अन् बळीराजा पाणंद रस्ता
पंढरपूर देवस्थानचे सहअध्यक्ष ह.भ.प. गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या पालखीचा काही मार्ग या रस्त्यावरून जातो. लाखो वारकऱ्यांचे श्रद्धास्थान असलेला हा मार्ग आणि तीन गावे जोडणारा रस्ता अत्यंत महत्त्वाचा आहे. तसेच, बसवेश्वर चौकाच्या दक्षिण बाजूच्या शिव बांध पाणंद रस्त्याचा तांत्रिक अहवाल दोन्ही तहसीलदारांकडे जमा असून, सीमेच्या वादामुळे रखडलेला हा रस्ता तात्काळ मोकळा करण्याची मागणी होत आहे.
प्रमुख मागण्या:
१. 'खास बाब' म्हणून जीआर (GR) काढावा: दोन जिल्ह्यांतील ३ गावांचा भाग लक्षात घेता, या ११ किमी मिसिंग लिंक रस्त्याला ZP कडून PWD कडे वर्ग करून जिल्हा मार्गाचा (DRN) दर्जा द्यावा, डांबरीकरण व पुलांची निर्मिती करून १० ऑगस्ट २०२६ पर्यंत मंत्रालयातून GR काढावा.
२. पाणंद रस्ता मोकळा करणे: बार्शी व तुळजापूर तहसीलदारांनी बसवेश्वर चौक दक्षिण बाजूचा बळीराजा शिव बांध पाणंद रस्ता शासकीय यंत्रणा वापरून तात्काळ मोकळा करावा.
"राज्यपाल, लोकायुक्त, मंत्रालय, दोन्ही जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागापर्यंत सर्व अहवाल जमा आहेत. प्रशासनाने १० ऑगस्ट २०२६ पर्यंत शासन निर्णय न काढल्यास, १५ ऑगस्टला स्वातंत्र्यदिनी मुंबईत मंत्रालयासमोर आमरण उपोषण अटळ आहे."
— दयानंद भगवान बादगुडे (सामाजिक कार्यकर्ते, रा. शेळगाव आर, ता. बार्शी)
0 Comments